महाराष्ट्रात मराठा, हरयाणामध्ये जाट, झारखंडमध्ये आदिवासी या प्रबळ समाजांना मुख्यमंत्रिपद न देणाऱ्या भाजपने आता गुजरातेत पटेल समाजाऐवजी जैन समाजातील विजय रुपानी यांच्याकडे नेतृत्व सोपविले आहे. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावर त्यांनी गुजरातची सूत्रे आनंदीबेन पटेल यांच्या हाती दिली होती. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा व आनंदीबेन यांच्यातून विस्तव जात नव्हता. मोदींमुळे आनंदीबेन दोन वर्षे टिकल्या. पाटीदार पटेल समाजाच्या आरक्षणावरून गेल्या वर्षी झालेले िहसक आंदोलन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा पराभव या घडामोडींपासून आनंदीबेन अमित शहा यांच्या रडारवर होत्याच. उनातील दलित मारहाणीच्या घटनेनंतर वातावरण बदलत गेले आणि आनंदीबेन यांच्या मुख्यमंत्रिपदावर गंडांतर आले. पटेल समाजातील ज्येष्ठ नेते नितीन पटेल यांची मुख्यमंत्रिपदी निवड होणार हे जवळपास निश्चित झाले असताना शहा यांनी व्हेटो वापरून आपले निकटवर्तीय विजय रुपानी या तुलनेने कमी अनुभवी नेत्याकडे राज्याची सूत्रे सोपविली. शहा यांनी त्यांची आधी प्रदेशाध्यक्षपदी आणि आता मुख्यमंत्रिपदी निवड केली. मुख्यमंत्री निवडीसाठी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीतही अमितभाई व आनंदीबेन यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्याच. शपथविधी सोहळ्यात ‘अमितभाई आगे बढो’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावरून शहा यांच्या कलाने सारे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यापुढील काळात दिल्लीत बसून गुजरातवर अमितभाईंचा रिमोट कंट्रोल राहणार आहे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हेसुद्धा शहा यांनीच निश्चित केले. कारण मोदी यांचे विश्वासू सौरभ पटेल या बडय़ा नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. वित्त, ऊर्जा, पेट्रोलियमसारखी महत्त्वाची खाती भूषविणारे पटेल ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या नात्यातील. मोदी यांनी त्यांच्यावर नेहमीच विश्वास टाकला होता. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येत्या जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या गुंतवणूक परिषदेची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण शहांपुढे कोणाचे काही चालत नाही. गुजरातमध्ये पटेल समाजाची लोकसंख्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वर्षांनुवर्षे या समाजाने भाजपला साथ दिली. नेतृत्व पटेल समाजाकडे सोपविले नाही तरी पुढील वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत तेवढा फरक पडणार नाही, असे अमित शहा यांचे गणित असावे. १९८०च्या दशकात क्षत्रिय, दलित, आदिवासी आणि मुस्लीम (खाम) यांची मोट बांधून माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी सत्ता प्राप्त केली होती. तेव्हापासून पटेल हे काँग्रेसपासून दूर गेले. पण आता पटेल समाज पूर्णपणे पाठीशी राहील याची भाजपला खात्री नाही. मुस्लिमांबरोबरच दलितही विरोधात गेले आहेत. दलित, मुस्लीम आणि पटेल समाजातील काही मते विरोधात गेल्यास गुजरातमध्ये भाजपपुढे आव्हान उभे राहू शकते. पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणुकांमध्ये भाजपला यशाची खात्री नाही. त्यातच पुढील वर्षांच्या अखेरीस गुजरात विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यास २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे सारे ओळखूनच मोदी-शहा जोडी अधिक सावध झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटनेची सारी जबाबदारी मोदी यांनी शहा यांच्यावर टाकली आहे. शहा यांचा एवढा दरारा की, पक्षात कोणी त्यांच्याविरुद्ध ब्रही काढू शकत नाही. शहा यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे हे मात्र निश्चित.
आले शहांच्या मना..
भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा व आनंदीबेन यांच्यातून विस्तव जात नव्हता.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-08-2016 at 03:09 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah and gujarat chief minister