आयपीएल सामन्यांच्या डिजिटल प्रसारण हक्कांचे मूल्य आणखीही वाढेल. पण त्यास आधार कशाचा, हा प्रश्न अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास टोकदार ठरतो..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना आणि तत्सम साथ आजार नियंत्रणासाठी केंद्रीय आरोग्य खात्यास आणखी ५० हजार कोटी रुपयांची गरज आहे, संरक्षण सिद्धतेत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सहा पाणबुडय़ांसाठी भारतीय नौदलास ५० हजार कोटी रुपयांची निकड आहे, बदलत्या जागतिक परिस्थितीत खतांवरील अनुदानासाठी आपणास अतिरिक्त ५० हजार कोटी रु. खर्च करावे लागतील, आयुर्विमा महामंडळाच्या समभागांच्या किमती घसरल्याने गुंतवणूकदारांचे किमान ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे, गडगडत्या रुपयामुळे आयातीचा खर्च रसातळाला गेलेला आहे आणि आकसत्या अर्थव्यवस्थेने बेरोजगारीच्या संकटाची तीव्रता वाढवलेली आहे.. या सर्व क्लेशकारक बातम्यांस आनंददायी उतारा ठरेल अशी घटना म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’च्या पुढील पाच वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी लागलेल्या बोली. यातून क्रिकेट संस्था धुरिणांहाती सुमारे ४५ हजार कोटी रुपये उभे राहतील. क्रीडा जगतातील या दैवदुर्लभ सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी हा देश इतका आतुर आहे की प्रसारण हक्क विक्रीच्या पहिल्याच दिवशी सर्व विक्रम मोडले गेले. वास्तवात रविवार, १२ जून रोजी भारताच्या टी-२० संघाची दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून घरातच धुलाई होत असताना या आगामी आयपीएल जत्रेच्या प्रसारणातून इतके पैसे उभे राहतात हे पाहून डोक्याचे आणि डोळय़ांचे  केवळ  पारणेच फिटते असे नाही; तर त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेच्या धारणा आणि धोरणांची चिकित्सा करण्याची गरजही व्यक्त होते.

भारतीय संघ पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, त्या घटनेला यंदा २५ जून रोजी ९० वर्षे पूर्ण होतील. त्याच दिवशी भारताच्या पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदालाही ३९ वर्षे पूर्ण होतील. या तारखेचे किंवा त्या घटनांचे कवित्व सध्याच्या पिढीला असण्याचे कारण नाही. राजकारणाप्रमाणेच क्रिकेटही अलीकडे केवळ आकडय़ांचा खेळ बनला आहे आणि त्यात खेळापेक्षा कमाई या घटकास अधिक महत्त्व आले आहे. आयपीएल प्रसारण हक्कांचा लिलाव हेच दर्शवतो. हे लिलाव पहिल्या दिवशी अनिर्णित राहून दुसऱ्या दिवसावर गेले. परंतु पहिल्या दिवसातच रकमांचे इतके विक्रम मोडले गेले की ते पाहून विचारखीळ बसावी. दूरसंवाद माध्यमातून बंदिस्त लिलाव अशा विचित्र प्रकारे यात काही कंपन्यांनी बोली लावल्या. दूरचित्रवाणी आणि डिजिटल या दोहोंसाठी एकत्रित बोलींची रक्कम ४३ हजार कोटी रुपयांच्या समीप पहिल्याच दिवशी पोहोचली. म्हणजे प्रत्येक सामन्याचे दोन्ही माध्यमांतील केवळ प्रसारणमूल्य जवळपास १०७ कोटी रुपये. जगातील मोजक्याच स्पर्धाना इतका उदंड प्रतिसाद मिळालेला आढळतो. एका आकडेवारीनुसार, सोमवारी सायंकाळी पहिल्या दिवशीच्या लिलावाला विराम मिळाला तेव्हा आयपीएलचे प्रतिसामना प्रसारण मूल्य इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि मेजर लीग बेसबॉल या अमेरिकी स्पर्धापेक्षा अधिक ठरले. अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग (अमेरिकन रग्बी) ही स्पर्धाच आयपीएलपेक्षा थोडेफार अधिक मूल्य आकृष्ट करणारी ठरते. अमेरिकी अर्थव्यवस्था जवळपास १८ लाख कोटी डॉलर इतकी आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था तीन लाख कोटी डॉलर्सपर्यंत धापा टाकत पोहोचेल. ही तुलना लक्षात घेतल्यास या तमाशा लिलावातील विसंगती लक्षात यावी. अर्थात या आघाडीवर का असेना पण भारताने एकदाचे अमेरिकेस मागे टाकले यातच आनंद मानणारे नसतील असे नाही. तथापि या आनंदवीर आणि वीरांगनांना काही बाबींचे भान करून देणे इष्ट ठरते. हे भान निखळ क्रीडा आणि व्यापक अर्थव्यवस्था या दोन्ही परिप्रेक्ष्यात महत्त्वाचे.

सर्वप्रथम फक्त क्रीडा क्षेत्राच्या नजरेतून या आकडेवारीचा अर्थ. आगामी आयपीएलमध्ये मुळात प्रतिसामना एकत्रित आधारमूल्यच ८२ कोटी रुपये होते. तेव्हा लिलावाद्वारे ते १०० कोटींपलीकडे जाणार हे जवळपास अध्याहृतच. तसे ते गेले. आतापर्यंत २००८, २०१८ अशी दोन वर्षे माध्यमहक्कांची विक्री झाली आणि प्रत्येक वेळी आधीच्या तुलनेत घसघशीत वाढ नोंदवली गेली. आताही सोमवार सायंकाळपर्यंत २०१८च्या तुलनेत जवळपास १३८ टक्क्यांची वृद्धी नोंदवली गेली. या काळात मोठय़ा प्रमाणावर तरुण वर्ग भारतात आणि जगभरात डिजिटलाभिमुख झाला. ‘ओटीटी’लाच अस्सल मानणाऱ्या आणि दारात आणून दिल्या जाणाऱ्या ‘फूड डिलिव्हरी’च्या पोषणमूल्यांवर पोसल्या गेलेल्या या ‘गिग इकॉनॉमी’ पिढीतील एका वर्गास साडेतीन तासांत संपणाऱ्या टी-२० क्रिकेटविषयीचे आकर्षण अधिक असणे साहजिक. हा वर्ग ‘स्टार्ट अप’च्या बाता ऐकतो आणि त्यातील मूल्यांकनांच्या आकडय़ांनी बधिर होतो. प्रत्यक्षात या स्टार्टअप्सचे किती बंबाळे वाजलेले आहे याचे भान त्यांस नसते. गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांनी फुगवलेल्या या नवउद्यमींच्या उद्योगमूल्याने त्याच्या विचारशक्तीस अंधत्व आलेले असते. अशा वेळी कटू वास्तवापासून स्वप्निल जगात नेणाऱ्या या लटक्या क्रीडा स्पर्धाचे गारूड यांना आणि एकूणच समाजमनास ग्रासून टाकत असेल तर नवल नाही. तेच आता होताना दिसते. परिणामी त्यामुळे आज प्रसारण हक्कांचा जो आकडा दिसतो, तो उद्या वाढणारच. येत्या दोनेक वर्षांत दूरचित्रवाणी संचापेक्षा डिजिटल माध्यमांना (मोबाइल, टॅब, लॅपटॉप) पसंती मिळणार, असेही दिसते. त्यामुळे लवकरच डिजिटल हक्कांसाठी अधिक बोली लागेल हेही स्वाभाविक. हे झाले खेळ प्रक्षेपण उद्योगाच्या उलाढालीबाबत. पण प्रत्यक्ष खेळाचे काय?

त्याबाबतचे वास्तव असे की २०११ नंतरच्या ११ वर्षांत आपण क्रिकेटमधील एकही जगज्जेतेपद पटकावलेले नाही. याचे कारण म्हणजे हा विषयच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या प्राधान्यक्रमात अग्रस्थानी राहिलेला नाही! जगज्जेतेपद वगैरे फुटकळ भावनिक बाबी. जिंकण्या-हरण्यापेक्षा रोकडा आर्थिक व्यवहार महत्त्वाचा. त्यामुळेही असेल पण देशातील सत्तारूढ पक्षही क्रिकेट नियंत्रणात विशेष रुची घेताना दिसतो. आपल्या या सर्व क्रिकेट भाग्यविधात्यांच्या मते जेमतेम पंचवीस देश खेळतात अशा खेळात मैदानावर मिळवण्यासारखे काही राहिले नसावे. यातील दुसरे सत्य असे की क्रिकेट स्पर्धाचा तोंडवळा आंतरराष्ट्रीय असला तरी प्रेक्षकांचा गोतावळा मात्र देशीच असावा लागतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वा दक्षिण अफ्रिका इत्यादी देशांतून इतका पैसा थोडाच उभा राहणार? त्यामुळे आपल्या आयपीएलमुळे आपल्या क्रिकेटचे भले होत असेल वा नसेल. पण या परदेशी खेळाडूंची मात्र निश्चितच धन होते. वास्तविक अशा जागतिक स्पर्धा आयोजक देशांत त्या त्या खेळाची प्रगती सहसा होत नाही, असा इतिहास आहे. उदाहरणार्थ इंग्लिश प्रीमियर लीग. ही जगातील सर्वात लोकप्रिय क्लब फुटबॉल स्पर्धा. पण या लीगचा फायदा इंग्लिश फुटबॉलला किती झाला, याचा शोध घेतल्यास फार काही गवसत नाही. १९६६ मध्ये मायदेशी पटकावलेले जगज्जेतेपद यापलीकडे इंग्लंडची पत युरोपात वाढलेली नाही. जर्मनी, इटली, फ्रान्स आणि स्पेन हे देश या युरोपीय फुटबॉलमधील महासत्ता. इंग्लंडला अजून ते स्थान मिळवता आलेले नाही. म्हणजे खेळाची स्पर्धा भरवणारे धनाढय़ असले तरी त्यामुळे खेळ श्रीमंत होतो असे नाही.

अर्थात खेळाच्या श्रीमंतीत रस आहे कोणाला? विविध खेळांची प्रगती व्हावी, क्रीडा संस्कृती वाढीस लागावी वगैरेपेक्षा हा आयपीएलचा छनछनाट महत्त्वाचा. तथापि यामुळे क्रिकेटचा प्रसार होतो असे मानणे म्हणजे ‘डान्स बार्स’मुळे भारतीय नृत्यकलेची लोकप्रियता वाढते असे मानण्यासारखे. एरवी हे चोचले खपूनही गेले असते. पण देशाची अर्थव्यवस्था गंभीर संकटास सामोरी जात असताना या छछोर उद्योगातील छनछनीची विवेकी जनांस तरी चिंता वाटावयास हवी. अर्थात विचारच करायचा नसेल तर आनंदसाधनेसाठी आयपीएल आहेच.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on ipl media rights zws