९२व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून श्रीमती नयनतारा सहगल यांना निमंत्रित करून नंतर न येण्याचे पत्र पाठवणाऱ्या संयोजक संस्थेमुळे सुरू झालेला वाद अखेर अ. भा. मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला. हे महामंडळ दर वर्षी संमेलनाचे ठिकाण ठरवते; पण त्यानंतर महामंडळ या संस्थेचा साहित्य संमेलनाशी थेट संबंध केवळ शेवटच्या सत्रातील ठराव ठरवण्यापुरताच मर्यादित. या महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हे अतिशय कामसू आणि कष्टाळू आहेत, असे त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील शेकडो संदेशांमुळे स्पष्ट होते. उद्घाटनाला कोणाला बोलवायचे हा अधिकार संयोजक संस्थेचा असल्याने श्रीपादरावांनी त्याकडे दुर्लक्ष केले हे ठीकच; पण त्यांच्या येण्यामुळे काही अघटित होणार असल्याची शंका येताच, संयोजकांनी नयनतारा सहगल यांना न येण्याबाबत पत्र पाठवले. महामंडळाचे अध्यक्ष हे विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्षही आहेत. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या उपाध्यक्षांना, म्हणजेच महामंडळाच्या अध्यक्षांना सहगल यांना पाठवायच्या पत्राचा मसुदा इंग्रजीत करून देण्याची मदत मागितली. अशी मदत करताना त्या पत्रात काय म्हटले आहे, हेच आपल्याला माहीत नाही, असा साळसूदपणाचा आवही श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आणून दाखवला. निदान त्या वेळी तरी त्यांनी आपल्या पदाचा आब राखून स्पष्ट विरोध का केला नाही? खरे तर कुणा एका राजकीय व्यक्तीने सहगल यांना विरोध करताच अध्यक्षांनी त्याविरोधात भूमिका घ्यायला हवी होती. जेव्हा सहगल यांना न येण्याचे पत्र पाठवायचे ठरले, तेव्हा असा निर्णय घेतला जाणार असेल, तर आपण राजीनामा देऊ, असेही वक्तव्य अध्यक्षांनी केले नाही. वास्तविक साहित्य व्यवहारात साहित्यबाहय़ शक्तींचा होत असलेला शिरकाव महामंडळाला अमान्यच असायला हवा; परंतु माध्यमांतून या विषयाची जोरदार चर्चा सुरू होईपर्यंत ‘आपण त्या गावचेच नाही’ अशी भूमिका घेणाऱ्या श्रीपाद जोशी यांनी अचानक राजीनामा देऊन आपले सगळे बिंग फोडून टाकले आहे. ‘महामंडळाचे अध्यक्ष गेले दोन दिवस, दिवस-रात्र माध्यमांच्याच सेवेत असल्याने अन्य कोणतेही काम करू शकलेले नाहीत. संपूर्ण एक्झॉस्ट झाले आहेत,’ असा संदेश स्वत:च पाठवून त्यांनी स्वत:चेच हसू करून घेतले आहे. हा सगळा विषय ज्या असंवेदनशीलतेने हाताळण्यात आला, त्यामुळे साहित्य महामंडळ आणि त्याचे अध्यक्ष या दोघांचीही पुरती नाचक्की झाली. राजीनामाच द्यायचा होता, तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या कार्यकर्त्यांच्या पुंडशाहीविरोधातच द्यायला हवा होता. त्यानंतर उद्घाटकांना त्यांनी येऊ नये, असे पत्र पाठवतानाही, त्यास विरोध करून राजीनामा देता आला असता. पत्र पाठवल्यानंतर या सगळ्या विषयाबद्दल विदर्भ साहित्य संघ आणि संयोजक संस्था यांच्यातील संबंधांबाबत समाजमाध्यमात चर्चा रंगवण्याऐवजी श्रीपाद जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट करून राजीनाम्याचे अस्त्र उपसायला हवे होते. असे काही न करताही आपण अध्यक्षपदावर राहून हवे ते करू शकू अशी त्यांची अटकळ असावी. आपण साहित्यिक आहोत आणि आपल्याला आविष्कारस्वातंत्र्य आहे, त्यास कोणीही अडथळा आणू शकत नाही, अशी साहित्य महामंडळाची भूमिका असायला हवी; परंतु उद्घाटनाचे निमंत्रण देऊन ते मागे घेण्याएवढा उद्धटपणा अंगी बाणवणाऱ्यांना वेळीच आवरणे, हेही महामंडळाचेच काम असायला हवे. केवळ संयोजक संस्था निवडणे आणि आपण त्या संस्थेचे सदस्य असतानाही, तेथील घडामोडींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, हा अगोचरपणा झाला. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी तो निश्चितच केला आहे, यात शंका नाही.

Story img Loader