तालिबान आणि आयसिस यांच्यातील संघर्ष सबंध जगासाठीच डोकेदुखी ठरणार असल्याने आपल्यालाही सावध राहावे लागेल..
सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे तालिबानला अमेरिकी रसद मिळाली त्याप्रमाणे सीरियातील संघर्षांत आयसिसला रशियाचे साह्य़ अजिबात झालेले नाही, असे म्हणता येणार नाही. परिणामी एका अर्थाने या दोन्ही संघटना या दोन महासत्तांची अनौरस संतती ठरतात.
इराण आणि पाकिस्तान सीमेवर शनिवारी सकाळी खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे एका पांढऱ्या मोटारीने बिनबोभाट प्रवेश केला तेव्हा त्यातील प्रवाशांना पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पनाही नसणार. बलुचिस्तानच्या वैराण रस्त्यावरून पाकिस्तानात पुरेशी आत आलेल्या या मोटारीवर कसलाही सुगावा लागू न देता आकाशातून एक क्षेपणास्त्र आदळले आणि आतील प्रवाशांना काहीही कळावयाच्या आत मोटारीतील सर्व जण जिवंत जाळले गेले. त्यात एक होता मुल्ला महंमद अख्तर मन्सूर. हा अफगाण तालिबानचा प्रमुख. तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याची हत्या झाल्यानंतर मुल्ला मन्सूर हा तालिबानचा सर्वेसर्वा मानला जात होता आणि गेले दोन महिने अमेरिका त्याच्या मागावर होती. वास्तविक याहीआधी त्याला टिपण्याची संधी अमेरिकेस होती. ती अमेरिकेने साधली नाही. जाणूनबुजून. याचे कारण अमेरिकेला त्यास पाकिस्तानच्या भूमीत मारावयाचे होते. तो हेतू अखेर साध्य झाला. अमेरिकी ड्रोनने त्याचा इतका अचूक वेध घेतला की बचावाची कोणतीही संधी ना त्याला मिळाली ना त्याच्या पाकिस्तानी आश्रयदात्यांना. म्हणजे अर्थातच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला. या हत्येने अमेरिकेने पुन्हा एकदा आपले तंत्रज्ञान काय करू शकते हे दाखवून दिले. याआधी गतसाली १५ नोव्हेंबरला अमेरिकी ओलिसांची हत्या करणारा आयसिसचा जिहादी जॉन हादेखील असाच अचूक टिपला गेला. अमेरिकेने त्यास सीरियात उडवले. रात्री एका हॉटेलात जेवून तो आपल्या मोटारीत बसल्यावर आकाशातील ड्रोनमधून तीन हेलफायर क्षेपणास्त्रे आली आणि जिहादी जॉन जळून खाक झाला. आता मुल्ला मन्सूर. एक तालिबानचा तर दुसरा आयसिसचा. असो. अमेरिकेने आपल्या कारवाईत त्यांना कसे ठार केले याचे रसदार वर्णन करणे हा येथे हेतू नाही. तर या दोन्हीही, स्वत:ला खऱ्या इस्लामी म्हणवून घेणाऱ्या संघटनांतील संघर्षांशी वाचकांना अवगत करण्याचा हा प्रयत्न आहे.
मुल्ला मन्सूर याच्या शनिवारच्या हत्येनंतर तालिबानने लगेचच आपल्या संघटनेची सूत्रे मुल्ला हैबतुल्ला अखुंजादा याच्याकडे दिली. हा इतके दिवस तालिबानी न्यायव्यवस्थेचा प्रमुख होता आणि तो आपल्या क्रौर्यासाठी ओळखला जातो. प्रसंगी त्याने आपल्याही काही सहकाऱ्यांच्या हत्येचा आदेश देण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. यास ना मोबाइल फोन वापरता येतो ना अन्य कोणत्या आधुनिकतेशी त्याचा परिचय आहे. इस्लामचा स्वत:ला सोयीस्कर अर्थ लावणे हे त्याचे काम. अशा व्यक्तीकडे तालिबानची सूत्रे गेल्यामुळे आणि त्याच्या क्रूर लौकिकामुळे संघटनेत एका गटात आनंदाचे वातावरण आहे. एका गटात असे म्हणावयाचे कारण मुल्ला महंमद रसूल या दुसऱ्या तालिबानी नेत्याने फडकावलेले बंडाचे निशाण. मुल्ला रसूल रागावलेला आहे कारण आयसिस या संघटनेला हाताळण्याचा तालिबानी मार्ग त्यास पसंत नाही. त्यामुळे त्याच्या पाठीराख्यांनी मूळ तालिबान्यांवर हल्ला केला आणि आपल्याच पाचपन्नास सहकाऱ्यांना ठार केले. अशा तऱ्हेने तालिबानमध्येच बेदिली माजत असताना अमेरिकेने मुल्ला मन्सूर यास टिपले आणि तालिबानमधील वातावरणच बदलले. या हत्येने नवा नेता निवडण्याची वेळ तालिबानवर आली असली तरी तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याचा मुलगा मुल्ला महंमद याकूब याने मध्ये पडून ही दुफळी बुजवण्यास सुरुवात केली. तालिबानमध्ये अजूनही संस्थापक मुल्ला ओमर यास देवासमान मानले जाते. आता त्याचाच मुलगा नवा प्रमुख मुल्ला हैबतुल्ला अखुंजादा याच्या पाठीशी उभा राहिल्याने संघटना पुन्हा एकदा एकदिलाने कामास लागेल, असे मानले जात आहे. त्याच्या या कामाची दिशा कोणती असेल ते मुल्ला अखुंजादा याने पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच केलेल्या भाष्यांतून दिसून येते. अमेरिकेबरोबर कोणत्याही प्रकारच्या शांतता चर्चेत सहभागी होण्याची गरज नाही, अशा प्रकारचे सूचक विधान मुल्ला अखुंजादा याने केले. याचा अर्थ तालिबान आपला हिंसेचा मार्ग सोडेल अशी चिन्हे नाहीत. याचा अंदाज अर्थातच अमेरिकेला असणार. त्याचमुळे अमेरिकेने मुल्ला मन्सूर यास पाकिस्तानी भूभागात टिपले. ही बाब महत्त्वाची अशासाठी की अफगाणिस्तानातील अमेरिकी तळांवर हल्ले घडवून आणणाऱ्या मुल्ला मन्सूर याच्याशी पाकिस्तानची मात्र शांतता चर्चा सुरू होती. म्हणजे अमेरिकेच्या नजरेतून जो कडवा दहशतवादी आहे तो पाकिस्तानसाठी समेट घडवून आणण्याच्या लायकीचा होता. त्याची हत्या करून अमेरिकेने हे सर्व समीकरणच उद्ध्वस्त केले. त्यामागील वेळ अशासाठी महत्त्वाची की आयसिस ही इस्लामवर मालकी सांगणारी नवदहशतवादी संघटना तालिबानला ललकारू लागली असून आपणच खरे या धर्माचे रक्षक असा तिचा दावा आहे. परिणामी गेल्या काही महिन्यांत आयसिस आणि तालिबान यांच्यातच चकमकी झडू लागल्या असून त्यांत या दोन्ही संघटनांचे शेकडय़ाने कार्यकर्ते बळी गेले आहेत. हा संघर्ष कमी म्हणून की काय आयसिसने थेट सौदी अरेबियाविरोधातच जिहाद पुकारला असून तेथे खऱ्याखुऱ्या इस्लामची स्थापना व्हावी असा या संघटनेचा आग्रह आहे. या पाश्र्वभूमीवर या दोन संघटनांतील फरक समजावून घ्यावयास हवा.
तालिबान स्वत:ला अफगाणिस्तानची नैसर्गिक सत्ताधीश मानते तर संपूर्ण इस्लामी जग आपल्याच आधिपत्याखाली असावे असा आयसिसचा आग्रह आहे. अफगाणिस्तानात आपली राजवट असावी इतकाच तालिबानचा प्रयत्न आहे, तर संपूर्ण पश्चिम आशिया, मलेशिया, इंडोनेशिया या दक्षिण आशियाई देशांत आपल्या नव्या इस्लामी खिलाफतीचा अंमल राहावा असा आयसिसचा हेतू आहे. तालिबानचे बहुतांश सर्व नेतृत्व हे १९७९ साली तत्कालीन सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात केलेल्या घुसखोरीतून जन्माला आलेले आहे. ते स्वत:ला मुजाहिदिन म्हणवते, तर आयसिसच्या जन्मामागे असे कोणतेही कारण नाही. बिगरइस्लामींना संपवणे हे आपले निसर्गदत्त कर्तव्य आहे असे आयसिसचे मत आहे. कर्नल मुअम्मर गडाफी याच्या हत्येनंतर दुभंगलेला लिबिया, सद्दाम हुसेन याची उचलबांगडी आणि नंतर हत्या यानंतर पोरका झालेला इराक यातून आयसिसचा जन्म झाला. अफगाणिस्तान आणि रशियाच्या सीमेवरील मध्य आशियाई देशांतील नैसर्गिक ऊर्जास्रोतांवर आपली मालकी असावी असा तालिबानचा प्रयत्न आहे, तर इराकमधील महत्त्वाच्या तेलसाठय़ांवर आयसिसने आधीच कब्जा केलेला आहे. अमेरिकेतील एन्रॉन, स्टॅण्डर्ड ऑइल आदी ऊर्जा कंपन्यांनी सुरुवातीच्या काळात तालिबानचे लालनपालन केले तर आयसिसला स्वत:कडे असलेल्या तेलसाठय़ांमुळे कोणाचीही मदत घ्यावी लागलेली नाही. अशा तऱ्हेने मूलभूत समानता असलेल्या या दोन संघटना आता आपापसांत एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार असून त्यांतील स्पर्धा ही अधिक क्रूर आणि अधिक मागास कोण हे ठरवण्यासाठीच असणार आहे. सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे तालिबानला अमेरिकी रसद मिळाली त्याप्रमाणे सीरियातील संघर्षांत आयसिसला रशियाचे साह्य़ अजिबात झालेले नाही, असे म्हणता येणार नाही. परिणामी एका अर्थाने या दोन्ही संघटना या दोन महासत्तांची अनौरस संतती ठरतात. त्यांच्यातील ही साटमारी ही जगाची डोकेदुखी ठरेल असे दिसते. या संघर्षांस आणखी एक कोन आहे.
तो म्हणजे इराण. हा शियाबहुल देश सुन्नीप्रधान सौदी अरेबियाच्या विरोधात जो कोणी उभा ठाकेल त्यास मदत करीत असतो. त्याचमुळे सौदीशी लढू पाहणाऱ्या आयसिसला इराणचा छुपा पाठिंबा असून यामुळे हा सर्वच संघर्ष चिघळेल अशी लक्षणे आहेत. यात अलीकडेच आपण इराण आणि अफगाणिस्तान या देशांशी केलेल्या सहकार्य करारामुळे एकाच वेळी आपण आयसिस आणि तालिबान या दोन्ही दैत्यांच्या शेपटावर पाय ठेवला आहे. तेव्हा याची झळ आपणास बसेल ही भीती रास्त ठरते. वास्तविक या संघर्षांत आपली भूमिका काहीही नाही. तरीही हे अनौरस दैत्यांचे आव्हान आपणास स्वीकारावे लागणार असून त्यासाठी लष्करी, सामाजिक आणि महत्त्वाचे म्हणजे धार्मिक वातावरण राखणे महत्त्वाचे ठरेल. विद्यमान नरेंद्र मोदी राजवटीस याची जाणीव असेल ही आशा.

Story img Loader