समाजाच्या व्यंगावर भाष्य करणाऱ्याच्या अंगी एक नतिक तटस्थता असणे अत्यावश्यक असते. ती आरके लक्ष्मण यांच्या अंगी पुरेपूर होती. अन्यथा भाष्यकार गावगन्ना भाषणे देत वा मार्गदर्शन करत हिंडू लागला तर ज्यांचे व्यंग दाखवायचे ती माणसे खांद्यावर हात ठेवू लागतात. आरके लक्ष्मण यांच्याबाबत ही शक्यता दूरान्वयानेही नव्हती. कारण आपला बाज आणि भान त्यांनी कधीही सोडले नाही. एखाद्या शल्यकाच्या डोळ्यावर शोभेल असा जाड, काळ्या काडय़ांचा मोठा चष्मा, कंबरेच्या वर दोन खिसे असलेला पांढराशुभ्र शर्ट, काळी पँट आणि चेहऱ्यावर भारदस्त धीरगंभीरता असे लक्ष्मण यांचे व्यक्तिमत्त्व मूíतमंत शुचिष्मंत भासे. आपल्याला संपादकाइतकेच, किंबहुना कांकणभर जास्तच महत्त्व आहे हे ते जाणून असत. असे महत्त्व असलेल्यांच्या अंगी एक प्रकारचा अहं आणि कमी महत्त्वाच्या लोकांप्रति क्षुद्रतेची भावना असे. ती लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर कधी नसे. त्यांच्या जवळपास येण्यासाठी राजकारणी धडपडत. कारण तेच त्यांच्या टीकेचा विषय असत. पण अशांना किती दूर ठेवावे याची एक लक्ष्मणरेषा लक्ष्मण यांच्या मनात असे. ती त्यांनी कधीही ओलांडली नाही. ते ज्या काळात पत्रकारिता करीत, त्या काळी तृतीयपानी संप्रदायाचा उदय झालेला नव्हता. परंतु हा वर्ग असता तरीही लक्ष्मण उडाणटप्पूपणा करीत हिंडले नसते. आपली जबाबदारी आणि कर्तव्ये यांची जाण असलेली एक पिढीच्या पिढी पत्रकारितेत नांदत होती त्या काळी लक्ष्मण या क्षेत्रात आले. या क्षेत्राचे पावित्र्य भंग होईल अशी एकही कृती त्यांच्याकडून कधी घडली नाही. याचे कारण म्हणजे आपल्या माध्यमाच्या मानमर्यादांचे पालन त्यांनी पुरेपूर केले. काळ्यापांढऱ्या रंगाच्या व्यंगचित्रांच्या चौकटी हेच आपले भाष्यमाध्यम आहे. त्याच्या आत राहूनच आपण व्यक्त व्हायला हवे याचे भान सतत त्यांच्या मनात असे. त्यामुळे ते कधी वाचाळपणा करीत हिंडले नाहीत. पण समाजापासून तुटले आहेत, असेही कधी झाले नाही. ही अशी राजस अलिप्तता फार लोभस असते. लक्ष्मण यांची ती तशी होती. त्यामुळे त्यांना पाहूनही प्रसन्न वाटत असे.
विशेष संपादकीय: कसे बोललात लक्ष्मण!
समाजाच्या व्यंगावर भाष्य करणाऱ्याच्या अंगी एक नतिक तटस्थता असणे अत्यावश्यक असते. ती आरके लक्ष्मण यांच्या अंगी पुरेपूर होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special editorial on rk laxman