वाघोबा म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटले तरी खाणारच हे जर सत्य असेल तर सक्तवसुली संचालनालयादींची फिकीर न बाळगता उभे राहण्याची हिंमत हवी..
विविध आणि कथित भ्रष्टाचार आरोपांसाठी सक्तवसुली संचालनालयाचा दट्टय़ा सहन कराव्या लागलेल्या नेत्यांना अचानक हिंदूत्वाचा आणि त्या आडून भाजपचा पुळका येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘निरोपाचा’ संवाद या बंडखोरांवरील तत्त्वाचा शेंदूर खरवडून टाकणारा ठरतो. गेल्या दोन दिवसांच्या बंडखोरी, फाटाफूट नाटय़ानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यात विद्यमान सरकार स्थापनेमागील पार्श्वभूमी जशी होती तशीच विद्यमान पेचावरील टिप्पणीही होती. त्यातील एक वाक्य फार महत्त्वाचे. ‘‘मी जर मुख्यमंत्री म्हणून अयोग्य वाटत असेन तर अन्य कोणा शिवसेना नेत्याने हे पद स्वीकारावे,’’ असे जाहीर करीत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सोडून पुन्हा ‘मातोश्री’वर मुक्काम हलविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचे हे वाक्य सूचक अशासाठी की त्यातून या फाटाफुटीच्या राजकारणामागील सत्य आणि तथ्य समोर येते. ते असे की भावना गवळी असोत वा प्रताप सरनाईक वा मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे प्रमुख यशवंत जाधव यांच्या पत्नी. हे आणि असे अनेक अन्य एकनाथ शिंदे यांच्या आणि म्हणून भाजपच्या कळपात जाऊ इच्छितात त्यामागील कारण हिंदूत्व हे अजिबात नाही. या आणि अशा सर्वामागे लागलेला (की लावला गेलेला?) सक्तवसुली संचालनालय वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा हे खरे कारण या सर्वाच्या फुटीमागे आहे. ही बाब इतक्या ढळढळीतपणे समोर येणे हे नैतिकतावादी भारतीय जनता पक्षास शोभणारे नाही. उद्धव ठाकरे यांनी जाता जाता मारलेली ही पाचर शिंदे आणि कंपूसही वेदनादायी ठरणार हे निश्चित.
याचे कारण या नवहिंदूहितरक्षकांस हिंदूहिताची इतकीच चाड असती तर शिंदे वा अन्य महोदयांनी गेली अडीच वर्षे मंत्रीपदाचा उपभोग घेतला नसता. ‘काँग्रेस वा राष्ट्रवादी यांचा सहभाग असलेल्या सरकारात मी मंत्री होणार नाही,’ असा आनंद दिघे-बाणा दाखवत मंत्रीपद नाकारणे त्यांच्या पट्टशिष्य म्हणवून घेणाऱ्यास शक्य होते. अशी काही त्यागभावना शिंदे यांनी दाखवल्याचा तपशील उपलब्ध नाही. बरे पक्षादेश म्हणून त्यांना मंत्रीपद स्वीकारावे लागले हे मान्य केले तरी त्यानंतरची कार्यालयीन-कामकाज बाह्य उस्तवारी करण्यास या एकनाथाने कधी नकार दिल्याचेही समोर आलेले नाही. इतकेच काय पण नवी मुंबईतील उड्डाणपुलाच्या कंत्राटातील झाडांची कत्तल व्हावी, यासाठी कोण प्रयत्न करत होते हे सर्वज्ञात आहेच. पण ती झाडे वाचवण्यासाठी शिंदे यांनी हिंदूत्व पणाला लावल्याचे दिसले नाही. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण लावून धरले आणि त्यांचा हा डाव उघडकीस आला आणि म्हणून फसला. त्याही वेळी ‘राष्ट्रवादी-काँग्रेसी सरकारच्या काळातील कंत्राटाची काळी सावली माझ्या सुपुत्रावर नको’ अशी काही भूमिका शिंदे यांनी घेतली नव्हती. तशी ती त्यांनी घेतली होती असे असल्यास त्याबाबत त्यांनी भाष्य करावे. पण ते अथवा त्यांचे अन्य कोणतेही प्यादे हे असे काही करू धजणार नाहीत. याचे कारण यांचे कथित हिंदूत्वप्रेम हेच मुळी बेगडी आणि कातडीबचाऊ आहे. तसे ते नसते तर या कंपूने बुधवारी गुवाहाटीहून प्रसृत केलेल्या पत्रातील मुद्दे त्यांच्याकडून सरकारात असतानाच उचलले गेले असते. उदाहरणार्थ अनिल देशमुख वा नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा मुद्दा. या सर्वाच्या मते त्यांच्यावरील कारवाई न्याय्य होती. ती तशी आहे हे कबूल केले तरी त्याबाबत हे सारे इतके दिवस का मूग गिळून बसले हा प्रश्न उरतो. वास्तविक सत्य हे आहे की ज्या वेळी शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या युतीचा निर्णय झाला त्या वेळी सेनेतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्तावित केली गेलेली व्यक्ती होती एकनाथ शिंदे. तथापि ज्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अजितदादा पवार वा जयंत पाटील अशी एकापेक्षा एक तगडी मंडळी आहेत त्याचे नेतृत्व तुलनेने अननुभवी शिंदे यांना देणे योग्य नाही, अशी बाब समोर आली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. त्याची भरपाई ते आता उपमुख्यमंत्रीपद मिळवून करू पाहतात. त्यांच्या जोडीने त्यांच्या फुटीर गटांतील १४ जणांस मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे या सर्वाविरोधात सक्तवसुली संचालनालयादी यंत्रणांच्या कारवाईच्या तलवारी म्यान केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणजे जे पश्चिम बंगालात घडले वा दिल्लीत ‘आप’च्या रूपाने घडते आहे ते महाराष्ट्रातही घडले. फरक इतकाच की त्या राज्यातील प्रादेशिक नेते ममता बॅनर्जी यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि दिल्लीत ‘आप’ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा बाण्याने अजून तरी ताठ उभा आहे. आपल्या सहकाऱ्यांस तसा विश्वास देण्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कमी पडले हे निश्चित. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांचा कणाही ममता बॅनर्जी यांच्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक लेचापेचा आहे हेही नाकारता येणार नाही. परिणामी देशातील – आणि अर्थातच राज्यांतीलही- हिंदूधर्म हितरक्षकांस सध्या आदरणीय झालेले कृपाशंकर सिंग, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील वा तत्समांच्या जोडीला एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, भावना गवळी वा श्रीमती जाधव हे नवहिंदूत्ववादी बसलेले दिसतील. सोबत राणा दाम्पत्य वगैरे आहेतच. म्हणजे अतुल भातखळकर, माधव भांडारी, संजय केळकर वा तत्सम हे जुनेजाणते हिंदूत्ववादी आपल्या नेहमीच्या कामात मग्न राहतील याची हमी. याचा अर्थ असा की इतक्या साऱ्या ‘नवहिंदूत्ववाद्यांचे’ काय करायचे याचा विचार भाजपने केला न केला तरी काही किमान विचारक्षमता असणाऱ्यांनी तरी करायला हवा. त्यात अर्थात प्राधान्याने हिंदू असतीलच. राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा. सध्याच्या या उलाढालीत सत्ता गेलीच तर त्या पक्षास पुन्हा एकदा आपली मराठी मुळे शोधावी लागतील. प्रादेशिक अस्मिता आणि हिंदूत्व हे जणू परस्परविरोधी मुद्दे आहेत असे सध्याचे वातावरण. म्हणूनच ममता बॅनर्जी यांना अहिंदू ठरवण्याचा प्रयत्न होतो आणि अरविंद केजरीवाल यांच्या धर्मनिष्ठेवरही शंका घेतली जाते. ती त्यांनी ज्या आक्रमकपणे दूर केली ती आक्रमकता उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या अनुयायांस विकसित करावी लागेल. वाघोबा म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटले तरी खाणारच हे जर सत्य असेल तर सक्तवसुली संचालनालयादींची फिकीर न बाळगता उभे राहण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांस दाखवावी लागेल. बाकी हिंदूत्वाशी प्रतारणा, भ्रष्टाचारात हातमिळवणी वगैरे जे मुद्दे एकनाथ शिंदे आणि सहकारी उपस्थित करतात त्यांना मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील भिकार हास्य कार्यक्रमांतही स्थान मिळणार नाही, इतके ते अदखलपात्र आहेत. सुखराम ते विद्याचरण शुक्ल ते कृपाशंकर सिंग अशा अनेकांना पचवून समाधानाचे ढेकर देणाऱ्यांनी उगाच भ्रष्टाचार वगैरे मुद्दे उपस्थित करणे हे ‘अति झाले’ असेही म्हणण्याच्या पलीकडचे. तेव्हा नग्न सत्य हे की हे सारे फक्त आणि फक्त सत्ताकारण आहे. एकाने गाय मारली तर दुसऱ्याचे वासरू मारण्याइतके निगरगट्ट आणि निष्ठुर. ते सुरतेच्या भूमीवर उलगडले हा एक दुर्दैवी योगायोग. एके काळी यवनी आक्रमकांचे नाक कापण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही धनाढय़ नगरी ‘बदसुरत’ केली. त्या सुरतेनेच छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्यांस तोंड लपवण्याची संधी देऊन एकूण राजकारणच बदसुरत केले. हा इतिहासाचा एक सूडच.