लोकसभा व विधानसभा निवडणुकांची एक चाहूल म्हणजे युत्या-आघाडय़ांच्या राजकारणाला येणारा बहर. महाराष्ट्र लोकशाही आघाडी उभी राहिल्याची घोषणा करून भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही चाहूल दिली आहे. वास्तविक रिपब्लिकन राजकारणातील प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे दोघे वजनदार नेते. परंतु एकमेकांच्या विरोधात लढणे एवढाच या दोघांच्या राजकारणाचा प्रमुख अजेंडा आहे, असे म्हणावे लागेल. आठवले यांनी उबग येईपर्यंत काँग्रेसी राजकारण केले, तर आंबेडकर यांच्या राजकारणाचा कुणाला थांगपत्ता लागेल किंवा लावेल तो बक्षिसास पात्र ठरेल, असे काही तरी त्यांचे गुगली राजकारण असते. आठवले त्यांच्या मनात असेल त्या पक्षाला एकतर्फी पाठिंबा देऊन मोकळे होतात, इतके ते मोकळ्या-ढाकळ्या मनाचे आहेत. त्यासाठी त्यांना अगदी कणभर सत्ता मिळाली तरी चालेल, मग उगाचच चर्चा, वाटाघाटी यांचा घोळ कशाला? आताही ते शिवसेना-भाजप-आरपीआय अशी एकतर्फी महायुती जाहीर करून सत्ता परिवर्तनासाठी राज्यभर सभा घेत फिरत आहेत. आठवले शिवसेना-भाजपच्या कळपात गेल्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर काही जमते का याची चाचपणी केली. काँग्रेसवाले एवढे हुशार की ते स्वत:चा स्वत:लाही भरवसा देऊ शकत नाहीत, तर इतरांना काय दाद देणार? प्रकाश आंबेडकरांची एक जमेची बाजू ते जिंकण्या-हरण्याची फारशी पर्वा करीत नाहीत, त्यामुळे ते इतर पक्षांना फार महत्त्वही देत नाहीत. काँग्रेसची इतरांना घोळविण्याची मानसिकता ओळखून आंबेडकरांनी २३ लहानसहान पक्षांचे-संघटनांचे कडबोळे बांधून महाराष्ट्र लोकशाही आघाडी नावाची तिसरी आघाडी जाहीर केली. आता या आघाडीतील पक्ष वा संघटनांचा जीव पाहिल्यानंतर एक खांब आणि आजूबाजूला काटय़ा-कुटय़ा उभारून उभा केलेला एकखांबी तंबूच म्हणावा लागेल. उदाहरणार्थ ‘विद्रोही शाहिरी जलसा’ हा काय पक्ष आहे, संघटना आहे, की कलापथक? आंबेडकरांनी त्यांचा मतदार नजरेसमोर ठेवून आघाडीचा अजेंडाही जाहीर करून टाकला आहे. दलित मतदार तर त्यांना मानणारा आहेच, परंतु सध्या मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला असताना त्यांनी ओबीसींची बाजू घेतली आहे. मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी केली आहे. गिरणी कामगारांच्या, झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आघाडीच्या अजेंडय़ावर आणला आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी पुढे मांडला आहे. विषय मोठे, व्यापक आणि सर्वव्यापी आहेत, परंतु अशा टेकू देऊन उभ्या केलेल्या आघाडीला हा भलामोठा अजेंडा झेपणार आहे का? बरे हे प्रश्न काही आताच पुढे आले आहेत का? याच प्रश्नांना भिडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी हीच आघाडी चार-दोन वर्षांपूर्वी उभी केली असती तर, निवडणुकांचे निकाल फिरवायला त्याची नक्कीच मदत झाली असती. दुसरे असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-शिवसेनेच्या विरोधात ही आघाडी आहे, असे आंबेडकर म्हणतात, मग आरपीआयचे इतर गट किंवा मायावती यांच्या बसपचे त्यांना वावडे का आहे? खरे तर आपापले गट कायम ठेवून सर्व रिपब्लिकन नेते किमान निवडणुकीपुरते एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलू शकते. अर्थात या नेत्यांना असा सुविचार सुचेल तो आंबडकरी चळवळीसाठी सुदिन म्हणावा लागेल, अन्यथा अशा आघाडय़ा होतील, मोडून पडतील, आंबेडकरी राजकारण मात्र कायम उपेक्षितच राहील.
आंबेडकरी आघाडी
लोकसभा व विधानसभा निवडणुकांची एक चाहूल म्हणजे युत्या-आघाडय़ांच्या राजकारणाला येणारा बहर. महाराष्ट्र लोकशाही आघाडी उभी राहिल्याची घोषणा करून भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही चाहूल दिली आहे. वास्तविक रिपब्लिकन राजकारणातील प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे दोघे वजनदार नेते. परंतु एकमेकांच्या विरोधात लढणे एवढाच या दोघांच्या राजकारणाचा प्रमुख अजेंडा आहे, असे म्हणावे लागेल
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-05-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkari front