प्रकाश बुरटे
सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांत २ किंवा ३ ऑगस्ट रोजी झळकलेली बातमी होती : ‘कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेच्या हवाई (ड्रोन) हल्ल्यात १ ऑगस्ट रोजी ठार झाला.’ अमेरिकेवरील ‘९-११’ विनाशकारी दहशतवादी हल्ल्याची योजना नक्कीच कोणी तरी आखली होती. दोन ११० मजले उंचीच्या मोठाल्या टॉवर्सवर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवाद्यांनी दोन हायजॅक केलेली आणि पूर्ण इंधन भरलेली अमेरिकन विमाने घुसवल्याने ते टॉवर्स पार उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यात ९३ देशांतील एकूण सुमारे ३००० माणसे लगेच दगावल्याचा अंदाज होता. त्याशिवाय, न्यू यॉर्क शहरातील २७०० पेक्षा थोड्या जास्त व्यक्ती, ‘पेंटॅगॉन’ या अमेरिकेच्या संरक्षण दल मुख्यालयामधील १८४ माणसे आणि अपहरण केलेल्या आणखी एका विमानातील ४० व्यक्ती दगावल्या होत्या. त्याशिवाय जगातील सर्वांत उंच असे दोन टॉवर भुईसपाट करणे ही तर सर्वशक्तिमान अमेरिकेची प्रतिमाच पुसून टाकणारी कृती आहे, असे अमेरिकी नागरिकाला वाटणे तर सहज शक्य आहे. जगातून मोठ्या प्रमाणात शोकसंदेश वाहू लागले.
मेले ते सुटतात. इतर दु:खी होतात. काहींना आयुष्य बेभरवशाचे वाटू लागते. काहींना बदला घेण्याचा चेव चढतो. थोडक्यात दीर्घकाळासाठी माणसांचे स्वास्थ्य बिघडून जाते. अमेरिकी शासकीय तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीप्रमाणे या हल्ल्याची योजना आखणारे होते ओसामा बिन लादेन आणि अल-जवाहिरी. अमेरिकन नेव्हीच्या एका पथकाने अल-कायदाप्रमुख ओसामा बिन लादेन याच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथील राहत्या घरावर अफगाणिस्तानातून २ मे २०११ रोजी दुपारी १ वाजता अचानक छापा टाकून घेरले. नंतर घडलेल्या चकमकीत त्याला ठार केले. त्याचे प्रेतही तेथून उचलले आणि ते १३०० किलोमीटर दूरवर अरबी समुद्रात खोल नेऊन २४ तासांत त्याचे दफन केले होते. त्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २ मे २०११ रोजी रात्री ११:३५ वाजता भावना जागवणारे भाषण केले होते. “जगाने ते दोन टॉवर उद्ध्वस्त होताना पाहिले, परंतु त्याहीपेक्षा जास्त हृदयद्रावक दृश्ये पाहिली नाहीत. ती दृश्ये होती त्या तीन हजार घरांतील रात्रीच्या जेवणाच्या वेळी टेबलाशी असणाऱ्या रिकाम्या खुर्च्यांकडे पाहणाऱ्या आप्तांच्या नजरांची,” असे ओबामांचे त्या वेळचे शब्द होते. असे घडणे अगदी स्वाभाविक आहे. तेथे तुमचा मूळ देश, भाषा, धर्म, वय यामुळे कसलाच फरक पडत नसतो. घरातील मोकळी जागा मनात दु:खाची कळ दीर्घकाळ जागवत ठेवते.
आता ओसामा किंवा जवाहिरी नाहीत. आता त्यांच्या योजना नसणार, त्या अमलात आणणाऱ्यांच्या हातून कुणाला मरण येणार नाही की कुणाला इजा होणार नाही, असे मानावे काय? अशा परिस्थितीत अमेरिकेवरचा राग निवळेल काय, हिंसाचार थांबेल काय?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जवाहिरीच्या मृत्यूबाबत म्हणाले की, “अमेरिकी नागरिकांवर हल्ले घडवून आणणाऱ्या जवाहिरीचे अस्तित्व युद्धभूमीतून कायमचे पुसणारी काटेकोर मोहीम पूर्ण झाली. न्याय झाला. जगभरातील नागरिकांना आता या क्रूर दहशतवाद्यांचे भय बाळगण्याचे कारण नाही. तुम्ही आमच्यासाठी धोका असाल, तर तुम्ही कुठेही लपा, कितीही काळ लोटू द्या, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणारच.” याच सात मिनिटांच्या भाषणात ते ११ वर्षांपूर्वी असाच ‘ओसामाचाही न्याय झाल्याचा’ उल्लेख करतात.
पण एन्काऊंटरसारखे मार्ग वापरून ‘न्याय’ करणे म्हणजे सूड घेणे नाही काय? दोन वर्षांपूर्वी गोऱ्या अमेरिकी पोलीस अधिकाऱ्याने कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लाॅइडचा असाच खून केला होता. त्या अधिकाऱ्याच्या मते फ्लॉइड हाच चोर होता आणि सत्ताधाऱ्याला शोभणारे वर्तन या पोलीस कक्षाचे होते. पूर्वीचे अनेक राजे नाही का ‘आले राजाजीच्या मना’सारखा न्याय द्यायचे, तसेच.
अमेरिकेत शेवटी त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली होती. शतके, सहस्रके उलटतात तशी माणसे बदलतात. राजेशाहीची जागा लोकशाही घेते. अमेरिका हे लोकशाही राष्ट्र असल्यानेच स्वत:च्या देशामधील नागरिकांबाबत ‘एन्काऊंटर न्याय’ करत नाही. म्हणून तर तेथे न्यायालये आहेत. कायदे आहेत. नागरिकाचा गुन्हा कितीही गंभीर असला तरी त्याला मृत्यूची शिक्षा न देणारी तब्बल २३ राज्ये अमेरिकेत आहेत. माणसाला सुधारण्यासाठी शिक्षा करायची असल्याने कोणत्याही गुन्ह्यासाठी मृत्यूची शिक्षा तेथे दिली जात नाही. त्यापासून किमान फेडरल अमेरिकेने काही शिकणे उचित ठरेल. जगाचे नेतृत्व करणारी अमेरिका आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांबाबत मात्र जर ‘एन्काऊंटर न्याय’ पद्धत वापरत असेल, तर जगात लोकशाही अथवा न्याय रुजणार नाही. जास्त मानवी जगही मुळीच घडणार नाही.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
prakashburte123@gmail.com