आपल्या आयुष्याची गोष्ट रमाणी यांनी त्यात फार न गुंतता मांडली आहे.  प्राप्त परिस्थितीवर, दैवी संकेतांवर, नशिबावर, ज्योतिषावर, अंतर्मनाच्या हाकेवर निर्णय सोपवून त्या पुढे जातात. तरीही वस्तुनिष्ठपणा या कथनामध्ये आहे. शिवाय कितीही स्वप्नं मोडली तरीही पुन्हा नव्याने उभं राहण्याचं ‘सव्‍‌र्हायव्हल स्पिरिट’ही ठासून भरलेलं आहे.
फॅशन डिझायनर, उद्योजक, हॉटेलियर, सोशल वर्कर, दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात अत्यंत महत्त्वाची जागा राखून असलेल्या सेलिब्रेटी.. बिना रमाणी यांची ओळख अशी विविधांगी असली तरीही ती एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित असल्याने, शिवाय त्यांचा प्रसिद्धीच्या शिखरावर असण्याचा काळही आता मागे पडल्यामुळे हे नाव सर्वसामान्यांना फारसे माहीत असण्याचे कारण नाही. त्यामुळे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘बर्ड इन अ बन्यन ट्री’ या आत्मचरित्राकडे फारसे कुणाचे लक्ष वेधले गेले नसते. मात्र १९९९च्या एप्रिलमध्ये मॉडेल जेसिका लाल हिच्या खळबळजनक हत्येची घटना रमाणी यांच्या मालकीच्या टॅमिरड कोर्ट कॅफेमध्ये घडल्याने हे नाव काही काळापर्यंत बातम्यांमध्ये राहिले. पण मुळात ही गोष्ट आहे बिना रमाणी यांच्या ‘स्टार सोशलाइट’ पदापर्यंतच्या प्रवासाची.
फाळणीनंतर मुंबईत स्थलांतरित झालेल्या आणि काही काळाने लंडनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यापारामध्ये जम बसवणाऱ्या लालवाणी कुटुंबातील बिना ही धाकटी मुलगी. आपल्या भावांची इतकी लाडकी की त्यांनी बनवलेल्या रेडिओला त्यांनी नाव दिले ‘बिनाटोन’. हा रेडिओ प्रचंड लोकप्रिय झाल्याने कालांतराने या लालवानी बंधूंनी आपल्या कंपनीचे नावही बिनाटोन ठेवले. या भल्यामोठय़ा एकत्र सिंधी शीख कुटुंबामध्ये गेलेले बिना यांचे बालपण रंगीबेरंगी होते. मुंबईत राहत असताना दादर भागातील आपल्या घरासमोरच्या एका खास दगडावर बसून समुद्राशी मारलेल्या गप्पा, वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या विस्तारात अख्खं कुटुंब सामावून घेणाऱ्या आईच्या आठवणी, लंडनमधले सुखवस्तू दिवस, कमालीच्या कर्मठ वातावरणातही छोटीमोठी बंडं करत राहण्याची निरागस धडपड याची वर्णनं पुस्तकात येतात. अ‍ॅथलीट बनण्यापासून ते लंडनच्या नावाजलेल्या स्टुडिओत शिकून गायिका बनण्यापर्यंत हाताशी आलेलं प्रत्येक स्वप्न कुटुंबाच्या कर्मठपणामुळे त्यांना सोडून द्यावं लागलं. या कडवट आठवणी आता भूतकाळाचा भाग असल्याने रमाणी त्या सुरसपणे सांगतात. या सगळ्यात भरपूर नाटय़ असल्याने पुस्तक कंटाळवाणं होत नाही.
त्यातला सर्वात नाटय़मय आणि गॉसिप कॉलम्सना खाद्य पुरवणारा भाग आहे सुपरस्टार शम्मी कपूरबरोबरच्या प्रेमप्रकरणाचा. प्रथम पत्नीच्या जाण्यानं एकाकी झालेल्या, पुन्हा नवं नातं बनवायला उत्सुक, पडद्यावरच्या प्लेबॉय इमेजपासून दूर पळू बघणाऱ्या, वाचन, संगीतात रमणाऱ्या शम्मीचं लोभस रूप या प्रकरणांतून उभं राहतं. चित्रपटातच शोभेल अशा शम्मीच्या आवेगी प्रेमाला बिना यांची साथ मात्र मिळाली नाही. घरची मंडळी आणि स्वत: राज कपूर यांच्या प्रखर विरोधामुळे या प्रेमाचं लग्नात रूपांतर झालं नाही, पण त्याऐवजी अँडी रमाणी या एअर इंडियाच्या अमेरिकास्थित मॅनेजरशी लग्न करून अनेक वर्षांसाठी सोशीक गृहिणीच्या भूमिकेत त्या शिरल्या. तिथंही एका प्रख्यात चित्रकाराशी जुळलेल्या मनस्वी नात्याला केवळ हे लग्न टिकवण्यासाठी त्यांनी पूर्णविराम देऊन टाकला. व्यक्तिमत्त्वं खुलवणारं असं प्रेम किंवा काही काळानं रमाणी यांना मिळालेली ताज ग्रुपच्या न्यू यॉर्कमधील व्यवसायाच्या मार्केटिंग प्रमुखपदाची हेवा वाटावी अशी नोकरी. यातून आलेला आत्मविश्वास लग्नाच्या नकोशा बंधनातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा ठरू नये ही गोष्ट भारतातील घराघरांतून होणाऱ्या मुलींच्या ब्रेनवॉिशगवर नकळत भाष्य करतं. दोन मुलींच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिल्यावर मात्र त्यांच्या स्वभावातील अगतिकता अखेर संपलेली दिसते. एकाच वेळी कॅन्सर आणि मुलींचा ताबा मिळवण्याची खटपट अशा दोन्ही पातळीवर लढताना त्यांनी सगळी जिद्द एकवटली आणि इथूनच पुढे बिना रमाणी या वलयांकित नावाचा प्रवास सुरू झाल्याचं दिसतं.
यानंतर दिल्लीत कायमसाठी वास्तव्याला आलेल्या बिना यांनी मग लवकरच इथल्या उच्चभ्रू गटात जागा मिळवली. दिल्लीजवळील हौज खास गावातील पुराण्या ऐतिहासिक वास्तूंचा कल्पक कायापालट करणारी उद्योजक ही त्यांची ओळख आजही टिकून आहे. त्या निवांत गावात अत्याधुनिक जीवनशैलीची प्रतीकं असलेले स्टुडिओ, बुटिक्स, कॅफे वगरे आणून दोन संस्कृतींचा भलताच मिलाफ घडवल्याबद्दल पेज थ्री वर्तुळात त्यांचं कौतुकही बरंच झालं. हा प्रयोग नेमका कसा साकारला याचं फर्स्ट पर्सन अकाउंट पुस्तकातून मिळतं. भारतातील पेज थ्री संस्कृतीच्या जडणघडणीचा काळ. या जगाची सफरही त्यानिमित्तानं घडते.
रमाणी यांचं जगणं पंचतारांकित असल्यानं पुस्तकातही पंचतारांकित व्यक्तिमत्त्वांची रेलचेल आहे. त्यात राजमाता गायत्री देवी, झुबिन मेहता, हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअर यांच्याबरोबर चंद्रास्वामीसारख्या वादग्रस्त व्यक्तीही आहेत. छोटे छोटे चमकदार प्रसंग आणि आठवणीही अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. ‘मेरा नाम जोकर’ आपटल्यानंतर राज कपूर काही काळासाठी रमाणी यांच्या न्यू यॉर्कमधील लहानशा घरात वास्तव्याला होते. रमाणी यांच्या आठवणींच्या पोतडीतील ही एक किमती आठवण. रात्रीच्या शांततेत जिझस ख्राइस्टच्या पोस्टरशी भांडणारा राज कपूर इथं भेटतो. अशीच एक आठवण इंदिरा गांधी यांच्या भेटीचीही आहे. हा प्रसंग गांधी यांच्या हत्येच्या केवळ तीन महिने आधीचा.
आपल्या आयुष्याची गोष्ट रमाणी यांनी त्यात फार न गुंतता मांडली आहे. आयुष्य जगताना, निर्णय घेताना त्याबाबत फार ठाम भूमिकाही त्या घेताना दिसत नाहीत. प्राप्त परिस्थितीवर, दैवी संकेतांवर, नशिबावर, ज्योतिषावर, अंतर्मनाच्या हाकेवर निर्णय सोपवून त्या पुढे जातात. त्यांचा स्वभाव, विचार, जगण्याबद्दलची धारणा यावर त्यामुळे फारसा प्रकाश पडत नसला तरीही वस्तुनिष्ठपणा या कथनामध्ये आहे. शिवाय कितीही स्वप्नं मोडली तरीही पुन्हा नव्याने उभं राहण्याचं ‘सव्‍‌र्हायव्हल स्पिरिट’ही त्यात ठासून भरलेलं आहे. पुस्तकाच्या अखेरीस जेसिका लाल हत्येबद्दलची प्रकरणे सुरू झाल्यावर मात्र आपले निर्दोषत्व हिरिरीने मांडण्याच्या प्रयत्नात या आत्मचरित्राचा सूर आक्रस्ताळा झाला आहे. खरं तर इतक्या वर्षांनंतर या प्रकरणात आता नव्यानं सांगण्यासारखं काही नाही. या प्रकरणात अखेपर्यंत आपली साक्ष न फिरविल्याबद्दल रमाणी यांचं जितकं कौतुक झालं, त्याहून अधिक टीका घटनेच्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीवरून झाली होती. त्या आठवणींची कडू चव लेखनात उतरली आहे. त्यातच या घटनेवर आलेल्या चित्रपटात आपलं चित्रण चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा रागही आहेच. एरवी आपल्याच जगामध्ये, आपल्याच नियमकायद्यांप्रमाणे जगणाऱ्या वर्गातील कुणाचीही सर्वसामान्यांसाठीच्या व्यवस्थेशी आमनेसामने झाल्यावर या दोन जगांमधली तफावत उघडय़ावर पडते. जगण्यातील समतोल, आत्म्याची उन्नती, संवेदनशीलता वगरेबद्दलचे उदात्त विचार बाजूला पडतात आणि सर्वाना सारखंच लेखणाऱ्या व्यवस्थेबद्दलचा, कायद्याबद्दलचा आकस तेवढा उरतो. रमाणी यांच्या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणांमध्ये काहीसं असंच झालं आहे. तरीही एका अतिश्रीमंत तरीही पारंपरिक घरामध्ये वाढलेल्या, बंडखोरीची आस असलेल्या, पण धाडस नसलेल्या राजकन्येनं स्वत:ची ओळख मिळवेपर्यंत केलेल्या प्रवासाची ही कहाणी एकदा वाचून पाहण्यासारखी आहे.
बर्ड इन अ बन्यन ट्री – माय स्टोरी : बिना रमाणी
रेनलाइट, रूपा पब्लिकेशन
पाने : ३१०, किंमत : ५०० रुपये.

Story img Loader