‘इतरांनी केले ते तुम्हाला चालते. मग तेच जर मी केले तर मला शिक्षा का’ यात इतरांनी केलेल्या गरकृत्याबद्दलची चीड अनुस्यूत आहे वाटत असले, तरी ती तशी नसते.
कोणतेही गरकृत्य, कोणताही भ्रष्टाचार कोणी केला यावर त्याचे मूल्य ठरत नसते. गुन्हा हा गुन्हाच असतो. त्याबद्दलची चीड असेल, तर कोणताही मनुष्य तो करणार नाही. अलीकडे मात्र जुने दाखले देत नव्या गुन्ह्य़ांवर, प्रकरणांवर पांघरूण घालण्याचे, त्यांना मान्यता देण्याचे प्रयत्न सर्रास होताना दिसतात. जनसामान्यांच्या पातळीवर वैयक्तिकरीत्या या केवळ बोलण्याच्याच गोष्टी असतात.
मुंबईतील भुलेश्वर येथील उच्चभ्रूंच्या वसाहतीत राहणाऱ्या एका उच्चभ्रू महिलेने विनातिकीट रेल्वे प्रवास केल्याबद्दल दंड भरण्याऐवजी सात दिवसांचा तुरुंगवास पत्करला, असे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. रेल्वेच्या तिकीट तपासनीसाने तिला जेव्हा पकडले तेव्हा तिच्या ओठांवर ‘भारत माता की जय ’ किंवा ‘इन्किलाब जिंदाबाद’ अशा घोषणा किंवा किमानपक्षी ‘अरे पुन्हा आयुष्याची पेटवा मेणबत्ती’ असे नवक्रांतिगीत होते की काय याचा उल्लेख त्या बातमीत नव्हता. मात्र तिकीट न काढता प्रवास करणे हा गुन्हा असून, त्याबद्दल आपणांस २६० रुपये दंड भरावा लागेल असे जेव्हा त्या महिला तिकीट तपासनीसाने सांगितले, तेव्हा तिने दंड भरण्यास सपशेल नकार दिला. तिला रेल्वे कर्मचाऱ्यांनीच नव्हे, तर खुद्द तिच्या पतीनेही समजावून सांगितले, की दंड न भरल्यास तुला कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षा होईल. परंतु तरीही ती वीरांगना डगमगली नाही. तिला कविवर्य कुसुमाग्रज माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही. ‘टिनोपॉली’ उच्चभ्रूंच्या ‘कॉस्मोपॉलिटनी’ गृहसंकुलांत सहसा अशा ‘व्हर्नाक्युलर’ कवींना प्रवेश दिला जात नसतो. तथापि भुलेश्वरच्या त्या वीरांगनेच्या काळजात नक्कीच ‘सर्पानो उद्दाम आवळा, कसूनिया पाश.. पिचेल मनगट परि उरांतिल अभंग आवेश’ अशाच काव्यपंक्तींचे दांडियानृत्य सुरू असेल. हे जणू शौर्यकृत्यच. तूर्तास इंटरनेटवरील प्रतिक्रियालेखकांकडून त्याची गणना एका सामान्य महिलेने व्यवस्थेच्या श्रीमुखात लगावलेली सणसणीत चपराक अशाच शब्दांत केली जात असून, तिचे ते धाडसी कृत्य देशद्रोही नसून क्रांतिकारी असल्याचे प्रमाणपत्रही अनेकांनी दिले आहे. किंबहुना त्या धर्यशालिनीने पेटविलेल्या या क्रांतीच्या मेणबत्तीची लवकरच मशाल होईल आणि कदाचित पुन्हा एकदा स्वातंत्र्याची तिसरी वा चौथी वा आणखी कितवी तरी लढाई सुरू होईल यात शंका नाही. हे सर्व वाचल्यानंतर काही जणांना नक्कीच असा प्रश्न पडला असेल, की या सगळ्यात कसली आली वीरता आणि कसले आले क्रांतिकारी कृत्य?
तिकीट न काढता प्रवास करायचा हे क्रांतिकृत्य म्हणायचे तर उपनगरी रेल्वेवरील हजारो प्रवासी रोजच ते करतात. रेल्वे ही अशीही राष्ट्राची संपत्ती असल्याने तिचा विनादाम उपभोग घेणे हा आपलाच अधिकार असतो असे मानणारे राष्ट्रभक्त प्रत्येक रेल्वेगाडीत अडक्याला शंभर मिळतील. तेव्हा त्यात एवढे काय विशेष, असे काहींना वाटू शकेल. तेव्हा हे प्रकरण मुळापासून समजून घेतले पाहिजे. ही प्रौढपुरंध्री कोणा सामान्य घरातील नाही. भुलेश्वर येथील धनश्रीमंतांच्या गृहसंकुलात ती राहते. असे असताना तिच्याकडे तिकिटासाठी पसे नव्हते का? मग तिने तिकीट का काढले नाही? क्रेडिट कार्डानी भरलेल्या तिच्या उंची पर्समध्ये तिकिटापुरती चिल्लर रक्कम तर निश्चितच असणार. तरीही ती उपनगरी रेल्वेचा प्रवास विनातिकीट करते, याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. त्या विनातिकीट प्रवासामागे विशिष्ट असे थोर तत्त्वज्ञान उभे आहे. ज्यांचे उभे आयुष्य नाकासमोर चालण्यात आडवे झाले त्यांना कदाचित हा तत्त्वविचार समजणार नाही, परंतु हा सविनय कायदेभंगाचाच आधुनिक प्रकार आहे. त्यास अविनय कायदेभंग असे म्हणतात. विशेष म्हणजे त्यात काडीमात्र देशद्रोह नाही. तिचे दुर्दैव असे की तिला तिकीट तपासनीसाने पकडले. अविनय कायदेभंग करणारास पकडले तरी भय वाटत नाही. पण त्या तिकीट तपासनीसाने तिला चक्क दंड भरण्यास सांगितले. तपासनीसाने तिला तसेच सोडून दिले असते, तर तिचे काहीही म्हणणे नसते. परंतु त्या रेल्वे कर्मचाऱ्याने तिला कायदा दाखविला. त्यासरशी ती उच्चभ्रू वीरांगना सात्त्विक संतापली. ती म्हणाली, ‘जा, पहिल्यांदा नऊ हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या विजय मल्याला अटक करा, मग मी दंड भरीन.’ तिची ती तडफ, तो आवेश पाहून तेथील जुन्या-जाणत्या रेल्वे पोलिसांना नक्कीच ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभकृत विजयरावांच्या त्या संवादाची आठवण झाली असेल. ‘जाओ पहले उसकी साइन ले के आओ, ज्याने या हातावर लिहिले की माझा बाप चोर आहे.’ हा संवाद म्हणजे आपले राष्ट्रीय तत्त्वज्ञानच.
‘एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये’ आदी म्हणींतून हे तत्त्वज्ञान पूर्वी त्याज्य मानत. पण इतरांनी केले ते तुम्हाला चालते. मग तेच जर मी केले तर मला शिक्षा का, असा विचार हल्ली कालजयी ठरतो आहे. यात इतरांनी केलेल्या गरकृत्याबद्दलची चीड अनुस्यूत आहे असे वरवर वाटत असले, तरी ती तशी नसते हे लक्षात घेतले पाहिजे. कोणतेही गरकृत्य, कोणताही भ्रष्टाचार कोणी केला यावर त्याचे मूल्य ठरत नसते. गुन्हा हा गुन्हाच असतो. त्याबद्दलची चीड असेल, तर कोणताही मनुष्य तो करणार नाही. अलीकडे मात्र जुने दाखले देत नव्या गुन्ह्य़ांवर, प्रकरणांवर पांघरूण घालण्याचे, त्यांना मान्यता देण्याचे प्रयत्न सर्रास होताना दिसतात. जनसामान्यांच्या पातळीवर वैयक्तिकरीत्या या केवळ बोलण्याच्याच गोष्टी असतात. भुलेश्वरमधील त्या प्रौढपुरंध्रीसारख्या व्यक्तींचा अपवाद सोडल्यास सहसा तसे कोणी करीत नसते. पहिल्यांदा मल्याला पकडा, मग सिग्नल तोडल्याबद्दल दंड करा, असे कोणी म्हणू गेल्यास त्याची रवानगी गजाआडच होणार हे नक्की. तेव्हा तसे वैयक्तिक व्यावहारिक पातळीवर कोणी म्हणणार नाही. समष्टीच्या स्तरावर मात्र ही भावना प्रबळ होत असताना दिसते. हे असे ‘पण त्याचे काय’ विचारण्याची ‘व्हॉटअबाऊटरी’ हा हल्लीच्या राजकीय, सामाजिक चर्चाविमर्शाचा, वादविवादांचा अविभाज्य भागच बनला आहे. म्हणजे आज भाजपच्या सत्ताकाळातील अमुकअमुक दंगलीबद्दल बोलू गेल्यास, लगेच काँग्रेसच्या सत्ताकाळातील तमुकतमुक दंगलीचा दाखला देऊन ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ असा जणू बिनतोड सवाल केला जातो. आजच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलू गेल्यास लगेच जुन्या भ्रष्टाचारांचे काय, असा प्रश्न केला जातो. हा सवाल चुकीचा नसतो. तो करण्यामागची मानसिकता चुकीची असते. इतरांनी केलेला गुन्हा हा आपल्या गुन्ह्य़ाच्या समर्थनासाठी वापरण्याची ही मानसिकता आहे. यातून आपण जुन्या गुन्ह्य़ालाही नतिक मान्यता देत असतो आणि असे करण्यातून आपण सगळ्याच गुन्ह्य़ांना ‘अ-गुन्हा’ ठरवीत असतो याचे भान बाळगले पाहिजे. विजय मल्या कसा पळाला, या प्रश्नाचे उत्तर क्वात्रोकी कसा पळाला हे नसते. मल्या कसा पळाला हा प्रश्न क्वात्रोकीला पळण्यात साह्य़भूत झालेल्यांनी विचारणे हे अनतिकच. इतरांच्या अनतिकतेकडे बोट दाखविल्याने आपले कृत्य नतिक ठरत नसते ही जाणीवच आज नाहीशी झाल्याचे दिसते आहे. उलट तो आजचा राजमान्य युक्तिवाद बनला आहे. वैचारिक भ्रष्टाचार असे जे म्हटले जाते ते याहून वेगळे काय असते?
विचारांतील या भ्रष्टतेमुळेच ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चनचा ‘जा, पहिल्यांदा त्याची सही घेऊन या’ हा संवाद टाळ्याखाऊ ठरला होता. त्या भ्रष्टतेमुळेच आज ‘जा, पहिल्यांदा मल्याला पकडा’ ही मागणी योग्य आणि व्यवस्थेचे वाभाडे काढणारी वाटत आहे. खरे तर अशा प्रकारच्या विचारांतून आपण व्यवस्थेला अधिक सडवण्याचे काम करीत असतो आणि त्यालाच क्रांती वगैरे म्हणत असतो. अशा क्रांतीतून केवळ ‘सह्य़ा गोळा करणारांची’च फौज तयार होत असते. आपल्याला तशीच फौज हवी आहे का हा खरा सवाल आहे. त्या सवालाच्या उत्तरातच भुलेश्वरची ती महिला वीरांगना आहे की दंडास पात्र अशी फुकटी प्रवासी याचे उत्तर दडलेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा