अमेरिकेत टेक्सास राज्यातील एका सिनेगॉगमध्ये शनिवारी घडलेले ओलीसनाट्य पाकिस्तान, अल काइदा आणि दहशतवाद हे समीकरण अधोरेखित करणारे ठरले. यहुदी प्रार्थनास्थळामध्ये मलिक फैझल अक्रम या पाकिस्तानी ब्रिटिश नागरिकाने घुसून उपस्थितांना ओलीस ठेवणे आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात आफिया सिद्दीकी या पाकिस्तानी महिला दहशतवादी हस्तकाच्या मुक्ततेची मागणी करणे हे ज्या दिवशी घडले, त्याच्या आदल्याच दिवशी पाकिस्तानतर्फे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर झाले होते. या धोरणात दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत थारा न देण्याविषयी निर्धार वगैरे व्यक्त करण्यात आला होता! मलिक फैजल अक्रमला दहशतवादविरोधी कारवाईत अमेरिकेच्या एफबीआय संस्थेच्या कमांडोंनी ठार केले. त्याने आफियाचा उल्लेख ‘बहीण’ असा केला होता. आपला व मलिकचा काहीही संबंध नसल्याचे आफियाने अमेरिकेतील एका तुरुंगातून प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु तिच्या खुलाशाने प्रकरण येथेच संपत नाही. आफिया सिद्दीकीला ‘लेडी अल काइदा’ असे संबोधले जाते. याचे कारण २०१०मध्ये अफगाणिस्तानमध्ये तैनात अमेरिकी सैनिक आणि एफबीआय गुप्तचरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. त्या व अन्य प्रकरणांमध्ये मिळून ८६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सध्या ती अमेरिकेत भोगते आहे. याचा ‘बदला’ घेण्यासाठी मध्यंतरी आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीच्या साथीदारांनी दोन अमेरिकी पत्रकारांचा शिरच्छेद घडवून आणला होता. ९/११ कटातील एक आरोपी खालिद शेख मोहम्मदच्या भाच्याशी तिचा विवाह झाला आहे. तिच्या सुटकेसाठी २०१३मध्ये कट आखल्याची कबुली खुद्द इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासीन भटकळने गुप्तवार्ता विभागाला दिली. पुष्कर मेळ्यातून परदेशी यहुदी नागरिकांचे अपहरण करून, त्यांना आफियाच्या मुक्ततेसाठी ओलीस ठेवण्याचा तो कट होता. गेली १५ वर्षे अल काइदा आणि आयसिस या दहशतवादी संघटना विविध प्रकारे आफियाच्या सुटकेसाठी वेगवेगळे कट रचतच आहेत.

दहशतवाद्यांची हस्तक असा शिक्का बसलेल्या आफियासारख्या संशोधकाच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी प्रयत्न करणे हे एक वेळ समजण्यासारखे. परंतु तिच्या सुटकेसाठी पाकिस्तानी सरकारकडूनही अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत, हे धक्कादायक आहे. पाकिस्तानात तिला ‘राष्ट्रकन्या’ असे संबोधले जाते आणि विविध सरकारांनी तिच्या सुटकेसाठी अमेरिकेकडे आर्जवे केली आहेत. बराक ओबामा प्रशासनाच्या कार्यकाळात कैद्यांच्या देवाणघेवाणीचा मुद्दा पाकिस्तानतर्फे उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी डेव्हिड रेमंड या सीआयए हस्तकाच्या बदल्यात आफियाच्या सुटकेची मागणी पाकिस्तानने केली. ओबामा प्रशासनाने ती फेटाळून लावली. आफिया सिद्दीकी थेट कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा पुरावा सादर झालेला नाही. पण खालिद शेख मोहम्मदसाठी हस्तक आणि खबरी म्हणून ती काम करत होती हे सिद्ध झाले आहे. अशा व्यक्तींच्या सुटकेसाठी पाकिस्तानात सरकारी पातळीवर प्रयत्न होतात यात आता आश्चर्य वाटण्यासारखेही काही राहिलेले नाही. अफगाणिस्तान नव्हे, तर पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र असल्याचे विधान भारताचे माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी पूर्वीच केले होते. आता तर दहशतवादी गटांशी बोलणी करणे हे तेथील सरकारचे जणू राष्ट्रीय धोरण बनलेले आहे. या देशाचे स्वयंघोषित किंवा अघोषित हस्तक जगभर दहशतवादी कृत्यांमध्ये गुंतलेले आढळतात यात नवल काही नाही.

Story img Loader