क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाने एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात महिलांविषयी केलेली आक्षेपार्ह टिप्पणी, त्याबद्दल तो आणि या कार्यक्रमात त्याच्या टिप्पणीचा मूक साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेला दुसरा क्रिकेटपटू के एल राहुल यांच्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकीय समितीने आरंभलेली कारवाई आणि या कारवाईनिमित्त सुरू असलेला घोळ एकूणच भारतीय क्रिकेटसाठी अजिबात भूषणावह नाही. त्यातही इतर अनेक मुद्दय़ांप्रमाणेच या मुद्दय़ावरही प्रशासकीय समितीच्या दोन सदस्यांमध्ये (विनोद राय आणि डायना एडलजी) कार्यवाही आणि कारवाई या दोन्ही बाबतींत मतभेद आहेत. न्या. लोढा समितीने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी प्रशासकीय समिती (कमिटी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स) नेमण्याची शिफारस केली. पण यातून भारतीय क्रिकेटमधील बेशिस्त आणि गोंधळ कमी झालेला नाही. डायना एडलजी या माजी क्रिकेटपटू, त्यामुळे त्यांना क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील बारकावे ठाऊक असणे अपेक्षित आहे. तर विनोद राय हे माजी महालेखापरीक्षक म्हणजे गैरव्यवहार आणि अनियमिततांवर त्यांची करडी नजर असणे अपेक्षित आहे. त्याहीपलीकडे जाऊन, बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटपटू आणि एकूणच देशातला क्रिकेटनामक अजस्र पसारा यांना शिस्त लागावी यासाठी एखादी यंत्रणा प्रस्थापित करणे हे त्यांच्याकडून ढोबळ अर्थाने अपेक्षित होते. मुळात ही समिती चार जणांची होती. त्यांतील दोघेच आता उरले आहेत. त्यांनी क्रिकेट बोर्डाचे सचिव आणि मुख्याधिकारी यांच्यासमवेत काम करावे अशी योजना होती. वास्तविक भारतीय क्रिकेटचा कारभार सांभाळण्यासाठी इतके मनुष्यबळ अतिशय तुटपुंजे आहे. तशात या क्रिकेटमध्ये आता इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल नामक स्वतंत्र ‘संस्थान’ उभे राहिले असून, बेहिशेबी अतिपैसा आणि त्या जोडीला अधूनमधून उद्भवणाऱ्या स्वाभाविक अपप्रवृत्ती यांची चौकशी किंवा त्यांना आळा घालण्यासाठी यापेक्षा मोठी सक्रिय यंत्रणा हवी. ती तशी उपलब्ध नाही हा झाला विद्यमान क्रिकेट व्यवस्थेमधला संरचनात्मक दोष. आता पंडय़ा आणि राहुल यांच्या वादग्रस्त विधानांविषयी. ‘कॉफी विथ करन’ या कथित लोकप्रिय टॉक-शोमध्ये पंडय़ाने काही विधाने केली, ज्यांतून लिंगभाव संवेदनशीलतेविषयी त्याच्या मनोवृत्तीतला अभाव दिसून आला. राहुल त्या प्रसंगाचा साक्षीदार होता आणि पंडय़ाच्या विधानांना हसून दाद देत होता. त्यावरून ट्विटरवर प्रखर टीका वगैरे झाली. गंमत म्हणजे लिंगभाव भेदाविरुद्ध लढय़ाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या या बहुतेक ट्विटरकरांनी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक चित्रपट दिग्दर्शक करन जोहरवर मात्र टीका केली नाही. खरे म्हणजे करनच्या प्रश्नांना हार्दिक उत्तरे देत होता. उत्तर देणारा दोषी मग प्रश्न विचारणारा नामानिराळा कसा राहू शकतो? तेव्हा ट्विटरकरांच्या कथित संतापातली दांभिकता येथे स्पष्टच आहे. तरीही या संतापाची दखल घेऊन बीसीसीआय प्रशासकांनी कारवाई करण्याची तत्परता दाखवली हे विशेष. अशा प्रकारे निव्वळ कारवाई करून फारसे काही निष्पन्न होणार नाही. एक तर खेळाडूंचे आणि संघाचे नुकसान होईलच. पण त्याहीपलीकडे युवा खेळाडूंना लिंगभाव भेदविषयक टिप्पणी, वागणूक यांविषयी संवेदनशील करणे आवश्यक आहे. प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांनी हा मुद्दा अधोरेखित केला. भोग्य-उपभोग्याच्या समजुतींविषयी गाफील राहणे, रात्रीच्या पाटर्य़ाना दुसऱ्या दिवशीचा खडतर सराव बुडवून हजेरी लावणे हे ‘बाळकडू’ हार्दिकसारख्यांना आयपीएल संस्कृतीमधून वरचेवर मिळत असते. त्याविषयी काही आचारसंहिता आहे का, नसल्यास ती बनवली जाणार आहे का, यावर भूमिका घेणे अपेक्षित आहे. निव्वळ कारवाईतून हे प्रश्न सुटणारे नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा