उदयाला येणाऱ्या प्रत्येकासोबत एक नवे युग जन्माला येत असते. काही माणसं आपल्यासोबतच असं युग घेऊनच जन्माला येतात आणि ती माणसं गेली तरी त्यांनी सोबत आणलेलं ते युग मात्र पुढल्या खूप काळातही रेंगाळत मागे राहिलेलं असतं. या युगावर या माणसांचं नाव कोरलेलं असतं, म्हणूनच ते नाव आठवलं, की त्यांच्या युगाचे ठसे डोळ्यासमोर तरळू लागतात. आठवणींच्या कप्प्यात डोकावून त्या युगाचा धांडोळा घेणं सुरू होतं आणि त्यामध्ये मनही रमतं.. आज ज्येष्ठ नागरिक असलेल्या अनेकांच्या मनात अजूनही असं एक युग तरळत आहे. केवळ त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या नंतरच्या पिढीलादेखील त्या युगानं निखळ आनंद दिला आहे. गेल्या वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे झाली, या दहांपैकी प्रत्येक दशकावर कुणी ना कुणी कोरलेलं नाव हृदयाशी जपतच त्या त्या काळातील पिढय़ा जगल्या. आपल्या आठवणीतलं ते-ते सुवर्णयुग हृदयाशी जपलेल्या अनेकांना ‘बेबी’ नंदा यांच्या निधनाच्या बातमीने पुन्हा एकदा आठवणींच्या त्या हळव्या कप्प्यात शिरण्यास भाग पाडलं असेल.. उजव्या जिवणीवरचा तीळ, भावुक, निरागस, हसरे, बोलके डोळे आणि ओसंडून वाहणाऱ्या तिच्या अभिनयाच्या आठवणीही अनेकांच्या मनात पुन्हा एकदा जिवंत झाल्या असतील. पन्नासच्या दशकातील चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेल्या असंख्यांच्या मनावर कोरल्या गेलेल्या त्या काऴावर बेबी नंदा या गुणी अभिनेत्रीचे नाव कोरले गेले होते.. शंभर वर्षांची वाटचाल करणाऱ्या चित्रपटसृष्टीवर या अभिनेत्रीने उमटविलेली आपली मोहोर तिच्या निवृत्तीनंतरही तितकीच तजेलदार राहिली. सिनेमागृहात दणक्यात दाखल होणाऱ्या, काही आठवडय़ांतच गल्ल्याचा विक्रम करणाऱ्या आणि सुपरहिट ठरूनही पुढच्या काही वर्षांतच विस्मरणात जाणाऱ्या चित्रपटांच्या वर्तमानाच्या जमान्यातही ही मोहोर टवटवीतच राहिली. हे श्रेय फक्त त्या काळातील चित्रपटांचे नव्हते, तर त्या सृष्टीशी एकरूप झालेल्यांच्या अभिनयसंपन्न कर्तृत्वाचेही होते. अजूनही एखाद्या दूरचित्रवाणी वाहिनीवर जुन्या हिंदी गीतांच्या लडी उलगडू लागतात, सफेद रेशमी सलवार कुर्ता परिधान केलेली, पापण्यांची अल्लड उघडझाप करणारी बेबी नंदा पडद्यावर दिसू लागते, तेव्हा जुन्याबरोबरच नवी पिढीदेखील तो क्षण पकडण्यासाठी तळमळते.. बेबी नंदाचं हास्य तर सुंदर होतंच, पण पडद्यावरचं तिचं दु:खदेखील सहज होतं. म्हणूनच आज अर्धशतकानंतरही, तिच्या भूमिका काळजात कोरून ठेवणारा कुणी रसिक त्या आठवणींचा पट उलगडताना वर्तमानातलं वयही विसरतो.. नाटक आणि पुढे चित्रपटांतही अभिनयाची चमक दाखवणारे मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदाच्या वाटणीला पितृसौख्य आलं नाही, पण त्यांचा वारसा मात्र मिळाला आणि तिनं तो जपला. पुढे चित्रपटसृष्टी हाच तिचा श्वास झाला. १९४० पासून १९६० पर्यंतची दोन दशके हा चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. दिलीपकुमार वगळता, या काळात रुपेरी पडद्यावर आलेल्या प्रत्येक लोकप्रिय नायकाची नायिका म्हणून बेबी नंदाने आपला ठसा उमटविला. इतकेच नव्हे तर बेबी नंदा ज्या चित्रपटात असेल, तो चित्रपट नशीबवानच ठरणार, असेही जणू ठरूनच गेले.. ज्या चित्रपटांच्या सेटवर ही अभिनेत्री वावरली, तिथे तिच्या अस्तित्वाचा सुगंधही दरवळला.. कारण, उंची अत्तरे हाच तिचा शौक होता. निवृत्तीनंतर चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहूनही, ही अभिनेत्री झगमगाटातच वावरली. आपल्या युगावरच नव्हे, तर त्या काळात जन्मदेखील न झालेल्यांच्या युगावरही या अभिनेत्रीने आपली मोहोर उमटविली आहे. हे तिचं युग बेबी नंदानं सोबत नेलंच नाही. अजूनही अनेक र्वष ते तिच्या पश्चातही जिवंत राहणार आहे..

 

Story img Loader