अलेक पदमसींच्या निधनामुळे रंगभूमी आणि जाहिरात क्षेत्र अशा दोन्ही आघाडय़ांवर सहजपणे वावरलेल्या दुर्मीळ व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. जग त्यांना एक निष्णात जाहिरातगुरू म्हणून ओळखते, तरी रंगभूमी ही त्यांची पहिली आवड होती. इब्राहिम अल्काझी आणि थोरले बंधू सुल्तान पदमसी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू झाली. पुढे जाहिरात क्षेत्रात आल्यानंतरही त्यांचे रंगभूमीप्रेम कमी झाले नाही. तुघलक, जीझस ख्राइस्ट सुपरस्टार, एव्हिटा, ब्रोकन इमेजेस अशी मोजकी पण लक्षणीय नाटके त्यांनी केली. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या रिचर्ड अ‍ॅटनबरोकृत अजरामर चित्रपटात पदमसी यांनी  मोहम्मद अली जिनांची भूमिका केली होती. फारसे न बोलता चष्म्यातून रोखून पाहण्याची त्यांची छबी जिनांच्या (भारतीयांच्या दृष्टीने खलनायकी ठरलेल्या) व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारी ठरली. संवादक, कथाकाराचे धडे रंगभूमीवर गिरवल्याचा मोठा फायदा पदमसींना जाहिरात क्षेत्रात झाला असावा. नाममुद्रा (ब्रँड) आणि ग्राहक यांच्यातील नाते त्यांच्याइतके सखोलपणे फार कमी लोकांनी अभ्यासले होते. अतिशय काटेकोरपणे ते स्वत: प्रत्येक नाममुद्रेचे आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या संभाव्य आणि अपेक्षित परिणामांचे आडाखे बांधत. आपल्यासारखेच आपल्या सहकाऱ्यांनीही जाहिरात क्षेत्रात वावरताना आजूबाजूच्या परिस्थितीचे, माणसांचे, समाजाचे निरीक्षण करत राहिले पाहिजे याविषयी ते आग्रही असत. लिंटास ही जाहिरात संस्था या क्षेत्राची जणू पंढरी होती. ते तऱ्हेवाईक होते. फटकळही होते. पण त्यांना अपेक्षित सचोटी सहकाऱ्यांनी दाखवल्यावर त्यांची पाठराखण करण्यात आणि त्यांचे कौतुक करण्यात पदमसी कधीही मागे राहिले नाहीत. सर्फच्या जाहिरातीतील ललिताजी, साऱ्या देशवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेल्या बजाज स्कूटरची ‘हमारा बजाज’ ही जाहिरात, एमआरएफ टायरचा मसलमॅन, फेयर अ‍ॅण्ड लव्हली आणि पुढे फेयर अँड हँडसम या जाहिराती खूप गाजल्या. पण त्या प्रत्यक्षात आणण्यामागे प्रचंड निरीक्षणशक्ती, सामाजिक भान आणि आर्थिक गणिताची जाण होती. मर्सिडिझ मोटारीतून भाजी घ्यायला जातानाही भाजीवाल्यांशी दर्जाबद्दल घासाघीस करणाऱ्या आपल्या आईला पाहिल्यानंतर पदमसींना हुशार आणि व्यवहारी ललिताजी स्फुरल्या होत्या. चेरी ब्लॉसमच्या जाहिरातीसाठी त्यांनी चार्ली चॅप्लिनच्या लोकप्रियतेचा वापर केला. कामसूत्र कंडोम आणि लिरिल साबणाच्या जाहिरातीमधील स्नानकन्येला दाखवताना त्यांनी भारतीय समाजात दबलेल्या शृंगारिकतेला साद घालण्याचा प्रयत्न केला होता. या सजग प्रयोगशीलतेमुळेच जवळपास १०० नाममुद्रांच्या निर्मितीसाठी त्यांना पाचारण केले गेले. पीयूष पांडे, प्रसून जोशी अशा प्रतिभावान जाहिरातकारांनी त्यांना गुरुस्थानी मानले.  सन २००० मध्ये पद्मश्री, सन २०१२ मध्ये संगीत नाटक अकादमी असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले. जाहिरातविश्वात आणि लिंटासमध्ये त्यांना आदरयुक्त प्रेमाने ‘गॉड’ असे संबोधले जायचे. एखादे उत्पादन ग्राहकांसाठी केवळ उत्पादन नसते. ते त्यांच्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायचे असेल, तर ग्राहकांच्या भावविश्वाचा ठाव घेतला पाहिजे. त्यातूनच एखाद्या ‘प्रॉडक्ट’चा ‘ब्रँड’ होतो हे त्यांनी उद्योजकांच्या मनात ठसवले. ‘तुम्हाला जे म्हणायचे आहे, ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही. मग ग्राहकापर्यंत कसे पोहोचणार?’ असे त्यांनी एका बडय़ा उद्योगपतीला सुनावले होते! अशा स्पष्टोक्तींनंतरही उद्योगपतींना त्यांच्या ‘ब्रँड’चे भवितव्य पदमसींच्या हातातच सुरक्षित वाटे, ही त्या नावाची ताकद आणि जादू होती. त्या अर्थी पदमसी स्वत:च एक खात्रीशीर ‘ब्रँड’ बनून गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा