भाषेतले काही शब्द, म्हटलं तर त्यांना स्वतचा वेगळा अर्थ नाही. निर्थकच ते. पण अशाच शब्दांनी भाषेला जोरही येतो आणि बोलणाऱ्याचं- भाषा वापरणाऱ्याचं व्यक्तिमत्त्वही भाषेत उमटतं. शिवाय असं की, हे जे शब्द आहेत, त्यांचं व्याकरणातलं स्थान काय नि कुठल्या विभक्तीला कुठला प्रत्यय लावायचा, हे सारं अगदी कठीण वाटलं तरी संवादासाठी मात्र भाषा अनायास वापरली जाते..  मग त्यातले काही वाक्यं अर्थपूर्ण नसली, तरीही..

महाराष्ट्रातले एक मोठे राजकारणी आपल्या भाषणात सतत ‘आणि म्हणून’ असं म्हणत असतात. कोणत्याही वाक्याची सुरुवात ‘आणि म्हणून’ने करून मग ते काहीही बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ, ‘आणि म्हणून मला असं सांगायचंय, की आपण सगळय़ांनी या देशाला पुढे नेण्याची शपथ घ्यायला हवी.’ किंवा ‘आणि म्हणून तुम्ही सगळय़ांनी येत्या निवडणुकीत आपलाच पक्ष विजयी होईल, यासाठी जिवाचं रान करायला हवं.’ यातलं आणि म्हणून वगळलं तर वाक्याच्या मांडणीत आणि अर्थामध्येही कोणताच फरक पडण्याचं कारण नसतं. पण वाक्याची सुरुवात अशा ‘आणि म्हणून’ यासारख्या संपूर्णत: निरुपद्रवी आणि निर्लेप अशा अव्ययांनी केली म्हणजे आपण फार मोठी स्टाईल मारली असंही कदाचित वाटत असेल. असते एकेकाची बोलण्याची शैली. राजीव गांधी कोणत्याही भाषणात ‘हमें ये देखना है’ असं शंभरदा तरी म्हणायचे. ते काय पाहायचे आणि समोर बसलेल्यांना काय दिसायचं, हे कधी कळलं नाही. पण त्यांची ही शैली त्यांच्या नकलाकारांनी मात्र सहजपणे पकडली. शब्द आणि त्यांचे अर्थ यांच्यामुळे भाषा घडत असते. शब्दांना कसंही वाकवता येण्याएवढी लवचिकता ज्या भाषेत येते, तिचा काहीही व्यक्त करण्यासाठी अधिक चांगला वापर करता येतो. हिंदी ही आपल्याकडची अशी भाषा, जिच्या अंगवळणी अशी लवचिकता सहजपणे दिसते. प्रेमचंद हे हिंदीतले सुपर ग्रेट लेखक अतिशय कमी शब्दांची वाक्यं लिहायचे. पण त्यात ते शब्दांना इतक्या सहजपणे वाकवायचे, की शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा खूपच निराळा असा नवा अर्थ त्यातून ध्वनित व्हायचा. पु. शि. रेग्यांची ‘पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी’ अशा ओळी असलेली एक कविता (पुष्कळा) वाचली की शब्दांचे अर्थ कसे क्षणार्धात बदलत जातात, याचं मनोहारी दर्शन घडतं. ना. धों. महानोर जेव्हा ‘झिंगलो मी झांजझुलते झाड झालो’ असं लिहितात, तेव्हा शब्दांचे बदललेले रंग दिसायला लागतात. ही परंपरा  आली  ती संतसाहित्यातून . असं शब्द वाकवत वाकवतच भाषा श्रीमंत होते.
शब्दांना काही ना काही प्रत्यय जोडत तिचा वापर करण्याची मराठीची हातोटी जगावेगळी आहे. इथं शब्दाला काही चिकटलं की त्याचा वापर बदलतो. हे सारं लक्षात ठेवणं किती कठीण असतं, हे वयानं मोठे झालेल्या ज्याच्यावर मराठी शिकायची वेळ येते, त्यालाच कळतं. लिंगांचा भयावह वापर करणारा अमराठी माणूस जेव्हा तो बाटली किंवा ते पुरुष असं म्हणतो, तेव्हा जन्मत:च मराठी येणाऱ्याला त्याचं हसू येतं. कशाला काय चिकटवायचं, याचं शास्त्र ‘स, ला, ते, स, ला, ना, ते’ अशा नियमांत बांधूनही समजणं मानवी मेंदूच्या पलीकडचं असतं, असं ते शिकताना लक्षात येतं. इथं निवडणूक असा शब्द लिहिताना ‘णू’ दीर्घ लिहायचा आणि त्या शब्दाला काहीही प्रत्यय म्हणजे शेपूट जोडलं, की तो दीर्घ ‘णू’ ऱ्हस्व होतो आणि मग ‘निवडणुकीत’ असं लिहावं लागतं. असं ज्या त्या शब्दाला शेपूट जोडताना शंभरदा विचार करायचा, हे तर भयावहच म्हटलं पाहिजे. पण आपण हे सारं सहजपणे करतो. शिकत्या वयातच ते समजलेलं बरं असतं. नंतर मग फार कटकटी होतात. कळता कळत नाही. कोणत्या शब्दाला कोणता प्रत्यय लावायचा आणि कोणत्या परिस्थितीत लावायचा, याचं भान येणं म्हणजेच बहुतेक भाषा येणं असावं. मराठीतलं व्याकरण फार कष्टप्रद असल्याचं सांगणारे इंग्रजीतल्या सायकॉलॉजीच्या स्पेलिंगमध्ये ‘पी’ कुठून आला, असा प्रश्न मात्र विचारत नाहीत. असे प्रत्यय जोडण्याची खास मराठी पद्धत जगावेगळी म्हणायला हवी. इंग्रजीत शब्दाच्या शेवटी  डोक्यावर उलटा स्वल्पविराम देऊन ‘एस’ चिकटवण्याचा जसा नियम आहे, तसे मराठीत भाराभर आहेत. ते सगळे नियम आपल्याला आपोआप येतात आणि त्यात सहसा फार घोटाळे होत नाहीत. ज्याला आपण अशिक्षित म्हणतो, तोही असे घोटाळे सतत करत नाही. शब्दच नवा असेल तर त्याचं लिंग कळत नाही, म्हणून मग अनमान धक्क्याचं तंत्र वापरून तो वेळ मारून नेतो. एकदा शाळेतल्या मास्तरांनी सांगितलं, की निर्जीव वस्तू नपुंसकलिंगी असतात. तर समोरच्या मुलानं मग झाडावरच्या फुलाला ‘ते’ का म्हणतात, फूल सजीव नसतं का, असा प्रश्न विचारल्यावर मास्तरांची बोलती बंद झाली. एक अधिक एक बरोबर दोन असा गणिती नियम भाषेला लागू नसतो. त्यामुळे ती सतत बदलत राहते. तिच्या वापरात बदल होत जातो आणि त्यामुळे ती वाकवण्याची पद्धतही बदलते.
मराठीतले सर्वात नशीबवान शब्द आहेत, त्यांना अव्यय असं म्हणतात. ज्याला काहीही चिकटत नाही, ज्याचा अर्थ कसंही करून बदलता येत नाही आणि जे शब्द वापरणं आवश्यकच असतं, अशा या अव्ययांचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे. ज्या मराठी नेत्याला ‘आणि म्हणून’ची सवय आहे, त्यानं हे दोन शब्द अगदी जाणीवपूर्वक योजले असले पाहिजेत. कारण त्या शब्दांना काहीच चिकटत नाही. आणि चे आण्या, अणी, आण्ण्या, असं काही होत नाही आणि म्हणूनला चे, ते, ना, स, ला, असले कोणतेच प्रत्यय जोडता येत नाहीत. किती नशीबवान शब्द हे. आणि, व, परंतु, पण, मात्र, किंवा, ही अव्ययं दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरतात. हे अर्थ जोडणारे पूलच जणू! निराकार आणि निर्विकारही. यांना कुणी चिकटायचं ठरवलं, तर ते फक्त भुवया उंचावून नापसंती दर्शवतील. फार तर डोळं वटारतील. मराठीतला ‘संधी’ हा शब्दही म्हणून सारखाच. त्याचं काहीच करता येत नाही. त्याला काही जोडता येत नाही आणि वाकवताही येत नाही. पण हल्ली ‘संध्या’ असं त्याचं बहुवचन करून आपलं मराठी फार उच्च दर्जाचं असल्याचं दाखवण्याची नवी फॅशन आली आहे. अनेक संध्या नाही, संधीच.. असं ठणाणा करून सांगितलं, तरी ते डोक्यात शिरत नाही. धोका आहे, तो हे न समजणाऱ्या शिक्षकांकडून. त्यांनाच जेव्हा हे बरोबर आहे, असं वाटायला लागतं, तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांची तरी काय चूक! शिवाय आणि ऐवजी हेही असेच दोन शब्द. ज्यांचं काहीच कडबोळं होत नाही. ध्रुव ताऱ्यासारखे अढळ.. असे शब्द म्हणजे भाषेचे सरदार. कुणाची वाकडी नजर करून पाहण्याची शामत नाही आणि करायला गेलाच, तर फसगत होण्याची शंभर टक्के हमी. नुसता संदर्भ बदलून शब्दांचा अर्थ बदलवण्याची प्रतिभा ज्या सर्जनशीलांकडे असते, त्यांनाही या अव्ययांना हात नाही लावता येत. गुमान त्यांचं ऐकावं लागतं.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे जे जागतिक नियम आहेत, त्यात त्या भाषेचा वापर किती काळ होत आहे, यावर भर आहे. मराठीला असा अभिजाततेचा दर्जा मिळावा, म्हणून सध्या थोर खटाटोप सुरू आहे. त्याला     
यश येऊन मराठी ही जगातली अभिजात भाषा म्हणून मान्यता पावेल, तेव्हा तिच्याकडे कुत्सितपणे किंवा टवाळ नजरेनं पाहण्याचा अधिकार फक्त अव्ययांना असेल. कशातही न मिसळण्याची मराठी माणसाची प्रवृत्ती या अव्ययांनी पहिल्यापासूनच अंगीकारली आहे. मुळात त्यांना स्वत:चा असा अर्थ नाही. जो आहे, तो संदर्भामुळे प्राप्त होणारा. आणि, व ही दोन्ही अव्ययं समान कारणांसाठी वापरायची. पण त्यांचा सलग दोनदा वापर करायचा नाही, असा संकेत. म्हणजे आणि, आणि असं म्हणायचं नाही किंवा व, व असं लिहायचं नाही. पण या अव्ययाला ‘निश्चय’ असा आणखी एक अर्थ चिकटला आणि त्यामुळे इतर अव्ययांमध्ये ‘पण’चं महत्त्व जरासं कमीच झालं. डॉ. द. दि. पुंडे यांच्या ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ या अप्रतिम पुस्तकात एक छान संदर्भ आहे. एका जुन्या मराठी चित्रपटात नायिका असलेल्या इंदिरा चिटणीस यांना कोणत्याही संभाषणाची सुरुवात, ‘सांगायची गोष्ट म्हणजे की’ या वाक्यानंच करायची सवय असते. त्या काळातल्या तंबू थिएटरमधले सगळे प्रेक्षक काही काळानंतर इंदिरा चिटणिसांनी बोलण्यासाठी ‘आ’ केला की त्यांच्याबरोबरीनंच हे ‘सांगायची गोष्ट म्हणजे की’ वाक्य म्हणायचे. प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना असं निर्थकतेनं पकडून ठेवण्याची नामी युक्ती राजकारण्यांना जास्त उपयोगी ठरणारी आहे. अर्थच नाही, तरीही त्याच्या वापरावाचून पर्याय नाही, अशा या अव्ययांशिवाय भाषेलाही करमत नाही. दोन वाक्यांना जोडणारे हे अव्ययांचे पूल भाषेलाही अर्थाविना समृद्ध करत असतात!

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Story img Loader