प्रसिद्ध व्यक्तींना कधीकधी कुणी ओळखत नाही, याचा राग  न येता  हसू येते! स्वतला  नीट ओळखू शकलेल्या या व्यक्ती असतात..
आम्ही मुंबईत होतो तेव्हा, बाबा आमटय़ांचा फोन आला. ‘माझे एक मित्र कॅन्सरने आजारी आहेत, त्यांना भेटायला मी संध्याकाळच्या फ्लाईटने येतो आहे. मी एकटाच आहे, तुमच्याकडेच उतरेन.’ मला आणि माझ्या पत्नीला अस्मान ठेंगणे झाले. बाबा आपल्याकडे येऊन राहणार? यापेक्षा जास्त आनंद कोणता असेल? मी बाबांना एअरपोर्टवरून घरी घेऊन आलो. आमचे पाय जमिनीवर टेकतच नव्हते.
एवढय़ात दारावरची बेल वाजली. दारात आमच्या परिचयाचे एक जोडपे उभे होते. मी त्यांना आत बोलावून त्यांचे स्वागत केले आणि त्यांचा बाबांशी परिचय करून दिला. अर्थात बाबांच्या बद्दल ‘हे बाबा आमटे’ या पलीकडे काही सांगायची जरूर असेल असे मला वाटले नाही. पण त्या गृहस्थांनी मला आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. त्यांनी मला विचारले, ‘‘हे काय करतात?’’ यावर काय उत्तर द्यायचे ते मला सुचलेच नाही. बाबा म्हणाले, ‘‘मी रिकामटेकडाच आहे. काही करीत नाही. जमेल तसा फिरतो, जेवतो खातो आणि आराम करतो.’’ आता हे उत्तर माझ्याही बाबतीत लागू पडण्यासारखे होते.
फ्रान्सचा बादशहा नेपोलियन आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना त्याने प्रशियाशी एक युद्ध जिंकले. त्याला त्याच्या सेनापतींनी फ्रेडरिक द ग्रेटच्या कबरीपाशी नेले. नेपोलियन ती कबर पाहून थोडा खिन्न झाला. त्याचा सरदार जनरल लान्स बाजूच्या म्युझियममधून फ्रेडरिक द ग्रेटची तलवार उचलून घेऊन आला. जेत्यांना कोण अडवू शकणार? लान्सने ती तलवार नेपोलियनला नजर केली आणि विनंती केली की यापुढे नेपोलियनने ती तलवार धारण करावी. नेपोलियनने काहीच उत्तर दिले नाही. त्यावर इतर सरदारांनीही नेपोलियनला आग्रह सुरू केला की त्याने फ्रेडरिकची तलवारच वापरावी, कारण युरोपच्या इतिहासात फ्रेडरिकने चांगलाच दबदबा निर्माण केला होता. नेपोलियन त्यांना म्हणाला, ‘‘तुम्ही सगळे अकलेचे कांदे आहात. माझ्याजवळ ही माझी तलवार आहे ना? मला इतर कोणाच्या तलवारीची गरजच काय?’’ नेपोलियनला स्वत:च्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान होता. त्याने साऱ्या युरोपचा नकाशाच स्वत:च्या कर्तबगारीने बदलून टाकला होता.
पण नेपोलियनचे गर्वहरण होणारा एक प्रसंग पोलंडमध्ये घडला. तो ‘मेरी वालावस्का’ या चित्रपटात अतिशय उत्कृष्ट चितारला आहे. मेरी ही एका पोलिश सरदाराची मुलगी आणि नेपोलियनचे प्रिय पात्र. नेपोलियन मेरीला भेटण्यासाठी तिच्या प्रासादात आलेला आहे आणि दिवाणखान्यात मेरीची वाट पाहात उभा आहे. बाजूलाच, डोक्याने किंचित अधू असलेली मेरीची वृद्ध आजी एकटीच बुद्धिबळाचा डाव मांडून बसलेली आहे. जवळ कोणीतरी उभे असल्याचे जाणवल्यावर ती विचारते, ‘‘कोण आहे तिथे?’’ नेपोलियन पुढे येत सांगतो, ‘‘मी नेपोलियन, फ्रान्सचा बादशहा.’’ त्यावर ती वृद्धा संतापून म्हणते, ‘‘तू खोटारडा आहेस. मी फ्रान्सच्या लुई बादशहाला चांगली ओळखते.’’ यावर नेपोलियनला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तो गोंधळून तसाच उभा राहतो. थोडय़ा वेळाने आजीबाई शांत होऊन म्हणतात, ‘‘ठीक आहे बादशहा, बुद्धीबळ खेळता का आपण? बसा आणि खेळा माझ्याबरोबर.’’ नेपोलियन अंदाज येऊन खेळायला बसतो. मध्येच आजीबाई चिडून त्याच्यावर खोटे खेळण्याचा  आरोप करतात. तेवढय़ात मेरी तेथे येते. तेव्हा आजी तिला सांगते, ‘‘तू या खोटारडय़ा माणसाशी बोलूसुद्धा नको. तो येऊन मला सांगतो की, मी फ्रान्सचा बादशहा आहे आणि बुद्धिबळांतही फसवतो आहे.’’
नेपोलियनच्या चेहऱ्यावरचे भाव अप्रतिम दाखवले आहेत. जगभर दरारा असलेल्या माणसाशी असे वागू शकणारे कोणीही वेडपटच असायला हवे असे वाटेल. मोठे नाव कमावणाऱ्या व्यक्ती आपल्या क्षेत्रातच नव्हे तर त्याच्या बाहेरही  मशहूर असतात. पण त्यांच्याविषयी मुळीच माहिती नसलेल्या व्यक्तीही भेटतात. हिंदी सिनेमातले आघाडीचे कलाकार आपल्या लोकप्रियतेबद्दल गर्व बाळगून असतात, पण त्यांचेही कधी कधी चांगलेच गर्वहरण होते.
माझे स्नेही डॉ. बावडेकर सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आणि सर्जन होते. त्यांचे ‘कॅन्सर माझा सोबती’ हे पुस्तकही खूप गाजलेले आहे. त्यांनी एकदा ख्यातनाम सिनेनट राजेश खन्ना याची विकेट घेतली होती. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला राजेश खन्ना आपली पत्नी डिंपल हिच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे आला. उपचार पाड पडल्यावर डॉक्टर बावडेकर राजेश खन्नाला म्हणाले, ‘‘तुम्हाला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते!’’ डिंपलची हसून हसून मुरकुंडी वळली.
एकदा नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या सिनेमांचे चित्रण चालू होते. दोन्ही युनिट निरनिराळया हॉटेलमध्ये उतरली होती. त्यांच्या लोकांत फोनवरच्या संभाषणावरून भांडण झाले. गैरसमजामुळे एका युनिटची मंडळी भलत्याच हॉटेलमध्ये जाऊन बाचाबाची करायला लागली. ते हॉटेल नाशिकच्या एका प्रसिद्ध व्यक्तीचे होते आणि त्या रात्री ते स्वत:च हिशेब घ्यायला गल्ल्यावर बसलेले होते. त्यांच्याशी बोलाचाली होऊन फिल्म युनिटच्या लोकांनी त्यांना मारहाण केली. त्यावरून चिडून जाऊन शंभरएक लोक हॉटेलवर चालून गेले आणि तिथे दंगाच सुरू झाला. मला खबर मिळेपर्यंत पोलीस व्हॅन येऊन काही जणांना पोलीस ठाण्यावर नेण्यात आले होते. मी आरडाओरडा करून सर्वाना बाहेर काढले आणि हॉटेलच्या मालकांशी बोलणे केले. तेव्हा सर्व प्रकार गैरसमजावरून घडला असल्याचे जाणवले. विरुद्ध बाजूच्या मंडळींना आत आणायला सांगितले तेव्हा राज कपूर, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्याबरोबर आणि दोघांना आत आणण्यात आले. मला नवल वाटले. पण खरी गंमत म्हणजे हॉटेल मालकांनी त्यांना मुळीच ओळखले नाही, कारण ते कधी सिनेमा वगैरे पाहातच नसत.
आपल्या क्षेत्रांत भरपूर नाव कमावणाऱ्या व्यक्तींना आपण जाऊ तिथे सर्वजण ओळखतील असा भ्रम असतो. त्यांचा भ्रमनिरास अशा प्रसंगी होत असतो. एका थोर संतांचे याबाबतचे विचार लक्षात घेण्यासारखे आहेत, ‘लोक तर ईश्वरालासुद्धा ओळखत नाहीत. मग मला नाही ओळखले तर कोठे बिघडले?’ पण मुख्य मुद्दा इतरांनी ओळखण्याचा नाही तर स्वत:च स्वत:ला ओळखण्याचा आहे. निदान स्वत:बद्दल गैरसमज तरी नसावेत. खरे की नाही?

Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
avneet kaur met tom cruise mission impossible 8 set
२३ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीने घेतली हॉलीवूड स्टार टॉम क्रूझची भेट, पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले…
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”
Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?