अमेरिकेतील मिनसोटा विद्यापीठाच्या जीवशास्त्र व जनुकशास्त्र विभागातून निवृत्तीनंतर आता तेथेच ‘संलग्न प्राध्यापक’ या पदावर काम करणारे डॉ. अखौरी सिन्हा सध्या कर्करोगविषयक संशोधनात अधिक रमले आहेत. मात्र याच सिन्हा यांनी ४० वर्षांपूर्वी केलेल्या कामाची भरभक्कम पावती त्यांना अलीकडेच मिळाली आहे.. अंटाक्र्टिकामधील एका गिरिशिखराचे नाव ‘माउंट सिन्हा’ असे ठेवण्यात आल्याने, या खंडाचा अभ्यास मानवजातीसाठी करणाऱ्यांच्या कीर्तिमंदिरात त्यांचे नाव कायम राहील.
डॉ. सिन्हा मूळचे बिहारचे. त्यांचे शालेय शिक्षण पाटण्यात झाले, पण हल्ली झारखंडची राजधानी झालेल्या रांचीशीही त्यांचे अनुबंध होते. अलाहाबाद विद्यापीठातून १९५४ साली पदवी, तर १९५६ साली पाटण्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर, प्राणिशास्त्र विभागात नोव्हेंबर १९५६ ते जुलै १९६१पर्यंत ते प्राध्यापक होते. अमेरिकेस पुढील शिक्षणासाठी जाऊन, १९६५ साली पीएच.डी.नंतरचे संशोधन त्यांनी पूर्ण केले. जीवशास्त्रज्ञ म्हणून, अमेरिकी तटरक्षक दलाच्या अभ्यासनौकेतून अंटाक्र्टिकाच्या बेलिंग्शॉसन आणि अॅमंडसन समुद्रभागात सागरी पक्षी, देवमासे (व्हेल) आणि समुद्रसिंह (सील) यांची गणना करण्याच्या मोहिमांमध्ये ते १९७२ आणि १९७४ साली सहभागी झाले होते. अशा गणनांतील सहभाग आज फारसा मोठा मानला जात नसेलही, परंतु सिन्हा यांना त्या वेळी अंटाक्र्टिकातील पहिल्या काही मोहिमांचा भाग म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागले होते. बर्फकापी उपकरणे, हेलिकॉप्टर आदी साधनांनिशी ही प्राणी-पक्षी गणना त्यांनी पूर्ण केली. पुढे त्यांनी जनुकशास्त्र व अन्य अभ्यासशाखांत लक्ष घातले. कर्करोगाविषयीच्या संशोधनाचा त्यांनी दिलेला पहिला प्रस्ताव नाकारून, विद्यापीठाने त्यांची पदावनतीसुद्धा केली होती. या कारवाईविरुद्ध जुलै १९८५ मध्ये सिन्हा यांनी न्यायालयात दाद मागूनही ती पदावनती कायमच राहिली होती. मात्र अनेक विद्यार्थी तयार करणाऱ्या सिन्हा यांनी हे संशोधन सुरू ठेवले. त्यातून एकंदर शंभराहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. उतारवयातही झारखंडच्या बक्सर भागातील नातेवाईकांकडे सिन्हा जवळपास दरवर्षी येतात.
अंटाक्र्टिकातील शिखरांना अशी नावे देणाऱ्या अमेरिकी भूशास्त्र सर्वेक्षण विभाग (यूएसजीएस) आणि त्यास साह्य़ करणारी अंटाक्र्टिक नेम्स अॅडव्हायझरी कमिटी यांनी सिन्हा यांचा हा गौरव केला आहे. अंटाक्र्टिकाच्या भूगोलाविषयी माहिती देणाऱ्या काही जर्मन व अमेरिकी संकेतस्थळांवर ‘माउंट सिन्हा’ची माहिती मिळते, तसेच इंटरनेटद्वारे नकाशांत ते पाहता येते.
(शिखराला नाव देण्याच्या घोषणेची नेमकी तारीख समजू शकलेली नाही.)
अखौरी सिन्हा
अमेरिकेतील मिनसोटा विद्यापीठाच्या जीवशास्त्र व जनुकशास्त्र विभागातून निवृत्तीनंतर आता तेथेच ‘संलग्न प्राध्यापक’ या पदावर काम करणारे डॉ. अखौरी सिन्हा सध्या कर्करोगविषयक संशोधनात अधिक रमले आहेत.
First published on: 03-07-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhauri sinha