जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आशीष नंदी यांच्या विधानावरून धुरळा उठण्याच्या आधी तिथे मॅन बुकर प्राइझची शॉर्ट लिस्ट (शेवटची १० लेखकांची) जाहीर झाली. त्यात ज्येष्ठ कादंबरीकार यू. आर. अनंतमूर्ती यांचा समावेश आहे. अनंतमूर्ती यांनी कन्नडमध्ये ‘नवी चळवळ’ सुरू केली, ‘संस्कार’सारख्या अनेक दमदार कादंबऱ्या लिहिल्या, नुकतीच वयाची ऐंशीही पूर्ण केली. त्यांना आजवर अनेक मानसन्मानही मिळाले आहेत. लागलाच नंबर तर आता बुकरही मिळेल. पण याच यादीत पाकिस्तानातील ज्येष्ठ साहित्यिक इंतज़ार हुसैन यांचाही समावेश आहे. त्यांचा मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी फारसा कुठे उल्लेख केलेला नाही. हे हुसैन अनंतमूर्ती यांनाही १० वर्षांनी वडील आहेत आणि त्यांची साहित्यिक कारकीर्दही तोलामोलाची आहे (मराठीतही हुसैन यांचं ‘मोरनामा’ हे पुस्तक भा. ल. भोळे यांनी आणले). हे प्राइझ अनंतमूर्तीना वा हुसैन यांपैकी (कुणाही) एकाला मिळावे, असे निखळ साहित्य- रसिकांना वाटणे साहजिक आहे. ५०,००० पौंडाच्या या घसघशीत बक्षिसाचा अंतिम निकाल २२ मे रोजी लंडनमध्ये जाहीर होणार आहे.. तेव्हा अनंतमूर्तीसाठी देव पाण्यात ठेवताना हुसैन यांच्यासाठी मन्नत मागावी की कसे, याचा विचार भारतीय वाचकांना करावा लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा