कोणी कोणाला पुरस्कार द्यावा, याला सध्या धरबंध राहिलेला नाही. जरासे नाव मिळाले की पुरस्कारांची रांग लागत असल्याने सामान्य कुवतीच्या कलाकारांनाही आपले हात गगनाला पोहोचल्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. मॉरिशसला होणारा ‘अजिंक्यतारा पुरस्कारा’चा कार्यक्रम ऐन वेळी रद्द झाल्याने त्यात सहभागी होणाऱ्या १२२ मराठी कलाकारांच्या भाळी जे दु:ख आले, त्याचे कारण नेमके हेच आहे. पुरस्काराचा मान तो देणारा आणि घेणारा या दोघांच्याही कर्तृत्वाशी निगडित असायला हवा, याचे भान सुटल्यामुळे पायलीला पासरीभर पुरस्कार मिळवून अनेक कलाकार धन्य होतात, तर नटनटय़ांबरोबर छायाचित्रे काढण्याचा बावळट शौक असलेल्या धनिकांना असल्या पुरस्कार सोहळ्यात स्वत:ची टिमकी वाजवून घेता येते. पुरस्काराचीच उंची वाढवणारे कलाकार दुर्मीळ होत असताना पुरस्काराचे महत्त्व ते काय राहणार? कर्तृत्व आणि त्याची समाजाकडून मिळणारी पावती यांचे संबंध विषम होऊ लागले, की खुजी माणसेच स्वत:ला मोठे समजू लागतात. फसलेला समाज या खोटय़ा प्रतिमांच्या प्रेमात पडतो आणि तेच सत्य आहे, असेही समजू लागतो. अजिंक्यतारा पुरस्काराचे वेगळेपण म्हणजे तो दूरदेशी होणार होता. एरवी स्वखर्चाने कुठे जायचे म्हणजे कपाळावर आठय़ा पडणारे सगळे जण हा पाहुणचार मौजेचा करण्यासाठी उत्साहात असणे स्वाभाविक होते. आपल्याला बोलावणारे कोण आहेत, त्यांनी नेमकी काय व्यवस्था केली आहे, याबद्दलचा तपशील विचारण्यापेक्षा मॉरिशसला जायला मिळते आहे, याचेच स्वप्न अधिक मोठे वाटणारे लहान कलावंत मराठी चित्रपटसृष्टीत मोठय़ा संख्येने आहेत. साहित्य आणि कलांच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील कलावंतांकडे वेगळ्या नजरेने का पाहिले जाते, याचे उत्तर या मनोवृत्तीत दडलेले आहे. राजकारणात आलेल्या बहुतेकांना असले पुरस्कार देण्यात हल्ली फार रस असतो. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांना बोलावून आपल्या मतदारांना डोळा मारणाऱ्या असल्या लोकांकडे पुरस्कार देण्यासाठी पैसा कुठून येतो, याचा विचार घेणारा तर कधीच करत नाही. अजिंक्यतारा पुरस्काराबद्दल संबंधित कलाकारांना कोणतीच माहिती नव्हती आणि तरीही ते परदेशगमनासाठी एका पायावर तयार झाले. आयोजकांना तर पुरस्कार देतो म्हणजे उपकारच करतो असे वाटत असल्याने या कलावंतांची विमानतळावर तपासणी सुरू होईपर्यंत कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कळवण्यात आली नाही. इतक्या ऐन वेळी रद्द करण्याएवढे कोणते सबळ कारण होते, हेही सांगण्यास कुणी तयार नाही. हे जे अपरिहार्य कारण होते, ते अगदी शेवटच्या क्षणीच कसे घडले, याचाही खुलासा करण्याची जबाबदारी कुणी घेत नाही. पुरस्कारांच्या अशा कार्यक्रमात सहभागी होताना, ज्यांना आपल्या प्रतिष्ठेची किंमत आहे, अशांनी तरी काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. ती न घेतल्यामुळे अपमान झाल्याची भावना निर्माण होते. घेणाऱ्याने देणाऱ्याचे काय घ्यावे, याचा विचार न करण्याएवढा उथळपणा आणि सवंगपणा सध्या अध्र्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कलावंतांमध्ये पसरू लागला आहे. पुरस्कार देऊ इच्छिणाऱ्यांना जरब वाटावी, असे कलावंत नसल्याने अशा घटना वारंवार घडतात. आपल्या कामगिरीमुळे पुरस्कार आपल्यापर्यंत चालत यायला हवेत, असे वाटणाऱ्या सगळ्यांनी काळजी घेतली तरच त्याला आळा बसू शकेल. अन्यथा औट घटकेच्या कचकडय़ाच्या दुनियेत मिळणारे असे पुरस्कारही तेवढेच बेगडी आणि तकलादू वाटू लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा