घराणेशाहीच्या राजकारणातून फैलावणारे कौटुंबिक कलह कोणत्या थराला जाऊ शकतात, याच्या दाहक अनुभवातून सध्या तामिळनाडूतील जनता आणि द्रमुकचे वृद्ध नेता एम. करुणानिधी जात आहेत. चार विवाह करणाऱ्या करुणानिधींची एम. के. स्टालिन आणि एम. के. अळ्ळगिरी ही एकाच मातेची अपत्ये द्रमुकच्या वारसदाराच्या वादातून संघर्षांच्या कडेलोटाशी उभी ठाकली आहेत. आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून करुणानिधींचा कल स्टालिनकडे झुकत असल्याची कुणकुण लागल्यापासून सुरू झालेला हा संघर्ष आजचा नाही. करुणानिधी धडधाकट होते, तेव्हाच, म्हणजे जवळपास अडीच दशकांपूर्वीच या संघर्षांची बीजे मूळ धरू लागली होती. राज्यात द्रमुकची सत्ता आल्यास स्टालिनला मुख्यमंत्रिपद मिळेल या भयाने पछाडलेल्या अळ्ळगिरी यांनी कुटुंबाच्या आणि पक्षाच्या विरोधात केलेल्या कारवायांनी आता टोक गाठल्याने, द्रमुकच्या भविष्यावरील प्रश्नचिन्ह भलेमोठे झाले आहे. २५ वर्षांपासूनचा वारसाहक्काचा हा संघर्ष सोडविणे आवाक्याबाहेर गेल्याने अखेर अळ्ळगिरींना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई करणे  करुणानिधींना भाग पडले आहे. करुणानिधींनी स्टालिनला चेन्नईचा महापौर बनविले, तेव्हाच त्याच्या वारसदारीवर आणि अळ्ळगिरींच्या असंतोषावर शिक्कामोर्तब झाले होते. एका बाजूला स्टालिनप्रेमाने पछाडलेले करुणानिधी, दुसरीकडे आपल्या मुलावर, अळ्ळगिरींवर प्रेमाची पाखर घालणारी त्यांची पत्नी आणि करुणानिधींनी तामिळनाडूमध्ये रुजविलेला पक्ष अशा त्रिकोणात हे सूडनाटय़ घिरटय़ा घालते. २००१ मध्ये करुणानिधी यांनी अळ्ळगिरींना पक्षातून निलंबित केले, तेव्हा आईच्या मध्यस्थीमुळे त्यांना पक्षात पुन्हा स्थान मिळाले, पण स्टालिनकडे कदापिही मुख्यमंत्रिपद जाऊ नये, याची काळजी घेण्यातच अळ्ळगिरींची राजकीय कारकीर्द गर्क राहिली. त्यामुळेच, आणि बहुधा, स्टालिनचा राज्यातील सत्तेचा मार्ग निष्कंटक व्हावा म्हणूनही, करुणानिधी यांनी अळ्ळगिरी यांच्या अंगावर केंद्रातील संपुआ सरकारमधील मंत्रिपदाची झूलही चढविली, पण अळ्ळगिरी दिल्लीत रमलेच नाहीत. दोन वर्षांपूर्वी, २०११ च्या विधानसभा निवडणुकीत, दक्षिणी अभिनेता विजयकांत याच्या डीएमडीके पार्टीशी युती झाल्यास द्रमुक सत्तेवर येईल आणि स्टालिन मुख्यमंत्री होईल या भीतीने विजयकांतच्या विरोधात अळ्ळगिरींनी उघडलेल्या आरोप मोहिमेमुळे युती बिघडली आणि जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सत्ता मिळाली. उत्तराधिकारी जाहीर करावा, असे आता वृद्धापकाळात करुणानिधींना वाटावे यात काहीच गैर नाही. पण कुटुंबातीलच उत्तराधिकारी नेमण्यासाठी राजकीय पक्ष म्हणजे काही मठ नव्हे, असा आक्षेप घेत अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेऊन गेल्या वर्षीच अळ्ळगिरी यांनी स्टालिनच्या निवडीचा प्रयत्न हाणून पाडला होता. आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना या सूडनाटय़ाने उचल खाल्ली आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत द्रमुकला फटका बसला, तर पक्षाला भवितव्य नाही या भीतीने पक्ष सावरण्याची अखेरची धडपड एवढाच अळ्ळगिरींच्या निलंबनाचा अर्थ आहे. आज गुरुवारी अळ्ळगिरींचा ६३ वा वाढदिवस आहे. या सूडनाटय़ाच्या अखेरच्या अंकाचा पडदा आपल्या वाढदिवशीच उघडण्याचे अळ्ळगिरी यांनी जाहीर केले आहे. द्रमुकला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विडा उचललेला हा ‘करुणापुत्र’, पुढील पावले त्याच दिशेने टाकणार, हे आता निश्चित झाले आहे. राजसत्तेच्या वारसदारीचा कौटुंबिक वाद आणि त्यातून उफाळणारे संघर्ष महाराष्ट्राला किंवा देशाला नवे नाहीत. पण करुणानिधींच्या कुटुंबातील या संघर्षांची धार काही वेगळीच आहे, हेच खरे!..