अंधश्रद्धेला विरोध करणारा लेखक आणि त्याची पत्नी यांच्यावर भर रस्त्यात हल्ला होतो.. पत्नी बचावते, पण तो जीव गमावतो.. ज्यांना अशा पाखंडय़ाला संपवायचं आहे, त्यांचं काम फत्ते झालेलं असतं. त्यानंतर २४ तास झाले तरी कुणालाही अटक झालेली नसतेच.. दरम्यान आंदोलक रस्त्यावर आलेले असतात आणि अटकेची मागणी, हत्येचा निषेध असं सगळं सुरू झालेलं असतं. मग त्याच रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमते!
आपल्या महाराष्ट्रात असं काही कधीही जणू होतच नाही, असं काही नाही. पण ही बातमी बांग्लादेशातली आहे. तोच तो मागास, इस्लामी मूलतत्त्ववादय़ांचं आगर बनलेला बांग्लादेश. याच देशात प्राध्यापक अजोय रॉय राहातात आणि ढमका विद्यापीठात शिकवतात, त्यांचा अविजित रॉय हा मुलगा. तो अमेरिकेत असतो, पण बांगलादेशात फोफावणाऱ्या धर्मवादय़ांच्या कारवायांना जमेल तितका विरोध करत राहातो.. म्हणजे, राहात होता. ब्लॉगच नव्हे, तर पुस्तकंही लिहीत होता.. नास्तिकतेचाच प्रचार करत होता. त्याचा ईमेलसुद्धा ‘चार्बाक’ (चार्वाक) असा होता.
त्याची हत्या सकाळी पिस्तुलातून गोळी झाडून न होता, संध्याकाळी धारदार शस्त्राचे वार करून झाली.
‘बिश्बाशेर व्हायरस’ हे अविजित रॉय लिखित पुस्तक सर्वाधिक गाजलं, खपलंही. एकंदर तीन पुस्तकं अविजित यांनी लिहिली होती. प्रामुख्यानं शिक्षित तरुण-तरुणी हेच त्याचे वाचक होते. ‘विदेशी शिक्षणानं भ्रष्ट झालेले’ हे तरुणच अविजित यांच्या हत्येच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते.
अविजित रॉय यांचं इंग्रजी लिखाण मुक्तो-मोन.कॉम या ब्लॉगवर उपलब्ध आहे. त्यात ‘कुराणातील विज्ञान’ वगैरे दाव्यांची साधार खिल्लीच उडवलेली आहे. श्रद्धा हे अंधश्रद्धेचंच दुसरं नाव, अशी भूमिका मांडण्यासाठी विविध तर्काधिष्ठित विधानं या ब्लॉगवर केलेली आढळतात. मन मुक्त असावं आणि त्यावर धर्म वगैरेंचा पगडा नसावा, अशा विचारांचा हा ब्लॉग टीकेसाठी आणि चर्चासाठी नेहमीच खुला होता. या ब्लॉगचा फोरम हा विभाग चर्चानी गजबजून उठे.. पण अशा चर्चा जणू फक्त बुद्धिजीवी बेगडीपुरोगामी (हे दोन शब्द हल्ली जोडूनच लिहिले जातात) वर्गाच्या विरंगुळय़ाचं साधन आहेत, असं मानणाऱ्या काही राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमींनी अविजित यांना संपवलंच.
‘एकुशे’ हा बांग्लादेशात भाषेचा मोठा सण! २१ फेब्रुवारीच्या आंदोलनाची आठवण म्हणून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभर साजरा केला जातोच, पण संयुक्त राष्ट्रांनी (युनेस्कोनं) तसा ठराव करण्याआधीही बांगलादेशात या दिवसापासून पुढले सात दिवस नुसता उत्सव असतो भाषेचा.. आपला देश धर्माच्या पायावरला नसून बंगाली भाषेच्या पायावर उभा आहे, हे अशा उत्सवानं प्रत्येक भाषाप्रेमी बांग्लादेशीच्या मनात ठसतं.. याच ‘एकुशे’निमित्त सुरू झालेल्या ग्रंथमेळय़ासाठी अविजित आले होते.
मातृभाषेच्या प्रेमासाठी सुरू झालेल्या एका उत्सवाची सांगता त्यांच्या हत्येनं- म्हणजेच धर्मप्रेम्यांच्या विजयानं यंदा झाली.
तूर्तास, अविजित रॉय हिंदू आणि त्यांना मारणारे परधर्मीय, असा अर्थ काही भारतीय राष्ट्रप्रेमी काढत आहेत. तसा प्रचार काही भारतीयांनी ट्विटरसारख्या समाज-माध्यमांवरून शुक्रवारी सकाळीच सुरू केला होता.
( या मजकुरासोबतचे ताजे छायाचित्र ‘असोसिएटेड प्रेस’चे आहे )
आंदोलनं होतात.. बघे बघतात..
अंधश्रद्धेला विरोध करणारा लेखक आणि त्याची पत्नी यांच्यावर भर रस्त्यात हल्ला होतो.. पत्नी बचावते, पण तो जीव गमावतो..
First published on: 28-02-2015 at 12:58 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American atheist blogger hacked to death in bangladesh