आधुनिक मराठी साहित्याचे समीक्षक गंगाधर पाटील यांच्या निधनामुळे आपण काय गमावले, हे लक्षात घेण्यासाठी आधी आपण कसे होतो आणि त्यांनी काय दिले, हे पाहावे लागेल. केशवसुतांचा चिद्वाद (आयडिअॅलिझम), बालकवींचा अद्भुतवाद (रोमँटिसिझम), १९७०-८० च्या दशकात मराठी कादंबऱ्यांतून दिसू लागलेला अस्तित्ववाद (एग्झिस्टेन्शिअलिझम), अरुण कोलटकरांच्या कवितांतून दिसणारी समाजाकडे पाहण्याची त्यांची विरचनावादी (‘डीकन्स्ट्रक्शन’ची दृष्टी), हे सारे आपल्या आधुनिक मराठी साहित्य परंपरेचा अविभाज्य भागच मानणारे आपण. त्यामागच्या विचारधारांचे नामकरण आणि त्या विचारधारांचा अभ्यास युरोपात आपल्याआधी झाला म्हणून ते सारे ‘परके’, असे समजण्याचा मूर्खपणा आपण करत नाही. उलट, जगभरच्या विचारधारा आपल्याशा करण्यातून साहित्य सशक्त होत असते, हे आपण लक्षात घेतो. मराठीतला साहित्याचा प्रवाह असा पुढे जात असताना, त्याची समीक्षा मात्र आस्वादक आणि चरित्रात्मकच राहणार की काय, अशी परिस्थिती होती. प्राध्यापकी समीक्षा बोकाळलेली होती. आजच्या साहित्याला आजची समीक्षाच हवी, असे ओरडून सांगणारी लघु अ-नियतकालिके मराठीत निघूनही समीक्षेतल्या बदलांची गती फारच धिमी होती. अशा पटावर गंगाधर पाटील यांचे काम मराठीत निराळे ठरले नसते, तरच नवल. सोस्यूर ते देरिदा या सुमारे साठ-सत्तर वर्षांच्या वैचारिक घुसळणीच्या कालखंडाने साहित्य, कला, त्यांचे लोकांकडून होणारे ग्रहण आणि त्याची समीक्षा याबद्दलची केवळ युरोपचीच नव्हे तर जगाची दृष्टी बदलणारी वैचारिक आयुधे मिळत आहेत, हे गंगाधर पाटील यांनी नेमके हेरले. या नवसमीक्षेच्या वाटेवरचे त्यांचे सहप्रवासी होते म. सु. पाटील. त्याआधी वा. ल. आणि व. दि. या कुलकर्णीनी प्राध्यापकी समीक्षेलाही डोळे उघडण्याची सवय लावली होती, उघडय़ा डोळय़ांनी काय दिसू शकते हे प्राध्यापक नसलेल्या मर्ढेकर आणि प्रभाकर पाध्यांनी दाखवून दिले होते, यानंतर पाटील-द्वयाने उघडय़ा डोळय़ांनी साहित्य व समीक्षेचा प्रांत नीट पाहिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा