पाकिस्तानला भरगच्च आर्थिक साह्य जाहीर करणारे जरी सौदी अरेबियाचे राजपुत्र असले तरी त्यात अन्य कोणाचा हात नाही असे मानण्याचे कारण नाही..

आजपासून २१ वर्षांपूर्वी १९९८ साली भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही अणुस्फोट केले. त्यानंतर पुढच्याच महिन्यात इंग्लंड येथे भरलेल्या जी-८ परिषदेत या दोन्ही देशांवर निर्बंध लादले गेले. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या नेतृत्वाखाली आणि इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या यजमानपदाखाली भरलेल्या त्या परिषदेतील या निर्बंध निर्णयामुळे या दोन्ही देशांसमोर चांगलीच आर्थिक अडचण निर्माण झाली. परंतु तरीही पाकिस्तान निश्चिंत होता. या घटनेचा यित्कचितही परिणाम त्या देशावर झाला नाही. त्या वेळी पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठी उत्तम होती असे नाही. उलट तशी ती नव्हतीच. तरीही आर्थिक र्निबधांच्या निर्णयामुळे तो देश विचलित झाला नाही.

याचे कारण सौदी अरेबिया. बेजबाबदार अणुचाचण्यांसाठी संपूर्ण जग पाकिस्तानविरोधात उभे ठाकले असताना सौदी अरेबियाने मात्र या सगळ्याची कोणतीही तमा न बाळगता पाकिस्तानसाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर केली. ती तेलाच्या रूपात होती. आंतरराष्ट्रीय निर्बंध मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला दररोज ५० हजार बॅरल्स खनिज तेलाचा मोफत पुरवठा केला जाईल अशी सौदी अरेबियाची त्या वेळची घोषणा. सौदीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठी उसंत मिळाली आणि आर्थिक र्निबधांना सामोरे जाणे सोपे गेले. पाकिस्तान आज त्यापेक्षाही अधिक आर्थिक अडचणीत असताना सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी त्या देशाशी तब्बल २,००० कोटी डॉलर्सचे विविध करार जाहीर केले. राजपुत्र सलमान सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. भावी राजे म्हणून त्यांचे नाव मुक्रर झाल्यापासून सलमान आशिया खंडाच्या या भागात प्रथमच येत आहेत. आपल्या या दौऱ्याची सुरुवात त्यांनी पाकिस्तानपासून केली. याच देशापासून आपणास दौरा सुरू करायचा होता कारण पाकिस्तान हा सौदी अरेबियासाठी अमूल्य साथीदार आहे, अशा आशयाचे उद्गार सलमान यांनी पाक भूमीवर पाय ठेवल्यानंतर काढले. त्यांच्या दौऱ्याची मातबरी इतकी की त्यांच्या मोटारीचे सारथ्य खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या दोघांत वैयक्तिक चर्चादेखील झाली. सौदीकडून पाकिस्तानला मदतीचा ओघ सुरूच राहील असे आश्वासन या राजपुत्राने आपल्या शेजाऱ्यास दिले. त्याची पाकिस्तानला नितांत गरज आहे. त्या देशाच्या तिजोरीत परकीय चलनाची गंगाजळी आहे फक्त ८०० कोटी डॉलर्स इतकी. पण त्यातून पाकिस्तानला खनिज तेलाचे देणेही चुकवता येणार नाही. कारण पाकिस्तानचे तेलाचे बिलच १२०० कोटी डॉलर्स इतके आहे. वर डोक्यावर १०,००० कोटी डॉलर्सचे कर्ज. खरे तर तो देश दिवाळखोरीच्या मार्गावर मोठय़ा जोमाने निघालेला असताना सौदी राजपुत्राने भारताच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानात पायधूळ झाडली आणि एक प्रकारे भारतालाच डिवचले. वास्तविक आपल्या काश्मिरात गेल्या शुक्रवारी जे काही झाले त्या पाश्र्वभूमीवर राजपुत्र सलमान यांचा पाकिस्तान आणि भारत दौरा पूर्वनियोजित घोषणेप्रमाणे होणार किंवा काय याविषयी संभ्रम होता. काश्मिरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात लपून राहिलेला नाही. त्यामुळे इतक्या मोठय़ा हिंसाचारानंतर हा राजपुत्र पाकिस्तानला भेट देणे टाळेल अशी अपेक्षा काही भाबडे जन व्यक्त करीत होते. ते किती वास्तवापासून दूर आहेत हे खुद्द सलमान यांनी दाखवून दिले. पाकिस्तानी पाहुणचाराचा आनंद घेतल्यानंतर उद्या, मंगळवारी हे राजपुत्र भारतात येतील. काश्मिरातील हत्याकांडाच्या शोकाकुल वातावरणात त्यांचे स्वागत आपणास करावेच लागेल.

हे जागतिक राजकारणाचे उघडे सत्य. काश्मिरात जे काही झाले त्या पाश्र्वभूमीवर आपण पाकिस्तानचा कसा गळा घोटायला हवा याच्या रणगर्जना व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाचे स्नातक मोठय़ा प्रमाणावर करताना दिसतात. एखादा मेसेज फॉरवर्ड करण्याइतके ते सोपेच जणू. त्या पाश्र्वभूमीवर सौदी राजपुत्राने पाकिस्तानला जाहीर केलेला निसंदिग्ध पािठबा समजून घ्यायला हवा. १९७९ सालच्या डिसेंबरात जेव्हा सोविएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसल्या तेव्हा सौदी अरेबियातील ओसामा बिन लादेन या धनाढय़ तरुणाने पाखंडी, साम्यवादी रशियन सनिकांविरोधात आघाडी उघडण्याची तयारी तत्कालीन सौदी राजे अब्दुल अझीझ अल सौद यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी त्यास अनुमती दिली. वरवर पाहता ओसामा हा सौदी अरेबियाच्या पािठब्यावर आपले उद्योग करीत असल्याचे दिसले. ते खरे होतेच. पण प्रत्यक्षात सौदी हातांतून अमेरिकाच आपले धोरण राबवीत होती. ओसामा लादेन यांस थेट मदत उचलून देणे अमेरिकेस शक्य नव्हते. त्यामुळे त्या देशाने आपली मदत सौदी अरेबियाच्या हातून दिली. ती दोन प्रकारची होती. आर्थिक आणि लष्करी. आर्थिक वाटा थेट सौदीकडे दिला गेला. आणि लष्करी मदत देण्याचे काम पाकिस्तानमार्फत केले गेले. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशहा जनरल झिया उल हक यांनी त्या वेळी अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या साथीने हा उद्योग केला. त्याची परतफेड पुढे अनेक पद्धतींनी केली गेली. बीबीसीने नंतर दिलेल्या वृत्तानुसार सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुबॉम्बनिर्मितीच्या खर्चाचा भारदेखील उचलला आणि पाकिस्तानला पायाभूत सोयीसुविधांसाठी भरभक्कम मदतही केली. पुढे सौदी अरेबियात जेव्हा उठावाचा प्रयत्न झाला तेव्हा राजघराण्याच्या मदतीसाठी धावल्या त्या पाकिस्तानी फौजाच.

हे समजून अशासाठी घ्यायचे की पाकिस्तानला भरगच्च आर्थिक मदत जरी सौदी राजपुत्राने जाहीर केली असली तरी ती तेवढीच नाही. तसेच त्यात अन्य कोणाचा हात नाही असे मानण्याचे कारणच नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जामात कुशनेर हे सध्या त्या देशाचे पश्चिम आशिया धोरण ठरवतात. हे कुशनेर राजपुत्र सलमान यांचे खास दोस्त. इतके की या सलमानने नियुक्ती झाल्या झाल्या जेव्हा आपल्या काका-पुतण्यांना डांबून ठेवले तेव्हा त्यात मध्यस्थ म्हणून हे कुशनेर होते. अलीकडेच टर्कीची राजधानी इस्तंबुल येथील सौदीच्या दूतावासात पत्रकार खशोग्जी याची अत्यंत निर्घृण हत्या झाली. त्याची शब्दश खांडोळी केली गेली. कारण हा पत्रकार खशोग्जी राजपुत्र सलमान यांचा कडवा टीकाकार. त्याला धडा शिकवण्याच्या हेतूने खुद्द सलमान यांच्या आदेशावरूनच हे कृत्य केले गेले असे आता पुढे येत आहे. यानंतर अमेरिकेने सौदीविरोधात कारवाईच्या गर्जना केल्या. पण त्या दाखवण्यापुरत्याच. त्यांचे पुढे काही होणार नव्हते आणि काही झालेही नाही. हा सर्व तपशील सलमानने पाकिस्तानला जाहीर केलेल्या मदतीमागचे लागेबांधे समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

कारण हे लागेबांधे आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. याबरोबरीनेच आपल्यासाठी आणखी एक सत्य निर्णायक ठरते. ते म्हणजे तेल. जगातील सर्वात मोठा तेलसाठा सौदी अरेबियाच्या भूमीत आहे आणि आपली कितीही इच्छा असली तरी आपल्या देशात तो पुरेसा नाही. त्यामुळे आपणास आयात तेलावर अवलंबून राहावे लागते. त्याच्या दरातील चढउतार अर्थातच आपल्या अर्थव्यवस्थेस मारक. त्यामुळे या राजपुत्रासमोर आपली मागणी असणार आहे ती तेलाच्या दरातील सातत्याची. अलीकडेच तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने तेलाचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यात सौदी अरेबिया आघाडीवर होता. ही कपात प्रत्यक्षात सुरू झाल्यावर तेलाचे दर वाढणार हे उघड आहे.

या पाश्र्वभूमीवर महंमद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद हे भारतीय भूमीवर पाऊल ठेवतील. त्यासाठी हा पाहुण्यांचा परिचय. उर्वरित ओळख या दौऱ्यानंतर होईलच.

Story img Loader