‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ या ब्रीदाला जागूनच मुकेश आणि अनिल या अंबांनी बंधूंमध्ये ताजे मुत्सद्दी व्यावसायिक सामंजस्य घडले आहे. याला आठ वर्षांनंतर जागा झालेला बंधुप्रेमाचा उमाळा वगैरे म्हणण्याचा भाबडेपणा तर मुळीच कोणी करू नये. स्पर्धेतून गुणवत्ता आणि मूल्य बहरत जाते हा सामान्य बाजारपेठीय नियम जसा आहे, तसेच प्रतिस्पध्र्याशी प्रसंगी संग आणि सहकार्य करून आपला मार्ग प्रशस्त करणे हेही एक व्यावसायिक कौशल्य आहे. थोरले बंधू मुकेश यांना त्यांच्या मर्मस्थानी असलेल्या दूरसंचार क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग, धाकटे बंधू अनिल यांनी माथ्यावरील कर्जाच्या डोंगराचा भार काहीसा हलका करून मोकळा करून द्यावा असा हा शुद्ध व्यावसायिक सलोखा आहे. अविभक्त रिलायन्स साम्राज्यात दूरसंचार व्यवसाय हा थोरल्या मुकेश यांच्याच हृदयीचे स्वप्न होते. पण २००६ सालात अंबांनी बंधूंमध्ये झालेल्या विभाजनात, रिलायन्सचा दूरसंचार क्षेत्रातील सारा जामानिमा अनिल यांच्या वाटय़ाला आला. त्यातच एक बंधू ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायात दुसऱ्याला प्रवेश करता येणार नाही असा ‘ना- स्पर्धा’ करार उभयतांमध्ये केला गेला. २०१० सालात कोकिलाबेन अंबानींनी या दोन्ही चिरंजिवांना एकत्र आणल्यावर ‘ना स्पर्धा’ कराराचा अडसर दूर झाला. थोरले मुकेश यांनी लागलीच दूरसंचार क्षेत्रात स्वारस्याला पुन्हा उजाळा देत, देशभरातील सर्व २२ परिमंडळांत वायरलेस ब्रॉडबॅण्ड सेवेचे परवाने मिळविणाऱ्या ‘इन्फ्राटेल ब्रॉडबॅण्ड’ या कंपनीवर ताबा मिळविला. ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ असे तिला नामाभिधान देत ४जी तंत्रज्ञानावर बेतलेली वेगवान बॉडब्रॅण्ड सेवा सुरू करण्याचा मानसही व्यक्त केला. आता ही इंटरनेट सेवा प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी त्यांनी अनिल यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा आधार मिळविला आहे. हे सामंजस्य न करता स्वत:चे फायबर ऑप्टिक तारांचे जाळे रचण्याचा मार्ग मुकेश यांच्यापुढे होता. परंतु अशी गुंतवणूक ही अक्कलखातीच ठरली असती. प्रति किलोमीटर १२ लाख रुपये गुंतवून स्वत:चे जाळे तयार करण्यापेक्षा, तब्बल १.२० लाख किलोमीटर फैलावलेल्या तारांच्या आयत्या जाळ्यावर केवळ एकदाच १२०० कोटींचे भाडे (किलोमीटरमागे केवळ १ लाख रुपयांप्रमाणे) चुकते करून वर्षांनुवर्षे वापर करण्याचे हे व्यावसायिक शहाणपण आहे. भविष्यात मुकेश यांच्या कंपनीने इंटरनेटकडून ध्वनिसंपर्क सेवा सुरू करायची ठरविल्यास, अनिल यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या देशभरातील ५० हजारांहून अधिक दूरसंचार मनोऱ्यांचे जाळेही त्यांना उपयुक्त ठरेल. म्हणूनच ३७,३०० कोटींचे अवाढव्य कर्ज माथी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपल्या या जवळपास निष्काम पडून असलेल्या मालमत्तांसाठी थोरल्या बंधूच्या रूपाने तगडा गिऱ्हाईक नेमका धावून आला आहे. तारेवरून सुरू झालेला हा सलोखा उभयतांसाठी एक तारेवरची कसरत मात्र असेल. दोहोंचे व्यवसाय स्वारस्य सारखेच आणि ते साकारण्यासाठी दोहोंना परस्परांशी स्पर्धा क्रमप्राप्तच ठरेल. म्हणजे एकीकडे प्रतिस्पर्धा आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांच्या वापरात परस्पर सामंजस्यही अशा अजब व्यावसायिक रसायनाचा वस्तुपाठ उद्योगजगताला या निमित्ताने पाहायला मिळेल. देशातील सर्वात मोठय़ा आर्थिक घोटाळ्याचा डाग, त्यातच सरकारच्या धोरणातील सावळागोंधळ, दुसरीकडे स्पर्धेचा वाढता दबाव आणि एकंदर आर्थिक मरगळीने आकसलेला गुंतवणुकीचा व नफाक्षमतेचा परिघ, असे नष्टचर्य मागे लागलेल्या भारतीय दूरसंचार क्षेत्राच्या दृष्टीने मात्र हा निश्चितच सुखद घटनाक्रम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा