उच्चपदस्थांबद्दल मतप्रदर्शन करताना आपण काय बोलतो आणि साधनशुचितेचा नैतिक आग्रह आपण संमेलन आयोजकांकडून ठेवतो का, याचे भान संमेलनाध्यक्षांना असायला हवे..
पंतप्रधानांवरील टीका ताíकक असती तर तेही एक वेळ समजून घेता आले असते. परंतु सर्व पातळी सोडून, पाडगावकर यांच्या निधनास चोवीस तासही व्हायच्या आत त्यांच्या आधी आपणास मोदी यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असे हा साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणू शकतो.. हा विनोद की निर्बुद्धता?
बेडकी फुगली म्हणून बल होऊ शकत नाही आणि पाल ओढली म्हणून तिची मगर होऊ शकत नाही. आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस सध्या गावगन्ना सत्कार घेत जी काही आचरट आणि परस्परविरोधी विधाने करीत आहेत त्यावरून याचा अंदाज यावा. एरवी या बालबुद्धी निदर्शक विधानांची दखल घेण्याचे कारण नव्हते. परंतु त्यांचे ताजे वक्तव्य ती दखल घेण्यास भाग पडते. हे श्रीपाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या पाकिस्तान दौऱ्यावर घसरले. वास्तविक आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे किंवा काय हे कळावयास मार्ग नाही. परंतु भारताच्या ‘पंतप्रधानां’विषयी भाष्य करताना या बेताल गृहस्थाने मंगेश पाडगावकर यांच्याआधी मोदी यांची शोकसभा घ्यावयाची वेळ आली असती असे विधान केले. ते िपपरी-चिंचवड येथील महाविद्यालयात भाषण करीत होते. त्यांच्या या भाषणामुळे सत्कारमूर्तीची बौद्धिक पातळी ही समोरच्या श्रोतृवर्गापेक्षा कमी असू शकते याचा अंदाज योग्य वयात या विद्यार्थ्यांना आला असणार. यामुळे एकंदरच साहित्यिक हा प्राणी पुढील आयुष्यात दुर्लक्षच करण्याच्या लायकीचा आहे, याचीही यथार्थ जाणीव विद्यार्थ्यांना झाली असणार. तेव्हा त्या अर्थाने भावी आयुष्यातील धोक्याची जाणीव करून दिल्याबद्दल विद्यार्थीवर्गाने श्रीपाल सबनीस नामक प्राध्यापकाचे आभारच मानावयास हवेत. या माणसाचे साहित्यिक कर्तृत्व शून्याच्या जवळ आहे. परंतु अलीकडे साहित्य संमेलनासाठी साहित्यिक कर्तृत्वाची किमान आवश्यकतादेखील राहिलेली नाही. कोणीही गणप्या या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडला जाऊ शकतो. अर्थात सदानंद मोरे आदी काही सन्माननीय अपवाद. परंतु अशा अपवादांत बसावेत असे यंदाच्या संमेलनाध्यक्षांचे कर्तृत्व खचितच नाही. सांप्रती संमेलनाध्यक्ष हा स्वागताध्यक्षाच्या हातातील बाहुले यापेक्षा अधिक काही नसतो. यंदा पी. डी. पाटील हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ते शिक्षणसम्राट डी. वाय. पाटील यांचे कुटुंबीय. महाराष्ट्रात शिक्षणसम्राटांची जमात किती उद्योगी आणि उचापती आहे, हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्राध्यापकाची गरज नाही. (अर्थात ती गरज पूर्ण करण्याची िहमत आणि कुवत महाराष्ट्रातील प्राध्यापकांत नाही. या शिक्षणसम्राटांच्या दरबारात हात बांधून उभे राहण्यातच ते धन्यता मानू लागले आहेत, ही बाब अलाहिदा.). तेव्हा स्वागताध्यक्ष पाटील यांना संमेलनात मोठा दौलतजादा करावयाचा आहे. तेही ठीक. कारण ज्या पद्धतीने आणि गतीने या मंडळींनी माया केली आहे तिचा काही वाटा या अशा मार्गाने राजमान्यता मिळवण्यासाठी खर्च झाला तर त्यात काही गर आहे असेही नाही. पूर्वी राजेमहाराजे एरवी कसेही वागत असले तरी पुण्यप्राप्तीसाठी ब्राह्मणांना रमण्यास बोलावीत. अलीकडचे महाराजे हे लेखककवींना बोलावतात. बरे आजच्या या साहित्यिकवर्गास बोलावण्यासाठी फार काही कष्टही करावे लागत नाहीत. रमण्याची तारीख आणि जागा मुक्रर झाली की हा वर्ग आपसूक जमतो. यंदा तो अधिक उत्साहाने जमावा यासाठी स्वागताध्यक्ष पाटील जातीने निमंत्रणे वाटीत महाराष्ट्रभर फिरत आहेत. ही निमंत्रणे देताना पत्रिकेवर संमेलनाध्यक्षापेक्षा आपली छबी अधिक उठून दिसेल याचीही खबरदारी त्यांनी घेतली आहे. नेमक्या याच कारणांमुळे संमेलन आयोजकांना अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांच्यासारखी व्यक्ती हवी असते. आपल्या बौद्धिक तेजाने आणि साहित्यिक सत्त्वाने असे अध्यक्ष हे स्वागताध्यक्षांना झाकोळू शकत नाहीत. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदी सबनीस यांच्यासारखी बिनचेहऱ्याची, बिनबुडाची व्यक्ती आली म्हणून पी. डी. पाटील आणि कंपूस आनंदच वाटला असणार. पण हे सबनीस आपल्या विदूषकी वक्तव्याने तो आनंद हिरावून घेतात की काय याचा घोर आता पाटील यांना निश्चितच लागला असणार.
मध्यंतरी ठाण्यात बोलताना या मराठी संमेलनाध्यक्षाने ‘स्थानिक लेखकांना शुद्धलेखनाचे नियम लावू नयेत,’ असे विधान केले. म्हणजे काय? मुदलात संपूर्ण मराठीच ही स्थानिक भाषा असताना त्यातल्या आणखी कोणत्या साहित्यास शुद्धलेखनाचा नियम लावला जाऊ नये, असे त्यांना वाटते? बोलींमध्येच लिहायचे असेल तर त्या-त्या बोलीची शिस्त पाळावीच लागणार. पण मग भाषेच्या प्रमाणीकरणाचे काय? का तेही स्थानिकतेच्या आधारे करावयाचे? दुसरीकडे त्यांनी स्वागताध्यक्ष पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले. ते एक वेळ ठीकच. ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी,’ असे आपला वाक्प्रचार सांगतोच. तेव्हा त्यांनी संमेलन यजमानाची आरती ओवाळली हे परंपरेनुसारच झाले. परंतु या स्तुतिसुमनांचे कारण काय? तर संमेलनास त्यांनी अनेक ज्ञानपीठ विजेत्यांना बोलावले म्हणून. एवढेच असते तर तेही एक वेळ समजून घेता आले असते. परंतु या श्रीपालास उत्सुकता कसली? तर आता ज्ञानपीठविजेते नेमाडे उदाहरणार्थ काय करणार, याची. त्यावरून यांच्या विचारांची झेप किती दूरवर जाऊ शकते, हे कळावे. मध्यंतरी त्यांनी पुरस्कारवापसीचे समर्थन केले. परत लगेच, असे पुरस्कार परत करून काय होणार, असे विचारण्यासही त्यांनी कमी केले नाही. ताज्या वक्तव्यात त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कसे सुधारावयास हवेत याचे विवेचन केले. परंतु हे श्रीपाल इतके विनोदवीर की हे संबंध सुधारावेत याच हेतूने पंतप्रधान मोदी पाकिस्तानात गेले यावर मात्र ते टीका करतात. पंतप्रधानांवरील टीका तार्किक असती तर तेही एक वेळ समजून घेता आले असते. परंतु सर्व पातळी सोडून ते थेट पंतप्रधानांच्या शोकसभेविषयी भाष्य करतात. त्यातही हा संमेलनाध्यक्ष किती हीन? तर पाडगावकर यांच्या निधनास चोवीस तासही व्हायच्या आत त्यांच्या आधी आपणास मोदी यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असे तो म्हणू शकतो. हे विधान हा विनोद की निर्बुद्धता? की विनोदी निर्बुद्धता? का हा निर्बुद्ध विनोद ? काही समीक्षक एखादा परिसंवाद यावर झोडू शकतील. हे संमेलनाध्यक्ष मोदी यांच्या गोध्राकांडातील भूमिकेबाबतही अस्वस्थ आहेत. ते योग्यच. यावरून त्यांचा नतिकता आणि साधनशुचिता यांचा आग्रह दिसून येतो. ही बाब खरोखरच कौतुकास्पद. परंतु हेच साधनशुचितेचे निकष त्यांनी काही प्रमाणात तरी संमेलन आयोजकांबाबत लावून दाखवावेत. तसे ते त्यांनी लावले तर त्यांच्या नतिक पातिव्रत्याचा निश्चितच आदर वाटेल. अजूनही वेळ गेलेली नाही. संमेलनाचे आयोजन आणि आयोजक यांचेही मूल्यमापन आपण नतिक निकषांवर करू शकतो, हे या सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सिद्ध करून दाखवावे. तसे त्यांनी केल्यास अवघा महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेईल. आपण ज्याच्या शोधात आहोत, ज्याची प्रतीक्षा बहुत काळ आहे तो नि:स्पृह विद्वान हाच असे चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रास वाटून समस्त मराठी जन समाधान पावतील.
नपेक्षा (आदरणीय गोविंदराव तळवलकर यांचे शब्द उधार घेऊन) हे संमेलनाध्यक्ष सबनीस म्हणजे श्रीपाल की शिशुपाल, असा प्रश्न याच महाराष्ट्रास पडेल.