संपत्ती व समाधान यांच्यात समतोल साधणारा व्यवहारी मार्ग कोणता, असा प्रश्न सध्या वारंवार केला जातो. गीतारहस्यात त्याचे उत्तर सापडते आणि भारतीय तत्त्वविचारांकडे नव्याने पाहण्याची आवश्यकता लक्षात येते.
युरोप व अमेरिकेने गेल्या पन्नास वर्षांत भरपूर समृद्धी उपभोगली. पण तेथील माणसाला समाधान मिळाले नाही. उलट तो अधिकाधिक उपभोगाच्या मागे लागला. झटपट पैसे मिळविण्यासाठी चुकीचे मार्ग निवडले गेले. त्यातून आर्थिक मंदी आली. मंदी कोणत्याही नैसर्गिक कारणांमुळे आलेली नाही, तर आत्यंतिक नफा कमविण्याचा काहीजणांचा हव्यास हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे.
मंदीमुळे तेथील तरुणवर्गापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. समृद्ध जीवनशैलीची सवय झालेल्या या वर्गाला अचानक काटकसरीची सवय लावून घ्यावी लागते. त्याचबरोबर बचत केलेल्या पैशांवर जगणे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत आहे. समृद्ध पश्चिम सध्या धास्तावली आहे.
चीनमध्येही असमाधान आहे. कारण आर्थिक सुधारणेतून आलेल्या नव्या जीवनशैलीशी तेथील लोकांना मानसिकरीत्या जुळवून घेता आलेले नाही. रोजच्या स्पर्धेपेक्षा पूर्वीची आर्थिक स्थिरता वा सुरक्षा त्यांना हवीहवीशी वाटते. (आकलन, २ ऑक्टो. २०१२) भारतात वेगळी स्थिती नाही. गेल्या वीस वर्षांत उच्च आर्थिक वर्गात जे सहज ढकलले गेले ते सुधारणांवर समाधानी आहेत, पण वाढती महागाई व अस्थिरतेला कसे तोंड द्यावे हे कोटय़वधी लोकांना समजत नाही. मंदीमुळे रोजगार नाही. रोजगार मिळेलच असे शिक्षण नसल्याने तरुण नाराज आहे तर निवृत्तीवेतन नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक कातावले आहेत. श्रीमंती जीवनशैली हवी आहे, पण त्यासाठी लागणारी साधने हाताशी नाहीत वा सरकारकडून मिळत नाहीत अशी भारतातील कोटय़वधी जनतेची स्थिती आहे. याउलट अशी साधने निर्माण करून समृद्ध झालेली पाश्चात्त्य जनताही अचानक संकटाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे समृद्ध जीवनशैली समाधान देते का, असे प्रश्न करू लागली आहे.
पाश्चात्त्यांचा हा प्रश्न भारतीयांचा अतिआवडता आहे. कारण भौतिक सुखातून कधीही समाधान मिळणार नाही, म्हणून आत्मसुखाच्या मागे लागा, अशी शिकवण या मातीत मुरलेली आहे. भौतिक समृद्धी मिळविण्याबद्दल भारतात अनास्था आहे. पण भौतिक सुख नकोसेही वाटत नाही. हे गेल्या वीस वर्षांतील अनुभव सांगतो. बाजारव्यवस्थेमुळे माणसे सुखाच्या मोहात पडली, असा आरोप केला जातो. पण मुळात भारतीयांना सुख आवडत होते. म्हणून बाजारव्यवस्था इथे टिकली. सुखाची आवडच नसती तर ती व्यवस्था टिकली नसती. मात्र सुखाचा हा अनुभव घेण्यासाठी कष्ट, शिस्त, अभ्यास, साहस हे गुण अंगी बाणवावे लागतात. ते भारतीयांना जमत नाही. यापेक्षा गरिबीतील आळस अधिक आवडतो. त्याला तत्त्वज्ञानाचे स्वरूप देतो. इतकी धडपड करूनही पाश्चात्त्य देशांत समाधान कुठे आहे, असा प्रश्न कुत्सितपणे विचारतो. पाश्चात्त्य देशांत समृद्धीबद्दलची उदासीनता वेगळ्या कारणांनी आली आहे आणि आपल्याकडील उदासीनतेची कारणे वेगळी आहेत, हे लक्षात घेतले जात नाही.
विज्ञान व तंत्रज्ञान हाती आल्यावर गेली सात-आठशे वर्षे युरोप भौतिक समृद्धीचे अधिकाधिक टप्पे गाठत गेला. यामुळे समाजाला पुष्टी आली. तो समाज श्रीमंत व सामथ्र्यवान झाला. पण त्याला शांती मिळाली नाही. याउलट गेली दीड-दोन हजार वर्षे भारत शांती मिळविण्याच्या मागे लागला. ती अगदी मोजक्या संतांना मिळाली असली तरी ९५ टक्के समाज पुष्ट, भरदार, सामथ्र्यवान झाला नाही. युरोपने भरपूर कष्ट केले, विज्ञानाला हाती धरून नवनवीन साधने बनविली, बँका स्थापन करून भांडवलाला संस्थात्मक स्वरूप दिले. त्यातून व्यापार वाढविला. बाजारपेठा जन्माला घातल्या. यातून समाज पुष्ट झाला. तरी मानसिक असंतोष कायम राहिला. शेवटी असंतुष्टताच येणार असेल तर इतकी दगदग करा कशाला असे म्हणून भारत शांतीच्या मागे लागला. पण त्याला फक्त पुस्तकी शांती मिळाली. समाज दरिद्री राहिला.
समृद्धी व समाधान याचा समतोल कसा साधायचा हा यातील कळीचा मुद्दा असून सुदैवाने भारतीय तत्त्वज्ञानातच याचे उत्तर सापडते. तथापि भारतीय तत्त्वविचारांकडे तुच्छतेने पाहण्याची सवय लागल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. इथे भारतीय तत्त्वविचारांचा उल्लेख केला आहे. भारतीय आचार-विचारांचा नव्हे. आचार-विचारांमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत व त्यातील कित्येक कालबाह्य झाले आहेत. पण समृद्धी व समाधान एकाच जीवनात कसे साधायचे या समस्येचा खोल विचार व त्यावर सर्वसामान्य माणसाला झेपेल असे उत्तर भारतीय तत्त्वविचारांत मिळते. त्याचा उत्तम ऊहापोह लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्या’त सापडतो*.
असमाधानाचा योग्य अर्थ लोकांच्या ध्यानी आला नाही म्हणून देशात दारिद्रय़ आले. असंतोष हा कष्टी करणारा वाटला तरी त्यामध्येच भावी उत्कर्षांचे, ऐश्वर्याचे बीज असते. महाभारतानेच हे सांगितले आहे. विद्या, उद्योग व ऐश्वर्याविषयी असंतोष हे क्षत्रियाचे गुण होत, असा स्पष्ट उपदेश व्यासांनी युधिष्ठिरास केला होता. चांगल्या गोष्टींबाबत नेहमीच असंतोष असावा, म्हणजे त्या अधिक चांगल्या करता येतात असे महाभारताचे प्रतिपादन आहे. म्हणून ‘प्राप्त परिस्थितीत कुजत न राहता त्यामध्ये यथाशक्ती शांत व समचित्ताने उत्तरोत्तर अधिक सुधारणा करीत ती परिस्थिती शक्य तेवढय़ा उत्तमावस्थेत आणण्याची जी इच्छा तिला मूलभूत होणारा असंतोष वाईट नाही’ असे टिळक ‘गीतारहस्या’त म्हणतात. असंतोषाकडे पाहण्याची ही सकारात्मक दृष्टी आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञानात दिसते. म्हणूनच विज्ञानात नवनवीन शोध लागतात.
मात्र त्याचबरोबर केवळ नवनवीन विषयांच्या उपभोगासाठी ‘आशेवर आशा रचून’, केवळ ऐहिक सुखाच्या मागे एकसारखे धावण्याच्या वृत्तीला भगवद्गीतेच्या कर्मयोगशास्त्रात आसुरी संपत्ती म्हटले आहे. अशी धावपळ कर्मयोगाला मान्य नाही. काम अधिक चांगले घडावे यासाठी असंतुष्ट असणे हे कर्मयोगाला मान्य आहे, पण केवळ उपभोगासाठी तळमळत राहणे मान्य नाही. असमाधान येते म्हणून ऐश्वर्याची आस न धरणे हा मूर्खपणा आहे. पण अमर्याद संपत्तीची हाव धरणे हा त्याहून अधिक मूर्खपणा आहे. कारण त्यातून तीव्र असमाधानच वाटय़ाला येते. म्हणून असंतोष मर्यादेत ठेवायचा. ‘मनाचा निश्चय करून, दु:खकारक तेवढीच तृष्णा सोडणे ही यातील युक्ती आहे’, असे टिळक सांगतात. यामागचे कारण सरळ आहे. परक्याच्या ताब्यात असते ते दु:ख व स्वत:च्या ताब्यात असते ते सुख अशी सोपी, सहज पटणारी व्याख्या मनुस्मृतीत दिली आहे. बाजारव्यवस्थेत आपले सुख बाजाराच्या, म्हणजे परक्यांच्या हातात गेले आहे. पण कशात सुख शोधायचे याचा निर्णय मी स्वत: घेतला व माझ्या क्षमता लक्षात घेऊन फक्त तेवढीच सुखे मिळविण्यासाठी प्रयत्न केला, तर सुख माझ्या बऱ्यापैकी ताब्यात येते. कारण काय हवे व काय नको, याचा निग्रह मी करू शकतो.
तरीही माणसाला दु:ख होऊ शकते. कारण माणूस ठरवितो तसेच फळ मिळेल याची खात्री नसते. अथक प्रयत्न करूनही यश मिळत नाही. याचे कारण फळ हे केवळ एका माणसाच्या कामावर अवलंबून नसते तर अनेकांच्या कामाचा तो एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे ते विशिष्ट व्यक्तीला मिळेलच याबाबत कोणतीच खात्री देता येत नाही. हे लक्षात घेऊन माणसाने सतत नव्या उमेदीने काम करण्यास लागावे असे गीता सांगते. माझ्या कामाचे फळ, मलाच व मला हवे तसे व तात्काळ मिळावे, असा हट्टाग्रह धरलात तर दु:खाच्या मार्गाला प्रारंभ झालाच म्हणून समजा, असे कर्मयोगशास्त्राचे सांगणे आहे. सुखी वा दु:खी कधी व्हायचे हे आपल्या हातात आहे. दु:खाप्रमाणे सुखावरही संतोषाचा लगाम कधी घालायचा ते केवळ माणसाच्या मनोनिग्रहावर अवलंबून आहे, असे कर्मयोगशास्त्र सांगते. हे शास्त्र माणसाला स्वतंत्र करते.
यासंदर्भात टिळकांनी कठोपनिषदातील कथेचा चपखल दाखला दिला आहे. नचिकेताला यमाने वर दिले तेव्हा नचिकेताने प्रथम बापाची प्रसन्नता व नंतर ऐश्वर्य देणाऱ्या यज्ञकर्माचे ज्ञान मागितले. त्यानंतरच त्याने आत्मज्ञानाची मागणी केली. या वेळी यम अधिक संपत्ती देऊ लागला तेव्हा त्याने ती नाकारली आणि आत्मज्ञानाचा आग्रह धरला. म्हणजे जगात काम करण्याची हातोटी नचिकेताने आधी मागून घेतली आणि नंतर आत्मज्ञानाच्या मागे लागला.
काम करण्याची हातोटी हा नचिकेताचा पहिला वर भारताने लक्षातच घेतला नाही, तर आत्मज्ञानाची मागणी हा दुसरा वर युरोपने लक्षात घेतला नाही. कौशल्याने कामे करण्याची हातोटी साध्य झालेल्याला संपत्ती मिळते. पण त्याला आत्मज्ञानाची जोड दिली नाही तर ती आसुरी होते. युरोप-अमेरिकेत ती तशी झाल्याने तेथे असमाधान दिसते तर कौशल्य नसल्याने भारतात दारिद्रय़.
गीतारहस्यात टिळक म्हणतात, ‘‘नुसत्या ऐश्वर्यापेक्षा नुसते आत्मज्ञान हे अधिक योग्यतेचे असले तरी जगात राहण्यासाठी ऐहिक समृद्धीही स्वत:ला व देशाला प्राप्त करण्याची आवश्यकता व नैतिक हक्कही असल्यामुळे माणसाचे परम साध्य काय, या प्रश्नाला शांती व पुष्टी, म्हणजे आत्मज्ञान व कर्म यांचा समुच्चय असे कर्मयोगशास्त्राचे उत्तर आहे.’’
सध्याच्या कमालीच्या अस्थिर आर्थिक परिस्थितीतही माणसाला हतबल होऊ न देता, दैवावर अवलंबून न राहता, स्वप्रयत्नाने व मनाच्या निग्रहाने आनंद कसा मिळविता येईल याचे स्पष्ट मार्गदर्शन ‘गीतारहस्या’सारख्या ग्रंथात मिळते. भारतातील तरुणांनी ते समजून घेतले तर युरोपातील तगमग व भारतातील भ्रांत समाधान या दोन्हीतून त्याची सुटका होईल व तो समतोल उत्कर्षांच्या मागे लागेल.
* जिज्ञासूंनी ‘गीतारहस्या’तील सुख-दु:खविवेक हे प्रकरण पाहावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा