डॉ. गिरीश कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२१ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आरंभ, बांगलादेशमुक्ती आणि भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचा सुवर्ण महोत्सव, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी अशी अनेक निमित्ते जुळून आली. त्या वेळचे सामाजिक आणि राजकीय वास्तव पाहता, त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देण्यावर ‘स्नेहालय’मधील युवानिर्माण गटात एकमत झाले. त्यातून भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेचा संकल्प अंकुरला.

समाजात वेगळेपण आणण्यासाठी वेगळ्या पद्धतीने जगू इच्छिणारे १५० तरुण या यात्रेत सहभागी झाले. त्यात केरळच्या आर्किटेक्ट अजित राजगोपालपासून काश्मीरमधील अभियंता अस्लम बेगपर्यंत सर्व स्तरांतील तरुणांचा समावेश होता. त्यांनी ५८ दिवसांत सहा राज्ये आणि दोन देशांत चार हजार २८० किलोमीटर प्रवास केला. वाटेत येणाऱ्या गावांतील मनामनांत सद्भावनेची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने तरुणाईला भारतीय समाजाचा तळ दिसला. नवा भारत घडविण्यासाठीच्या कल्पना आणि प्रेरणा अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांकडून मिळाल्या.

यात्रेचे आयोजन सुरू असताना कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन हिंसक झाले होते. सीमेवरील दहशतवादाचा पायरव देशात ऐकू येत होता. काश्मीर, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा, गोहत्या, श्रद्धांची अवहेलना, धर्मांतर, लव्ह जिहाद, बुरखा अशा मुद्द्यांवरून द्वेषमूलक मजकूर समाजमाध्यमांतून पसरविला जात होता. ‘सूल्ली डिल्स’, ‘बुलीबाई’सारख्या ॲप्सची निर्मिती केली गेली होती. राष्ट्रपिता, स्वातंत्र्य चळवळ याविषयी चुकीचा इतिहास सांगितला जात होता. जातकारण आणि धर्मकारणाची झूल पांघरून संघटित गुन्हे करून त्यांना धर्म आणि देशभक्तीचा मुलामा दिला जात होता.

फाळणीपूर्वी देशात दोन धर्मांचे बिनसले होते. आता ही फूट जाती- पोटजाती- भाषा या स्तरांवर पार खोलवर झिरपली आहे. भारताच्या संस्कृतीचा पाया तिची बहुसांस्कृतिक जडणघडण आणि परस्पर सद्भावना आहे. तिचे चिरे या भावनिक भूकंपाने ढासळत होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक विचारधारा लुप्त होत होती.

‘जय भारत’, ‘जॉय बांगला’, ‘जय जगत’! भारत आणि बांगलादेशची सांस्कृतिक नाळ धर्माचे भेद असूनही तुटलेली नाही. स्वातंत्र्य चळवळीची दोन्ही देशांची भावधारा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या समान धाग्यांनी विणलेली होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचीच गीते दोन्ही देशांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू यांच्या श्रद्धा आणि मूल्यांमध्ये एक समान लय होती. लोकशाही भावधारा, नैतिकता, निर्भयता, विचारांची आणि उद्देशाची स्पष्टता, सत्य-अहिंसेशी त्याचे नाते होते. दोघांच्याही हत्या उभय धर्मांतील कट्टरपंथींनी त्यांच्या नैतिक भूमिकांमुळे केल्या. दोन्ही देशांत नागरी स्तरावर संवाद आणि मित्रता वाढवायला ही पूरक पार्श्वभूमी होती. १९५० च्या दशकात ‘जय जगत’ नारा देत विनोबा भावेंनी आणि १९८० च्या दशकात ‘भारत जोडो’ नारा देत बाबा आमटे यांनी देशाच्या भावनिक एकतेसाठी अमूल्य काम केले. हाच धागा सद्भावना सायकल यात्रेने बळकट केला.

यात्रेची तयारी सहा महिने सुरू होती. प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी एक महिना दोन्ही देशांतील नामांकित विचारवंत, पत्रकार भारत आणि बांगलादेशच्या संस्कृती- इतिहास आणि राजकारणाचे अभ्यासक यांच्याशी यात्रेकरूंचा रोज ऑनलाइन संवाद झाला. शेवटचे सहा दिवस राष्ट्रीय युवा योजनेचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर एस. एन. सुब्बाराव, भाईजी, अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत सद्भावना शिबीर संपन्न झाले. ही पर्यटन मोहीम नसून सद्भावनेच्या उद्देशासाठी काढली जाणारी यात्रा असल्याची तसेच संभाव्य हालअपेष्टांची जाणीव सर्वांना करून देण्यात आली. बंगाली आणि हिंदी गाणी सर्वांनी पाठ केली. पथनाट्याचा उत्तम सराव झाला.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी गांधी जयंतीला आम्ही सायकलवर टांग मारली. ‘चले जाव आंदोलना’त अटक झाल्यावर अहमदनगरमधील किल्ल्यात गांधीजी वगळता सर्व राष्ट्रीय नेते तीन वर्षे तुरुंगवासात होते. या नेत्यांनी तेथेच नवभारताची स्वप्ने सहविचाराने गुंफली. या प्रेरक ठिकाणापासून बांगलादेशमधील नोखालीपर्यंत जाण्याचे नियोजन होते.

सद्भावनेचे तीर्थक्षेत्र – नोखाली

यात्रेचा समारोप नोखाली येथे करण्यामागे एक भूमिका होती. नोव्हेंबर १९४६ मध्ये दंगली शमविण्यासाठी गांधीजी बिहारमध्ये होते. तेथील शांती अभियान अर्धवट सोडून ते बंगालमधील नोखाली येथे तातडीने पोहोचले. तिथे धार्मिक दंगलीत विशेषत: हिंदू महिला आणि मुलांवर अनन्वित अत्याचार होत होते. त्यामुळे ते व्यथित होऊन ‘एकला चलो’ म्हणत नोखालीत पोहोचले.

त्यानंतर महिन्याने तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी इंग्लंड सरकारला लिहिले की, ‘सिंध आणि पंजाबमध्ये लष्कराच्या सहा मोठ्या तुकड्या पाठवल्या. पण तेथील रक्तपात आणि दंगली थांबल्या नाहीत. परंतु महात्मा गांधींनी एकट्याने नोखाली आणि बांगलादेशातील धार्मिक विद्वेष शमवला. सद्भावना जागृत केली. त्यामुळे रक्तपात थांबला.’ स्थायी शांतता सद्भावनेच्या अहिंसक साधनांद्वारेच प्रस्थापित होते, हे गांधीजींनी नोखाली येथे चार महिन्यांच्या प्रयत्नांनी सिद्ध केले. त्यानंतर गेली ७५ वर्षे तिथे धार्मिक सद्भाव कायम आहे. त्यामुळे समारोपासाठी ते ठिकाण निवडण्यात आले. आजही तिथे गांधी आश्रम आहे. ‘सायकल यात्रेच्या माध्यमातून महात्मा गांधी पुन्हा भारतातून बांगलादेशात आले,’ अशा भावना ट्रस्टचे संचालक राहा नबा कुमार यांनी व्यक्त केल्या.

अस्वस्थ भारताचे दर्शन

यात्रेत सर्व जाती- धर्मांतील तरुण-तरुणी सहभागी झाल्या. दोन यात्री १२ वर्षांखालील होते. साठी ओलांडलेले चार जण हट्टाने आले होते. सर्व आर्थिक- सामाजिक गटांतील व्यक्तींचा सहभाग होता. सर्व यात्री झोपडपट्ट्या, लालबत्ती विभाग, आदिवासी आणि नक्षल प्रभावित विभाग, ग्रामीण आणि शेतकऱ्यांचे अस्वस्थ समुदाय, जातीय आणि धार्मिक तणाव – संघर्ष असलेली गावे अशा ठिकाणी राहिले. या समुदायांशी आम्ही संवाद साधला. एकीची प्रेरणा टिकवण्यासाठी रस्त्यातील गावांत ‘सद्भावना वृक्ष’ लावण्यात आले. लिंब- वड- पिंपळ अशी देशी झाडे लावली.

आपल्या विचारांवर आधारित ठोस कृती आपापल्या स्तरावर करणारे सामान्यजन आणि चळवळी आम्ही जवळून पाहिल्या. त्यात झारखंडमध्ये जंगलमाफियांच्या तावडीतून १० हजार हेक्टर जंगल जिवावर उदार होऊन वाचवणारी जमुना टुडू, रस्त्यांवरील बालकामगार आणि झोपडपट्टीतील १० हजार मुलांना दर्जेदार मोफत शिक्षण देणारा हावडा येथील मामुन अख्तर, आयआयटी आणि आयआयएममध्ये शिक्षण घेऊन एके काळी संगणक क्षेत्रात लठ्ठ पगाराची नोकरी करणारा आणि गेली दोन दशके तीन हजार वंचित मुलांची परिवार केंद्र ही शाळा चालविणारा विनायक लोहानी, मदर तेरेसा यांच्या कार्याची धुरा सांभाळणारी सिस्टर प्रेमा, प्रशासनातील भ्रष्टाचार मोडून छत्तीसगडमध्ये आदिवासी भागाचा कायाकल्प करणारा सनदी अधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, अशा देश घडवणाऱ्या ५०० व्यक्ती, संस्था आणि चळवळींशी ही तरुणाई जोडली गेली. यात्रेला कोणतेही कॉर्पोरेट प्रायोजक नव्हते. राजकीय पक्ष अथवा गटांचा छुपा पाठिंबा नव्हता. सरकारी पाठिंबादेखील नव्हता. त्यामुळे ताटात पडेल ते खायचे, जागा मिळेल तिथे राहायचे, हेच आमचे धोरण होते.

विविध सामाजिक संस्था, मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, शाळांत आम्ही राहिलो. हावडा येथील ‘समररिटन हेल्प मिशन’, कोलकाता येथील ‘परिवार केंद्र’, नोखाली येथील ‘महात्मा गांधी ट्रस्ट’, ‘आनंदवन’ यांसारख्या अनेक संस्थांनी आम्हाला आश्रय दिला. लोकांना जोडणारे सद्भावनेसारखे नैतिक उद्दिष्ट असेल, तर गरीब माणसे आपल्या ताटातील अर्धी भाकर आनंदाने देतात, हा अनुभव सर्वत्र आला. त्यामुळे अवघ्या सहा लाखांत यात्रा पूर्ण झाली. त्यापैकी चार लाख सोबतच्या तीन वाहनांच्या डिझेलवरच खर्च झाले.

ढाका येथील वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणारे रवी देशमुख आणि शाहिमा अख्तर, स्नेहालयचे मार्गदर्शक रमेश कचोलिया, कोटक महिंद्रा बँकेचे चेअरमन प्रकाश आपटे आणि अरुण शेठ, केअरिंग फ्रेंड्स गट, विविध रोटरी क्लब, कोलकाता येथील मनीष भारतीय यांनी जो सहज- सहयोग दिला त्यातच सर्व भागले.

‘अनामप्रेम’ संस्थेचे दिव्यांगांचे कलापथक ‘एकला चलो’ आणि असंख्य बहुभाषिक गाणी गात सोबत आले. अवतार मेहेर बाबा ट्रस्ट, राष्ट्रीय छात्र सेनेचे ५७ महाराष्ट्र बटालियन, पेमराज सारडा महाविद्यालय, महारोगी सेवा समिती (वरोरा), बंगालचे मराठी भाषक मुख्य सचिव संजय थाडे आणि त्यांचे बंधू नितीन थाडे यांची आयोजनात साथ मिळाली.

शासनाचा असहकार

बांगलादेशच्या बेनापोल येथील सीमेपर्यंत १५० सायकल यात्री सोबत होते. सर्वांचेच लक्ष्य ‘चलो नोखाली’ होते. परंतु प्रचंड परिश्रम, खटपटी करूनही शेवटी बांगलादेशचा व्हिसा आमच्यातील फक्त ११ जणांनाच मिळाला. यात्रेपूर्वी ज्येष्ठ कार्यकर्ते भूषण देशमुख यांच्याशी संवाद साधला होता. तेव्हा बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमीन, मुक्तियोद्धा विभागमंत्री इझंमुल हक आदी आम्हाला सहजपणे भेटले. त्यांनी १९७१ साली भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र झाला, याची अपार कृतज्ञता वारंवार व्यक्त केली. सायकल यात्रेच्या कल्पनेचे मनापासून स्वागत केले. अपेक्षा फक्त एकच व्यक्त केली, ती म्हणजे भारत सरकारच्या परराष्ट्र विभागाकडून एक शिफारस पत्र देण्याची. कारण भारत सरकारची खप्पामर्जी न होण्याची तेथे काळजी घेतली जाते. त्यानंतर या दौऱ्याला शासकीय अधिष्ठान आणि राष्ट्रव्यापी स्वरूप देण्यास ते तयार होते. गावोगावी बांगलादेशातील तरुण- तरुणी आणि १९७१ चे मुक्तियोद्धे यांना या यात्रेत सहभागी करण्याचे त्यांचे नियोजन होते. तिरंगा आणि बांगलादेशचा राष्ट्रध्वज सोबत लावून जनमानस प्रेरित करण्यात तिथे सर्वांनाच रस होता.

शिफारस पत्र मिळविण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री, परराष्ट्र विभागाचे दोन्ही राज्यमंत्री, परराष्ट्र सचिव, इतर तीन मंत्री, परराष्ट्र विभागातील बांगलादेशचा कारभार पाहणारे साहाय्यक सचिव, भारताचे बांगलादेशमधील राजदूत, भारताच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री आणि अधिकारी, सत्ताधारी वर्तुळातील प्रभावशाली खासदार यांना आम्ही वारंवार भेटलो. यात आमचा सर्वाधिक वेळ गेला. वरील सर्वांनी मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला, प्रशंसा केली. परंतु प्रत्यक्षात शिफारस पत्र मात्र कोणीही दिले नाही.

असंख्य ई-मेल पाठवल्यावर परराष्ट्र विभागातील सचिवाने कळवले की, शिफारस पत्र मिळणार नाही. बांगलादेशमधील नोखाली, कुमिल्ला भागात धार्मिक संघर्ष झाल्याने परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे शिफारस करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. खरेच तसे असेल तर सद्भावना निर्मितीसाठीची सायकल यात्रा तेथे घेऊन जाण्याची यापेक्षा महत्त्वाची वेळ कोणती असेल? या प्रश्नावर उत्तर मिळाले नाही.

बांगलादेशच्या दिल्लीतील उच्चायुक्त आणि मुंबईतील तसेच कोलकात्यातील उप-उच्चायुक्त यांनीही भारत सरकारची शिफारस नसताना व्हिसा देणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे १५० पैकी १३८ पासपोर्टधारक सायकल यात्रींचा पेट्रापोल येथील सीमेवर पुरता हिरमोड झाला.

ढाका, गोपालगंज, कुमिल्ला आणि नोखाली येथे आम्ही थेट लोकसमूहात गेलो. तिथे विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांत राहिलो. सद्भावना- धार्मिक एकता आणि मानवतेची गाणी, भजने, प्रार्थना म्हटल्या. तिरंगा आणि बांगलादेश यांचे झेंडे आमच्या सायकलींवर लावले होते. सोबत कोणतेही संरक्षण कवच, पोलीस वगैरे नव्हते, तरीही द्वेषाचा अनुभव एकदाही आला नाही.

प्रत्येक ठिकाणी झेंडे, टी शर्ट पाहून लोकांनी थांबवले. आमचे प्रेमाने स्वागत आणि उत्तम आतिथ्य केले. १९७१ सालच्या मुक्तियुद्धातील भूमिकेमुळे आणि एक कोटी बांगलादेशी १० महिने सांभाळणाऱ्या भारताविषयी येथील लोकमनात कृतज्ञता आहे. चहाच्या टपरीवर आणि सायकल-रिक्षातून उतरताना आम्ही भारतीय असल्याचे समजल्यावर लोक गरीब असूनही पैसे घेत नव्हते.

बांगलादेशात गावोगाव मुक्तियुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे गट आम्हाला उत्सुकतेने भेटले. येथील शाळा आणि विद्यापीठांत विद्यार्थी- शिक्षक आणि प्राध्यापक उत्सुकतेने आमचे म्हणणे ऐकत होते. आम्ही किमान १३ संग्रहालये पाहिली. तेथे बांगलादेशचा इतिहास असलेले हिंदू, बौद्ध, जैन शैलीतील चित्र-शिल्प-साहित्य मनोभावे जपलेले दिसले. युद्धासंबंधीच्या सर्व संग्रहालयांत भारताचा गौरव आणि कृतज्ञता झळकत होती. जनरल इर्शाद आणि बेगम खलिदा जिया यांच्या सत्ताकाळात बांगलादेश इस्लामिक राष्ट्र घोषित झाले. पण बांगलादेशातील लोक हे प्रथम बंगाली आहेत. भारताशी सांस्कृतिक आणि भावनिक नाते टिकवायला हा शेजारी उत्सुक आहे.

बांगलादेशाशी नागरी आणि शासकीय स्तरावर मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात घुसखोरीसह अनेक मुद्द्यांचे अडसर आहेत खरे, पण यावर मैत्री, विश्वास आणि संवादाशिवाय अन्य उपाय नाही. बांगलादेशातील माध्यमांनी यात्रेची चांगली दखल घेतली. भारतीय माध्यमांत मात्र ही धडपड बेदखल राहिली.

जेवढे चष्मे, तेवढे गांधी

१९४७ मध्ये नोखालीत गांधीजींबरोबर अब्दुल कलाम भुईया रोज ‘रघुपति राघव राजाराम’ म्हणायचे. त्यांनी आता नव्वदी ओलांडली आहे. ते आम्हाला म्हणाले, ‘पूर्वी मुल्ला- मौलवी उर्दूत प्रवचन द्यायचे. सर्वप्रथम इथे गांधीजींनी कुराण बंगालीत सांगितले. धर्माचा खरा अर्थ समजल्याने मुस्लिमांनी हिंसा थांबवून हिंदूंच्या रक्षणाची शपथ घेतली. इथे गांधी एकटे होते. पण त्यांना कोणी इजा केली नाही. भारतात त्यांची हत्या का झाली, हा प्रश्न मला आजही अस्वस्थ करतो.’ फरहाद, त्यांचा नातू सांगत होता, ‘आजोबा रामधून म्हणू लागले की आम्ही ओळखतो की त्यांना बापूंची आठवण आली आहे.’ भुईया यांचा अश्रुपात थांबत नव्हता.

अपूर्वा सहा नोखालीतील हिंदू समाजातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे मिठाईचे पाच पिढ्यांपासूनचे दुकान आहे. ते म्हणाले की, ‘गांधींमुळे येथील हिंदूंचे प्राण वाचले. आजही आम्ही हिंदू, बौद्ध येथे सन्मानाने राहतो, ते गांधींनी येथे पेरलेल्या सद्भावामुळे.’ गांधीजी भारतात अलीकडे मुस्लीमधार्जिणे वाटतात, याविषयी नोखालीतील हिंदूंनी आणि अल्पसंख्याक समुदायातील मानवाधिकार कार्यकर्ते सत्येंद्र बोस तसेच नोखाली विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक चक्रवर्ती यांनी आश्चर्य व्यक्त केले. नोखाली विद्यापीठातील ३७५ पैकी ७३ प्राध्यापक हिंदू आहेत. सहा जण बौद्ध आणि ख्रिश्चन आहेत. अनेक विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू हिंदू आहेत. नोखाली विद्यापीठात हिंदू आणि मुस्लीम विद्यार्थी वसतिगृहांत एकत्र राहतात. तसेच विद्यापीठाने आवारात मशिदीशेजारी तेवढेच मोठे मंदिरही बांधले आहे .

सध्या विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या कुमिल्ला येथे भेटलेल्या एक पदाधिकाऱ्याने आम्हाला सांगितले, ‘बिहारमध्ये मुस्लीम दंगलीत मरत असताना त्यांना सोडून केवळ हिंदूंसाठी गांधीजी नोखालीत आले. हिंदू त्यांना जास्त प्रिय होते.’ हे ऐकून आम्ही आमच्या मनातील प्रतिमांवर नव्याने विचार करू लागलो. यात्रेने काही उत्तरे दिली आणि अस्वस्थ करणारे नवे प्रश्नही उपस्थित केले.

लेखक ‘स्नेहालय’ या संस्थेचे संस्थापक आहेत.

girish@snehalaya.org