राम जेठमलानी यांच्या साडेसातीतून सुटका कशी करून घ्यावी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडला असावा. नितीन गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी संधी दिल्यापासून पक्षाची साडेसाती सुरू झाली आणि आपल्या सुपीक डोक्यातून त्यावर तोडगा काढण्याऐवजी जेठमलानी यांनी पक्षाची ग्रहदशा अधिक विपरीत करून ठेवली. गडकरींना घरी पाठवा, अशी जाहीर मागणी त्यांनी केली. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांपासून अनेक गुन्हेगारांचे वकीलपत्र चालविणारे जेठमलानी यांनी केवळ आरोपांवरून गडकरींना घरी जाण्याचा सल्ला द्यावा हा एक विनोदच म्हटला पाहिजे. गडकरींनी भाजपचे अध्यक्षपद सोडणे हे राजकीय शहाणपण ठरेल हे मान्य केले तरी ती सूचना जेठमलानी यांच्याकडून यावी याचे आश्चर्य वाटते. अर्थात वादळ ओढवून घेणे व पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्ये करणे यासाठीच जेठमलानी प्रसिद्ध आहेत. फौजदारी व दिवाणी प्रकरणे चालविण्यातील त्यांचे बुद्धिकौशल्य वादातीत असले तरी राजकारणात केवळ लक्ष वेधून घेण्यापलीकडे त्यांनी अन्य कोणतेही अर्थपूर्ण काम केलेले नाही. भाजपचे अनेक नेते त्यांचे अशील आहेत व कायद्याच्या क्षेत्रात त्यांचा विलक्षण दबदबा आहे. कदाचित यामुळेच त्यांना राज्यसभेवर भाजपने पाठविले. राज्यसभेत ते भाजपचे सदस्य असले तरी मुळात हा माणूस कोणत्याही पक्षाचा नाही व तसा तो राहणे शक्यही नाही. ते त्यांच्या रक्तातच नाही. त्यांची मते स्वतंत्र असतात व ती मांडताना ते कोणाचाही मुलाहिजा ठेवीत नाही. त्यांना राजकारण हे मानमरातब मिळविण्यापुरतेच हवे असते. पक्षाला बहुमत मिळविण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही आणि अशी जबाबदारी दिली तरी ते घेणार नाहीत. न्यायालयात शिस्तीत चालणारी त्यांची जीभ राजकारणात आडवळणाने चालते. अशा स्वयंभू व्यक्तीचा पक्षात समावेश करताना हजारदा विचार करायला हवा. परंतु, लालकृष्ण अडवाणी व अन्य ज्येष्ठांनी तसा विचार केला नाही आणि ही नसती कटकट पदरी बांधून घेतली. आता त्यांची हकालपट्टी करून पक्ष पायावर धोंडा पाडून घेणार आहे. कारण जेठमलानी यांनी पक्षाला अडचणीत टाकले असले तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाकडे पक्षाला दुर्लक्ष करता येणार नाही. सीबीआयच्या संचालकाच्या नेमणुकीवरून भाजपने काँग्रेसला खरमरीत पत्र लिहिले व ही नेमणूक थांबवावी असा आग्रह धरला. जेठमलानी यांनी नेमकी वेगळी भूमिका घेतली व काँग्रेसने केलेल्या नेमणुकीचे समर्थन केले. आता या मुद्दय़ावरून भाजपने जेठमलानींवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला असला तरी मागील आठवडय़ात गडकरींवर त्यांनी केलेले शरसंधान हे कारवाईचे मूळ कारण आहे हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. याशिवाय त्यांचे मोदीप्रेम हेही संघ परिवाराला आवडलेले नाही. गडकरींच्या विरोधातील वक्तव्ये पक्षातील गडकरीप्रेमींना काहीही करून थांबवायची आहेत. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, शांताकुमार अशी गडकरी विरोधकांची फळी वाढत चालल्यामुळे त्याला अटकाव करण्याची केविलवाणी धडपड म्हणून जेठमलानींवरील कारवाईकडे पाहता येईल. जेठमलानी हेच त्यात राजकीयदृष्टय़ा निरुपद्रवी आहेत असा पक्षाचा समज असावा. जेठमलानी यांच्यामागे आमदार-खासदार वा कार्यकर्त्यांची फळी नाही हे खरे असले तरी चमकदार व गोळीबंद आरोप करून लक्ष वेधून घेण्याची त्यांची क्षमता डोळ्यांआड करण्याजोगी नाही. प्रसारमाध्यमे तर अशा वक्तव्यांसाठी भुकेलेली असतात. राजकीय शक्ती नसली तरी पक्षाचे नुकसान जेठमलानी करू शकतात हे लक्षात घेता सध्या वक्री झालेल्या या ग्रहाच्या साडेसातीतून, केवळ हकालपट्टीने पक्षाची सुटका होणे सोपे नाही.
रामाची साडेसाती
राम जेठमलानी यांच्या साडेसातीतून सुटका कशी करून घ्यावी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडला असावा. नितीन गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी संधी दिल्यापासून पक्षाची साडेसाती सुरू झाली आणि आपल्या सुपीक डोक्यातून त्यावर तोडगा काढण्याऐवजी जेठमलानी यांनी पक्षाची ग्रहदशा अधिक विपरीत करून ठेवली.
First published on: 27-11-2012 at 12:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvayarth bjp headacc ram jethmalni