तब्बल ३८ हजार फुटांवरून आठ मिनिटे ते विमान खालच्या दिशेला घरंगळल्यासारखे चालले होते, मिनिटागणिक ३००० फूट खाली येत होते, असा एक अंदाज आहे.. तो खरा असेल, तर १६ शाळकरी मुलांसह एकंदर १४४ प्रवाशांची त्या आठ मिनिटांतील मन:स्थिती कशी असेल? आपापल्या जागांवर, सावरून बसण्याचा प्रयत्न करीत असतील का ते सगळे? हे सावरणे क्षणिकच ठरणार, याची कल्पना आली असेल त्यांना? हे प्रश्न आता प्रश्नच राहतील. सध्या माहीत आहे ते इतकेच की, स्पेनमधील बार्सिलोनाहून जर्मनीच्या हॅम्बुर्ग या शहराकडे निघालेले जर्मनविंग्ज या विमानसेवेचे उड्डाण क्रमांक ४ यू- ९५२५ आल्प्स पर्वतराजीत मंगळवारी (भारतीय वेळेनुसार) दुपारी कोसळले आणि १४४ प्रवासी व सहा कर्मचारी यांपैकी कोणीही वाचू शकले नाही. इतका भीषण अपघात युरोपमध्ये २००८ नंतर प्रथमच झाला आहे.. गेल्या काही महिन्यांत विमानांचे मोठे अपघात झाले, परंतु यापैकी दोन मलेशियन विमानसेवेचे होते. युरोपीय-अमेरिकी प्रवासीही त्या मलेशियन विमानांमध्ये असल्याने हळहळ पाश्चात्त्य जगातही व्यक्त होणे तेव्हा स्वाभाविकच होते. पण या स्वाभाविक हळहळीचा एक अटळ, अनिष्ट परिणामही झाला. मलेशियासारख्या आशियाई देशातील विमानसेवेच्या विश्वासार्हतेवर पाश्चात्त्यांच्या मनांत प्रश्नचिन्ह लागले. वास्तविक त्याही वेळी- म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून, युरोपातील स्वस्त विमानसेवादेखील विश्वासार्हता गमावत असल्याची चिन्हे होतीच. युरोपच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचा अटळ परिणाम सस्त्या युरोपीय विमानसेवांवरही होतच होता. मात्र अपघात हा अपघातच असतो. त्यावरून अख्ख्या विमानसेवेच्या विश्वासार्हतेबाबत मते बनवू नयेत, याचा साक्षात्कार युरोपीय मनाला आता होईल. ज्या ‘जर्मनविंग्ज’चे विमान मंगळवारी कोसळले, त्याची सर्वागीण तपासणी डिसेंबर २०१३ पासून झाली नव्हती आणि दैनंदिन तपासणीत तर आदल्याच दिवशी- सोमवारी एका दरवाजात अगदी कमी महत्त्वाचा का होईना, पण बिघाड आढळला होता. या नगण्य बिघाडाचे वृत्त अपघातानंतर दिले ते ‘बँकॉक पोस्ट’ या आशियाई दैनिकाने, हेही बोलके आहे. विश्वासार्हतेचा प्रश्न विमानसेवांबाबत खरा नसून, आशियाई आणि युरोपीय मानसिकतांबाबत मात्र खरा आहे, हे अशा बातम्या कोठे याव्यात यातून समजते. तज्ज्ञमंडळी अर्थातच या मानसिकतांच्या पलीकडे जाऊन त्यांचे काम करताहेत आणि काही तज्ज्ञांनी, अपघातग्रस्त विमान गेली २४ वर्षे ‘दररोज सरासरी ५.३ उड्डाणे’ करीत होते, या आकडेवारीच्या आधारे विमानाच्या तंदुरुस्तीविषयी साधार शंका घेतलेली आहे. इतक्या वेळा ये-जा करावी लागल्यास, उडताना आणि उतरताना विमानाच्या बाहेरील बाजूस होणारे हवेचे घर्षण आणि आतील बाजूने पडणारा हवेचा दाब यांचेही प्रमाण वाढलेलेच असल्याने विमानाच्या पत्र्यावर परिणाम होतो, हा १९८८ साली हवाई बेटांवर एका बोइंग-७३७ जातीच्या विमानास झालेल्या अपघातातून निघालेला निष्कर्ष येथेही लागू पडला असावा, असे गणित या तज्ज्ञांनी मांडले आहे. हे विमान ज्या ‘एअरबस- ए३२०’ या जातीचे होते, ती ‘सुरक्षित’ मानली जाते, असा निर्वाळा सर्वच तज्ज्ञ आजही देतात. आपल्या एअर इंडियाच्या ताफ्यापैकी १४, गोएअरच्या ताफ्यातील १९, तर ‘इंडिगो’कडील ६६ विमाने याच जातीची आहेत. तेव्हा एक विमान कोसळले म्हणून कोणतीही अढीयुक्त भीती बाळगण्याऐवजी तज्ज्ञ पुढे काय म्हणतात, यासाठी थांबलेले बरे. तोवर दु:खातून सावरायचे आहे, हेच फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या सरकारप्रमुखांनी बुधवारी या घटनेनंतर एकत्र येऊन दाखवून दिले.

Story img Loader