बॉलिवूड म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टी, अशी लोकांची समजूत करून दिल्याचे खापर गिरीश कासारवल्ली या कलात्मक चित्रपटांच्या गुणी दिग्दर्शकाने भारतीय चित्रपट-पत्रकारितेवर फोडले आहे. बॉलिवूडबद्दल जगाची अशी समजूत होणे ही भारतीय चित्रपट- पत्रकारितेची शोकांतिकाच होय, असे कासारवल्ली म्हणाले. गोव्यात सध्या भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे, त्या व्यासपीठावरून स्वतच्या नव्या चित्रपटाविषयी बोलताना बॉलिवूडच्या बोलबाल्याबद्दल कासारवल्ली व्यथित दिसले. दुसरीकडे, याच महोत्सवात यंदा मानाचा पाहुणा देश असलेल्या तुर्कस्तानातील चित्रपट दिग्दर्शक हुसैन कराबे यांनी बॉलिवूडपटांना ‘फॉम्र्युला’ माहीत असतो, या शब्दांत जाहीर कौतुक केले. फॉम्र्युला हा शब्द नेहमीच बॉलिवूडबद्दल नापसंती व्यक्त करण्यासाठी राखून ठेवला जाई; तसे कराबे यांना म्हणायचे नव्हते. भावनिक, व्यक्तिगत कथा मांडूनही लोकांच्या भावविश्वाशी नाते सांगण्याचे लोभस समीकरण बॉलिवूडला गवसले आहे, असे त्ले. कासारवल्लींनी एका मल्याळम दिग्दर्शकाचा खास उल्लेख करून, त्याचाही चित्रपट कान महोत्सवात गेला, त्याकडे कुणाचे लक्षच नाही, अशी खंत भर ‘इफ्फी’त व्यक्त केली. पण फ्रान्समधील त्या कान महोत्सवात बॉलिवूडचे कौतुक होऊ लागले त्याला पाच वर्षे लोटली. बॉलिवूडकडे पैसा, ग्लॅमर हे सारे होतेच, पण त्यापेक्षा निराळी जागतिक प्रतिष्ठा हिंदी लोकप्रिय चित्रपटसृष्टीला मिळू लागली. मुख्य म्हणजे हॉलिवूड श्रेष्ठ आणि बॉलिवूड कनिष्ठ हा गंड दूर झाला. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘जब तक है जान’ या चित्रपटाने हॉलिवूडच्या सवाई दहा चित्रपटांच्या गल्ला-यादीत मिळवलेले आठवे स्थान! हे स्थान म्हणजे अढळपद नव्हे, गल्ला हा चित्रपटाच्या दर्जाचा निकष नव्हे आणि त्यासाठी एखाद्या चित्रपटाचे कौतुक करणे बरे नव्हे, हे सारे खरे. पण या उदाहरणातून जगाने बॉलिवूडला का स्वीकारले, याचा फेरविचार करण्याचे एक मोठे निमित्त मिळाले आहे. फेरविचाराचे हे आमंत्रण कासारवल्ली यांच्यासारख्या लोकांनी नाकारलेले दिसते. भारतीय चित्रपट पत्रकारितेची शोकांतिका असे कासारवल्ली ज्याला म्हणतात, ते तर १९७० पासून सुरू होतेच. आता जगातही भारतीय म्हणजे बॉलिवूडचा सिनेमा, असे समीकरण होते आहे, ते का? जे लोकांपर्यंत पोहोचते आहे, बाजारात उतरून यश मिळवते आहे, त्याला नाके मुरडण्याचे कारण नाही.. उलट त्याची गुणवैशिष्टय़े आपण पाहावीत, असे जगाला आज वाटते. कुणी याचेही खापर आजच्या सांस्कृतिक क्षेत्रात शिरलेल्या बाजाराच्या प्रवाहांवर फोडू पाहतील, पण बाजारात आळशी राहून चालत नाही. एकाच सुपरस्टारवर वा त्याच्या पसंतीच्या अभिनेत्रीवर भिस्त ठेवून, साचेबद्ध कथानके माथी मारून आणि मुख्य म्हणजे दर्जा आणि तांत्रिक कौशल्य कमी ठेवून बाजार मिळत नाही. तो मिळवण्यासाठी या जुन्या सवयी बॉलिवूडने बदलल्या. आजच्या बॉलिवूडचे कौतुक करायला हवे ते या बदलांसाठी आणि तांत्रिक दर्जा वाढवला, यासाठी!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा