राजनीतीतील ‘नीती’, शिक्षणप्रणालीतील ‘शिक्षण’ व युनिव्हर्सिटीतील ‘युनिव्हर्स’ हे शब्द सध्या नाहीसेच झाले आहेत, असे सांगत देशातील सद्य:स्थितीवर अगदी गेल्याच आठवडय़ात परखड भाष्य करणाऱ्या न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने एक सच्चा गांधीवादी आपण गमावला आहे. समाजाला गांधी-विचार शिकविणाऱ्या  ‘धर्माधिकाऱ्यांची’ नितांत गरज असतानाच्या काळात झाल्याने ही हानी मोठी आहे. वध्रेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेले धर्माधिकारी १९४२ च्या स्वातंत्र्य लढय़ात सक्रिय होते. त्यांनी तीनदा कारावास भोगला. गांधींच्या आध्यात्मिक विचाराची परंपरा पुढे चालवणारे आचार्यकुलाचे दादा धर्माधिकारी त्यांचे वडील. तोच सर्वोदयी वारसा चंद्रशेखर धर्माधिकारींनी अखेपर्यंत तितक्याच प्रामाणिकतेने व तितक्याच सेवाभावाने चालवला.  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. कामगारांचे खटले लढणारे धर्माधिकारी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्षही होते. वकिलीचा उपयोग त्यांनी रंजल्या-गांजल्या कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी केला. ७०च्या दशकात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक झाली. या काळात अनेक महत्त्वपूर्ण निवाडे देणाऱ्या धर्माधिकारींचा समाजातील सर्व घटकांत वावर होता. निवृत्तीनंतर तर ते सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक संस्थांचे पालकच झाले. समाजाचे उन्नयन व्हावे, चांगला माणूस घडावा, आदर्श कार्यकर्ता तयार व्हावा अशी भूमिका मांडणाऱ्या धर्माधिकारींच्या गोतावळ्यात बाबा आमटे, कुसुमाग्रज यांसारख्या मान्यवरांचा सहभाग होता. जेथे चांगले घडत असेल तेथे जुळणे हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे त्यांच्या देखरेखीत अनेक संस्था नावारूपाला आल्या. सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले. निवृत्तीनंतरही विविध प्राधिकरणे व उच्चाधिकार समित्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचे त्यांचे काम अखेपर्यंत सुरूच होते. डहाणू भागात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व सरकारी यंत्रणांना उपाययोजना करण्यास भाग पाडले होते. स्त्रियांचे स्वातंत्र्य तसेच स्त्री-पुरुष समानतेबाबत कायम आग्रही असणारे व परखड विचार मांडणाऱ्या धर्माधिकारींनी दोन वर्षांपूर्वीच राज्याचे महिला धोरण तयार केले होते. विनोबा भावे यांच्या ग्रामदान या संकल्पनेचा तसेच संपत्तीच्या सामूहिकतेचा विचार त्यांनी सतत मांडला. समाजातील सत्शक्तीची माणसे एकत्र यायला हवीत, विसंगती दूर व्हायला हवी यासाठी सतत मार्गदर्शकाच्या भूमिकेत वावरणारे धर्माधिकारी लेखकसुद्धा होते. त्यांनी गांधीविचार, न्यायदानाचे महत्त्व सांगणारी अनेक पुस्तके लिहिली. मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या धर्माधिकारींनी हिंदीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून राष्ट्रभाषा समितीच्या माध्यमातून देशपातळीवर मोठी चळवळ उभारली. त्यात त्यांना यशही आले. तंटामुक्त खेडी हाच विकासाचा मुख्य मार्ग ठरू शकतात असे ते नेहमी सांगायचे. धर्माधिकारी हे चिंतनशील भाषणांसाठी ओळखले जात. मात्र अशी भाषणे करताना त्यांची शैली नर्मविनोदी असायची. उदाहरणांचा भरपूर वापर करून एखादे तत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. आयुष्याच्या अखेपर्यंत साध्या राहणीचा अंगीकार करीत नैतिक आचरणाचा आग्रह धरणारे धर्माधिकारी गांधीविचारातून तयार झालेल्या आचार्यकुलाचे शेवटचे वारसदार होते. त्यांच्या जाण्याने एक सच्चा मार्गदर्शक व अनेक संस्थांचा पालक आज राज्यानेच नव्हे तर देशाने गमावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा