हिंदी चित्रपटसृष्टीत १९६०च्या दशकातला बहर आगळा होता.. त्या काळाचा एक दुवा ठरलेली साधना अभिनयापेक्षा सौंदर्यासाठी लक्षात राहिली खरी, पण चाहत्यांना त्या बहारीच्या काळातच ठेवून ती जगली आणि निघून गेली..
हिंदी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ ज्यांच्या कलेनं, अदांनी साकारला त्यातील अनेक प्रतिभावंत कधीच काळाच्या पडद्याआड गेले. तो काळ जगलेले व गाजवलेले कलाकार आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. साधना ऊर्फ साधना शिवदासानी यांची निधनवार्ता शुक्रवारी आली आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या बहरपर्वातलं आणखी एक पान गळून पडलं. नितांतसुंदर वैदूर्यी डोळे, मोहक आणि मोनालिसासारखं गूढ हास्य हे साधनाचं वैशिष्टय़. त्यात भर पडली ती तिच्या आगळ्यावेगळ्या केशरचनेची. पुढे हीच केशरचना ‘साधना कट’ या नावाने रूढ झाली, इतकी की बिपाशा बसू, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, दीपिका पडुकोन आदी नव्या जमान्यातील नायिकांनाही या कटची भुरळ पडली व कधी ना कधी त्याचे अनुकरण करावेसे वाटले.
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब चित्रपटांत पडलं नसतं तरच नवल ठरलं असतं. साहजिक आपला सिनेमा बोलू लागला तेव्हापासून तमाम नायकांनीच पडदा व्यापून टाकला आहे. या नायकांच्या नायिका म्हणजे जणू शोभेच्या बाहुल्याच. नायिकांचं अस्तित्व चार-दोन चांगले प्रसंग आणि चार-पाच गाण्यांपुरतंच. अशा स्थितीत ज्या अभिनेत्रींनी आपला लोभस ठसा उमटवला, त्यात साधनाचा क्रमांक वरचा लागतो. त्या वेळी आजच्याएवढी गळेकापू स्पर्धा नव्हती हे खरं, मात्र स्पर्धा होती ती किती तगडी होती हे तेव्हाच्या कलाकारांच्या नावांवरून नजर टाकली तरी लक्षात यावं. आयुष्यात केवळ अभिनयच करायचाय या ईर्षेने दाखल झालेल्या साधनापुढे मीनाकुमारी, वैजयंतीमाला, नूतन, वहिदा रेहमान अशा सकस अभिनय करणाऱ्या व कमालीच्या सुंदर अभिनेत्रींचं आव्हान होतं. या अभिनेत्रींना गाठू पाहणाऱ्या माला सिन्हा, आशा पारेख, नंदा आदी अभिनेत्रींशी स्पर्धा होती ती वेगळीच. दर शुक्रवारी कोणता ना कोणता चित्रपट प्रदर्शित व्हायलाच हवा असा आजच्यासारखा अट्टहास तेव्हा नव्हता. राज कपूरसारखा शोमन ‘बडे सुकून से’ दर चार-पाच वर्षांनी एक सिनेमा करीत असे. तर अशा स्थितीत साधनाने स्वत:ची छाप पाडली. तिचा प्रभाव एवढा होता की सर्वाधिक मानधन घेणाऱ्या वैजयंतीमालानंतर तिचा क्रमांक लागत असे व तिच्या तारखा मिळवण्यासाठी निर्माते महिनोन्महिने थांबत असत. नायिकांच्या त्या भाऊगर्दीत (की ताईगर्दीत?) साधनाचं ठळक अस्तित्व होतं यात शंका नाही.
तिचा येथपर्यंतचा प्रवासही एखाद्या कादंबरीला शोभेल असाच. वडील कलासक्त. किंबहुना साधना बोस या आवडत्या अभिनेत्रीवरूनच त्यांनी आपल्या मुलीचं हे नाव ठेवलं. फाळणीचं निमित्त झालं आणि कराचीमध्ये स्थिरस्थावर असलेला हा शिवदासानी परिवार १९५० मध्ये मुंबईत दाखल झाला. साधना तेव्हा केवळ आठ-नऊ वर्षांची होती. मुंबईत येणं हे जणू तिचं भागधेयच होतं. आपल्याला मोठेपणी कोण व्हायचंय याचा गंभीर विचार करणाऱ्या व्यक्ती पुढे नावारूपाला येतात, असं म्हटलं जातं. त्याची सार्थकता साधनाच्या प्रवासातून कळावी. चेहऱ्याला रंग लावून अंगभूत रूपागुणांनी रुपेरी पडदा गाजवायचा हे तिने तेव्हाच ठरवलं होतं. योगायोगाने ‘श्री ४२०’मधल्या ‘मूड मूड के ना देख..’ या गाण्यात नादिराच्या मागे ज्या मुली नाचल्या त्यात साधनाला स्थान मिळालं. ही अदाकारी काही मिनिटांची वा सेकंदांची असेल, मात्र त्यानिमित्त चेहऱ्याला लागलेल्या लालीने तिच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातलं. पुढे महाविद्यालयात नाटकांमधून कामं करणं वगैरे ओघाने आलंच. या नाटकांमधली तिची अदाकारी पाहून तिला अवघ्या पंधराव्या वर्षी पहिली ऑफर आली. अर्थातच तो हिंदी नव्हे तर सिंधी सिनेमा होता. ‘अबाना’ या सिंधी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. त्याच सुमारास प्रसिद्ध निर्माते व फिल्मिस्तान स्टुडिओचे सर्वेसर्वा शशधर मुखर्जी यांनी ‘स्क्रीन’मध्ये दिलेली जाहिरात साधनाच्या नजरेस पडली. फिल्मिस्तानला नवे चेहरे हवे होते. साधनाने ही संधी साधली. योग असा की, साधनाचं कुठे तरी प्रसिद्ध झालेलं एक छायाचित्र मुखर्जीच्या नजरेस पडलं आणि फिल्मिस्तानमध्ये साधनाचा प्रवेश झाला. मुखर्जी बडे निर्माते. आपल्या मुलाच्या म्हणजे जॉयच्या पदार्पणासाठी ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटाचा घाट त्यांनी घातला होता. नायिका म्हणून साधनाची निवड झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आर. के. नय्यर. या चित्रीकरणादरम्यान दोघांचं प्रेम जडलं, मात्र लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी त्यांना सहा र्वष वाट पाहावी लागली. कमालीची सुंदर आणि आकर्षक असणारी साधना प्रत्येक फ्रेममध्ये उठून दिसत होती, उणीव कशाचीच नव्हती. एक बारीक अडचण मात्र होती व ती म्हणजे तिचं मोठं कपाळ. नय्यरना तेच खटकत होतं. यासाठी साधनाने कपाळावरचे केस चप्प बसवून पाहिले, मात्र तो उपाय कोणालाच रुचला नाही. अखेर नय्यर यांनीच यातून मार्ग काढला. त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो हॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री ऑड्री हेपबर्नचा वेगळा हेअर कट. त्यांनी साधनाला ऑड्रीचं अनुकरण करायला सांगितलं.. साधनाच्या चेहऱ्यावर त्याचं भारतीयीकरण होऊन तो झाला ‘साधना कट’. आपल्या चित्रपटसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीच्या नावाने केशभूषा ओळखली जाण्याची ती पहिली व शेवटची वेळ!
१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह इन सिमला’मधील नायक बाजूलाच राहिला आणि चर्चा झाली ती साधनाची. बिमल रॉय यांच्यासारख्या चोखंदळ दिग्दर्शकाने ‘परख’साठी साधनाची निवड केली. ‘ओ सजना बरखा बहार आयी..’ असं म्हणणारी ही साधीसुधी, सुंदर नायिका सर्वाना आवडली. फिल्मिस्तानसोबतचा तीन वर्षांचा करार संपल्यावर तर साधना तेव्हाच्या प्रमुख अभिनेत्रींच्या स्पर्धेत उतरली. ‘हम दोनों’, ‘असली नकली’ (देव आनंद), ‘दुल्हा दुल्हन’ (राज कपूर), ‘राजकुमार’ (शम्मी कपूर), ‘मेरे मेहबूब’ (राजेंद्रकुमार) असे मोठय़ा बॅनर्सच्या आणि आघाडीच्या नायकांच्या चित्रपटांतून तिने मोहक अदाकारी केली. ‘वक्त’पासून ‘औरत’पर्यंत अनेक परींचे चित्रपट तिच्या सौंदर्यामुळे उजळले. राज खोसला या अवलिया दिग्दर्शकाची तर ती आवडती अभिनेत्री. या जोडीने ‘एक मुसाफिर एक हसीना’, ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’ आणि ‘अनिता’ असे चार चित्रपट साकारले. ‘वो कौन थी’मधील ‘नैना बरसे’, ‘लग जा गले’, ‘जो हमने दास्ताँ’ ही गाणी मदनमोहन-लता जोडीचा अत्युच्च अविष्कार मानली जातात. या गाण्यांना साधनाच्या सौंदर्याने खुलवले. साठच्या दशकावर साधनाची अमीट छाप पडली. दृष्ट लागली ती थायरॉइडमुळे. या आजारामुळे तिच्या डोळ्यांनाही काहीसा त्रास जाणवू लागला. त्यावर बोस्टनमध्ये उपचारही झाले. मात्र सत्तरच्या दशकात तिनेच दिग्दर्शित केलेला ‘गीता मेरा नाम’ आपटल्यानंतर तिने अंग काढून घेतलं. विशेष हे की समकालीन नायिकांप्रमाणे माँ, भाभीच्या भूमिका करण्याच्या फंदात ती पडली नाही. अगदी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणं व फोटो काढून देणंही तिने टाळलं. साधना म्हटलं की आठवतात ते नितांतसुंदर डोळे, मोहक हास्य, साधेपणातील सौंदर्य.. आणि तारुण्यच. आजारामुळे सुजलेलं, वयपरत्वे सुटलेलं तिचं रूप पडद्यावर कधीही आलं नाही.
अशी निग्रहपूर्वक निवृत्ती आपल्याकडे दुर्मीळच. तिच्याविषयी चाहत्यांच्या भावना त्यामुळे साठ-सत्तरच्या दशकात होत्या, तितक्याच ताज्या राहिल्या. उतारवयात राहतं घर गमावण्याची वेळ तिच्यावर आली, तेव्हा तिची जिद्द दिसली; पण चाहते दिसले नाहीत. चित्रपटसृष्टीचा जो बहारीचा काळ तिने अनुभवला, तो कधीच सरला होता. ‘ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका.. तेरा मुस्कुराना गजब हो गया..’ हे हसरत जयपुरींचे शब्द पडद्यावर जिच्या मालकीचे होते, तीही आता निघून गेली.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
actor akshay kumar accounced his new upcoming movie bhoot bangala on his birthday
तब्बल १४ वर्षांनी अक्षय कुमार, प्रियदर्शन एकत्र करणार काम; अभिनेत्याच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा, पोस्टर प्रदर्शित
Shruti Marathe will be seen in Junior NTR and Janhvi Kapoor Deora movie
‘ही’ लोकप्रिय मराठी अभिनेत्री ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चित्रपटात झळकणार, फोटो केले शेअर
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा