आधी घर, मग गाव, राज्य आणि मग देश साफ करायला निघालेल्या अण्णांनी देशभरातला सारा भ्रष्टाचार लोकपाल नावाच्या झाडूने साफ होईल असे स्वप्न पाहिले खरे; पण केजरीवाल यांनी या आंदोलनाला वळण देऊन आणखी मोठा झाडू स्वत: हाती घेतला. आता देश या दोन झाडूंतील बेबनाव पाहातो आहे..
एक होते अण्णा. एक होता अरविंद. अण्णा राळेगण शिंदीचे. अरविंद दिल्लीचा. त्यामुळे अण्णांचे घर होते शेणाचे आणि अरविंदचे घर होते न वितळणाऱ्या मेणाचे. अण्णांना स्वच्छतेची खूप आवड. ते सारखी साफसफाई करायचे. हे साफ कर. ते झाडून काढ. त्यांनी या साफसफाईची सुरुवात घरापासूनच केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले आपणच आपल्या घराच्या स्वच्छतेतील अडथळा आहोत. मग त्यांनी घरातून स्वतला बाहेर काढले आणि ते गावच्या देवळात राहू लागले. मग त्यांनी गावाची साफसफाई सुरू केली. गाव स्वच्छ हवे असेल तर गावाचे नावही स्वच्छ हवे. म्हणून मग त्यांनी गावाच्या नावातील शिंदी काढले आणि ते सिद्धी केले. ते लोकांना सांगू लागले, बाबांनो, स्वच्छता पाळा. त्यांनी नाही ऐकले की सुरू अण्णांचे उपोषण. अशामुळे अण्णांना उपोषणाचे व्यसनच लागले म्हणा ना. अण्णा सारखे उपोषण करतात म्हणून मग लोक ऐकू लागले त्यांचे. पण त्यामुळे अण्णांची पंचाईतच झाली की. आपले लोकांनी ऐकले तर उपोषण कसे काय करणार, अशी चिंता त्यांच्या मनी निर्माण झाली. त्यावर सर्वानी अण्णांना असे सांगितले की आपला गाव आपण स्वच्छ केला आहेच, तर आता राज्यावर लक्ष केंद्रित करावे.
म्हणजे आता व्यापक प्रमाणावर उपोषण करायला मिळणार या आनंदात अण्णा खूश होऊन मनी हसो लागले. त्यानंतर मग कोठे काही खात्यांतील घाण काढ तर कुठे माहितीस अडथळा येणारा कचरा काढ.. अशा प्रश्नांवर अण्णा उपोषणकर्ते झाले. हे संपले की ते आणि तेही संपले की पुन्हा हे आहेच. त्यामुळे अण्णांना उपोषणास कधीच ददात पडली नाही. अण्णांनी उपोषण करावे. त्यांच्या चतुर साजिंद्यांनी छायाचित्रे, ब्रेकिंग न्यूज आदींची चोख व्यवस्था ठेवावी, समस्त जनतेने घरोघरी दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या अण्णांच्या उपोषणावर भोजनप्रसंगी भरल्या ताटावरून मिटक्या मारीत चर्चा करावी असे वारंवार घडू लागले. दहाएक दिवसांच्या कथित कडकडीत लंघनानंतरही चुस्त आणि जवान दिसणाऱ्या अण्णांच्या उपोषणकौशल्यावर जनतेने तोंडात (स्वतच्याच) बोटे (तीही स्वतचीच) घालावीत हे तो नेहमीचेच. या त्यांच्या कसबास भारून राज्यातील मेळघाट आदी प्रदेशातील बालकांना उपोषित राहण्याची कला शिकविण्यासाठी अण्णांना नेमावे की काय, असाही विचार राज्य सरकारने करून पाहिला. परंतु राज्य सरकारचाच विचार तो. काँग्रेसजन तो करू लागले की राष्ट्रवादीजन तो हाणून पाडतात आणि राष्ट्रवादीजन तो करू लागले की काँग्रेसजन काय करावे या विवंचनेत दिल्लीकडे पाहू लागतात. असो. परंतु या उपोषण कलेने अण्णा हे राज्यातील शक्तिपीठच बनले. कॅमेऱ्याच्या झगझगाटात अण्णांच्या पायावर डोके ठेवल्याखेरीज कोणाही मुख्यमंत्र्यांस सत्ता लाभेनाशी झाली. तेव्हा राज्य सर झाल्याचे मानून अण्णांनी दिल्लीकडे आपला मोहरा वळविला.
त्यांना आता देशातील घाण साद घालू लागली. देश साफ करावयाचा तर राजधानीतच जावयास हवे असे त्यांच्या मनाने घेतले. परंतु इतका मोठा देश साफ करावयाचा तर साथीदारही हवेत आणि झाडूही मोठा हवा. शिवाय दिल्लीत जावयाचे तर राष्ट्रभाषेचाही परिचय हवा. तेव्हा अण्णांनी हिंदी भाषक असे नवे साथीही मिळवले. पोलीस दलातून निवृत्त झाल्याने भाषणांखेरीज काही काम नसलेल्या किरण बेदी अण्णांना याच प्रवासात भेटल्या. जनकल्याणाचा धाक दाखवता दाखवता जमीनजुमला मिळवणारे भूषणास्पद असे भूषण पितापुत्रदेखील राजधानीतच अण्णांना भेटले. त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे अत्यंत चुणचुणीत असा अरविंद केजरीवाल नामक शिष्यदेखील अण्णांना या राजधानीने मिळवून दिला. यातील केजरीवाल वा बेदी हे सरकारी सेवेतील. त्यामुळे त्यांना न खाता राहणे माहीत नाही. आणि भूषण खासगीतले. त्यामुळे त्यांचे सर्वच खासगी. खाणेही आणि अन्यही. याउलट अण्णा. उपोषण हेच त्यांचे खाणे. तेव्हा दिल्लीकरांना काही न खाताही टुणटुणीत राहण्याच्या अण्णांच्या कौशल्याचे चांगलेच कवतिक. त्याच कवतिकापोटी हे सारे जण तू अण्णा, मी अण्णा, आपण सारेच अण्णा.. असे गीत गाऊ लागले. या गीताने खूश होत अण्णांनी नव्या उपोषणाची तयारी केली आणि सर्वानी देश साफ करायचा विडा उचलला. परंतु त्यांच्यातील अण्णा आणि बेदीबाई सोडल्या तर सगळेच कृश. त्यांना देशभर साफसफाई करण्याएवढे शारीरिक श्रम कसे झेपणार? तेव्हा मग त्यांनी नव्या झाडूसाठी चिंतन सुरू केले. या चिंतनाअवस्थेतच त्यांना साऱ्या देशास स्वच्छ करून लोकांना आनंद देऊ शकेल अशा झाडूचे दर्शन झाले. अण्णाचमूने यास नाव दिले लोकपाल. या नव्या झाडूच्या जन्मानंतर तो कोणी प्रथम कोठे वापरायचा यावर बराच खल झाला. असा खल करणारे हे सर्वच नि:स्वार्थी असल्याने त्यांचे एकमत होईना. तेव्हा मग अण्णांनी दिल्लीतच उपोषण सुरू केले. आपले एकमत होत नाही म्हणून सरकारने तरी हा लोकपाल नावाचा झाडू स्वीकारावा अशी अण्णांची मागणी. सगळय़ांनाच ती पटली. परंतु सरकारला काही पटेना. सरकारचे म्हणणे असे की मुदलात आताच इतके झाडू असताना आणखी एक लोकपाल नावाची ब्याद कशाला. परंतु अण्णा ऐकावयास तयार नाहीत. त्यांचे उपोषण सुरूच. तेव्हा या उपोषणामुळे दिवसेंदिवस सुदृढ होत जाणारी अण्णांची प्रकृती पाहून सरकारलाच काळजी वाटली आणि हा लोकपाल नावाचा झाडू आपण हाती धरू असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर अण्णांच्या कळपात भलताच अनवस्था प्रसंग ओढवला. एका झाडूने भागणार नाही म्हणून केजरीवाल यांनी अण्णांच्या झाडूस जनाचे दांडके लावून जनलोकपाल नावाचा आपला वेगळाच झाडू तयार केला आणि अण्णांना जे जमले नाही ते करून दाखवले. म्हणजे निवडणूक लढून आपल्या लगतच्या हाती झाडूच झाडू दिल्यामुळे अण्णांच्या कळपात अधिकच अस्वस्थता माजली. कु. बेदी अण्णांच्या मदतीला धावल्या तर भूषणांनी अरविंदाची कास धरली.
तूर्त परिस्थिती अशी की अण्णा आणि अरविंद तुझा झाडू की माझा यावर चर्चेत मग्न आहेत. लोकपाल या मूळ झाडूस अरविंदाने जन दांडा लावल्यामुळे त्यास आपला झाडू मोठा असे वाटते आहे तर दांडे मोठे झाले म्हणून झाडू मोठा कसा होतो असे विचारीत अण्णा आपलाच झाडू अधिक चांगला असे चॅनेलाचॅनेलांवर उपोषित उत्साहात सांगत आहेत.
परिणामी जनतेस केर न काढता केरसुणीच्या आकारावरून भांडणाऱ्यांचाच ताप होऊ लागला असून हा कचऱ्याचा ढीग कसा काढावयाचा याची चिंता लागून राहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा