बाबा-गुरू,मग ते ईश्वराचे दूत बनून अध्यात्माला आपले माध्यम बनविणारे असोत किंवा लक्ष्मीचे उपासक बनून अर्थप्राप्तीला फसवणुकीचे माध्यम बनविणारे असोत; या दोहोंना भक्तगण, अनुयायांचा तुटवडा बिलकूल नाही. श्रीमंतीच्या स्वप्नपूर्तीच्या त्याच त्या जुन्याच दारूची नव्या बाटलीतून होणारी जोमदार विक्री याचे सारखे प्रत्यंतर देते. गेली अडीच-तीन वर्षे प्रत्यक्ष शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांचा वावर घसरणीला लागला आहे, अनेक नामांकित शेअर दलाल पेढय़ाही दिवस वाईट असल्याची बेलाशक कबुली देत आहेत. अशा स्थितीत ‘स्टॉक गुरू इन्व्हेस्टमेंट’नामक दुकान राजधानी दिल्लीत थाटले जाते. सुमारे दोन-सवा दोन लाख ‘गुंतवणूकदारां’कडून गुरुदक्षिणाही मिळविली जाते. ही दक्षिणा कमी नव्हे, तर तब्बल ५०० कोटी रुपयांच्या घरात जाणारी! उल्हास प्रभाकर खैरे आणि रक्षा अर्स या आधुनिक ठकगुरू दाम्पत्याने वेगवेगळी नाव-रूपे धारण करीत ‘देता किती घेशील दो कराने’ म्हणत लक्षावधींना धनसंपन्न भविष्याच्या स्वप्नांची विक्री करीत ही माया जमवली. आठवडय़ाभरापूर्वी रत्नागिरीत ते अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले. नागपूर, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद, लखनऊ, भुवनेश्वर, देहराडून, रायपूर, दिल्ली अशा देशांच्या सर्व दिशांमध्ये संचार करणाऱ्या या दाम्पत्याने गेल्या आठ वर्षांत सात वेगवेगळी नावे धारण केली. देशभरात १२ ठिकाणी आलिशान बंगले-फ्लॅट्स अशी मालमत्ता बनविली; ‘महागडय़ा’ असे विशेषण लावले जाईल अशा १२ लक्झरी मोटारींचा ताफा बाळगला; पंचतारांकित हॉटेलात बडय़ा सेलिब्रिटीज्च्या साक्षीने पाटर्य़ा झोडून लोकांना भुरळ घातली. लक्षणीय म्हणजे प्रत्येक नव्या ठिकाणी डेरा जमविताना या मंडळींनी वेगवेगळी ओळख निर्माण करीत त्या नावांनी बँकांमध्ये खाती उघडली, क्रेडिट कार्डेही मिळविली आणि बेलाशक त्यांचा वापरही केला. नागपूरमधील फसवणुकीच्या गुन्ह्यात २००४ साली फरार झालेल्या उल्हासच्या चलाख मेंदूचा गुन्हेगारी कस वयाच्या २४ व्या वर्षीच दिसून आला. धड पदवी शिक्षणही त्याने पूर्ण केलेले नव्हते. बंगळुरूमध्ये त्याने आपली जीवनसंगिनी म्हणून केलेली निवडही मोठय़ा अक्कलहुशारीचाच नमुना म्हणता येईल. नंतर या दोघांनी मिळून केलेल्या फसवणूककांडांनी या देशात शिकूनसवरून अडाणी राहिलेल्या मूर्खाचे मोहोळ किती मोठे आहे याचा प्रत्ययच दिला आहे. भारत देश विशाल आहे तो त्याच्या आसेतुहिमाचल विस्तारामुळे आणि त्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेने; देश विशाल बनला आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येने आणि त्यातील क्रयशक्तिशाली व गुंतवणूकक्षम मध्यमवर्गीयांच्या महाकायतेमुळे! पण जगाचे आकर्षण बनलेल्या या मध्यमवर्गीयांच्या विशालतम बाजारपेठेत अर्थनिरक्षर मूर्खाची असलेली घाऊक भरती, हेदेखील भारताचे एक व्यवच्छेदक व लांच्छनास्पद लक्षण बनू पाहत आहे. सध्या देशात भ्रष्टाचार व लाचखोरीने प्रच्छन्न व हीनदीन स्वरूप गाठले आहे. जनसामान्य त्यात होरपळून निघत आहेत. त्यात सध्या जोमाने सुरू असलेल्या ठकीच्या धंद्यांची झळ बसलेल्यांची संख्याही जमेस धरायला हवी. एकेक करीत उलगडत असलेल्या नवनवीन प्रकारानंतर हे स्पष्ट होत आहे. जरा चौकशी करून पाहा, आपल्या कुटुंबातील नसले तरी जवळच्या नातेवाईकांपैकी कुणा न कुणाला तरी या साखळी गुंतवणूक, पिरॅमिड मार्केटिंग स्कीम्सच्या जाळ्यातील सावज बनून काही हजारांवर तरी निश्चितच पाणी सोडावे लागलेले असेल.
श्रीमंतीच्या ‘गुरू’ची करणी..
बाबा-गुरू,मग ते ईश्वराचे दूत बनून अध्यात्माला आपले माध्यम बनविणारे असोत किंवा लक्ष्मीचे उपासक बनून अर्थप्राप्तीला फसवणुकीचे माध्यम बनविणारे असोत; या दोहोंना भक्तगण, अनुयायांचा तुटवडा बिलकूल नाही. श्रीमंतीच्या स्वप्नपूर्तीच्या त्याच त्या जुन्याच दारूची नव्या बाटलीतून होणारी जोमदार विक्री याचे सारखे प्रत्यंतर देते.
First published on: 16-11-2012 at 12:59 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvayarth share broker and investors