‘आई/बहिणीवरून शिव्या देणे’ ही तिरस्कार जाहीर करण्याची अति ग्राम्य पातळी. शहरीकरण, संगणक युग या कशाचाही परिणाम त्या ग्राम्यतेवर होत नाही आणि तिरस्काराच्या तऱ्हा वाढत राहतात. अगदी ‘जग जवळ आणण्यासाठी’ म्हणून अमेरिका वा चीन आदी देशांमध्ये शोधली गेलेली आणि भारतीयांना आता आपलीच भासणारी समाजमाध्यमेसुद्धा, ही तिरस्कार-प्रदर्शनाची उबळ किती प्रबळ असते, हे वेळोवेळी दाखवत असतात. प्रत्येक माध्यमाचा एक आब असतो. तो न राखता आपापले घोडे दामटण्याचे उद्योग सुरूच असतात. समाजमाध्यमांतील जातिवाचक उल्लेख, महिला वापरकर्त्यांना असभ्य धमक्या देणे हे सारे सुरू असते. ‘फोटोशॉप’ आदी साधने वापरायची, अत्यंत गलिच्छ प्रतिमा तयार करायच्या, स्वत:च त्या प्रसृत करण्यासाठी ‘कुणी बरे केले हे?’ अशी साळसूद भूमिका घ्यायची, अशी लबाडीदेखील या समाजमाध्यमांवर सुरू असते आणि एखाद्या व्यक्ती वा संस्थेला बदनाम करणाऱ्या अपप्रचाराचे साधन म्हणून खुद्द त्या व्यक्ती वा संस्थेसारख्याच नावाचे बनावट खाते तयार करून त्यावरून लोकांची दिशाभूल करण्याचेही प्रकार होत असतात. या साऱ्या प्रकारांची सवय खरे तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही असायला हवी. ती नाही, हे ठाण्यातील एका तरुणाने स्वत:स आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण झाल्याची तक्रार केल्यामुळे उघडकीस आले. या तक्रारदाराने नंतर काही चित्रवाणी वाहिन्यांवर, ‘आपल्याला पोलीस त्या बंगल्यावर घेऊन गेले’ असेही सांगितले आहे. अनंत करमुसे हे या तक्रारदाराचे समाजमाध्यम-खात्यांवरील नाव. हाच इसम गेली तीन वर्षे विकृत प्रचार करत होता हे आव्हाड व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे खरे की चुकीचे, हा मुद्दा आता आपोआपच मागे पडला असून राज्यातील मंत्रिपद सांभाळणाऱ्या नेत्याने मारहाणीसारख्या प्रकाराला समर्थन का द्यावे, याची चर्चा अधिक होते आहे. मारहाण झालेल्या तरुणाचा पाठिंबा भाजप या पक्षास आहे वा नाही हे उघड झालेले नसले, तरी भाजपचे नेते आता ‘मंत्र्यांकडून मारहाण’, ‘कायदा हातात घेण्याचा प्रकार’, ‘सामान्य नागरिक असुरक्षित’ अशा प्रतिक्रिया देऊ लागलेले आहेत. पोलिसांवर या तरुणाने केलेल्या आरोपासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त वा राज्याचे गृहमंत्री गप्प असतानाच, या मारहाणीनंतर ‘आव्हाडांचा दाभोलकर करू’ अशीही भाषा कुणा तरुणाने समाजमाध्यमातून केल्याचे आणखी एक वळण या प्रकरणाला लागते आहे. स्थानिक राजकारणाचा प्रकार, म्हणून हे प्रकरण सोडून देता येणार नाही. उत्तर प्रदेश वा राजस्थानातील आमदार वा मंत्री स्थानिक खुनी, स्थानिक बलात्कारी यांना उघड पाठिंबा देतात आणि भाजपचा एकही नेता त्यावर अवाक्षरही काढत नाही; तसेच मौन आता आव्हाड यांच्याबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही घटकपक्ष पाळणार का, हा प्रश्न राजकारणाची कोणती पातळी महाराष्ट्राला हवी आहे, या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शिवसैनिकांच्या हातातला ‘दगड’ काढण्याचे महत्कार्य मुख्यमंत्री होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी केले होते. शरद पवार यांनी कैक दशके राज्याच्या राजकारणात असूनही कधी हाणामारीचे राजकारण केलेले नाही. या दोघांचे नेतृत्व आव्हाड कितपत मान्य करतात, याची कसोटी झाल्या प्रसंगातून लागणार आहे. समाजमाध्यमांतूनच मोठे होणारा एक नेतावर्ग आपल्याकडे सध्या दिसतो. तसे नसणाऱ्या नेत्यांना वास्तविक, अर्वाच्य व हीन पातळीच्या बदनामीने काहीही फरक पडण्याचे कारण नाही. ‘विजेचे दिवे विझवून मेणबत्त्या लावणे हा निव्वळ मूर्खपणा’ इतक्या स्पष्ट शब्दांत मत मांडून तथाकथित ‘मोदीभक्तां’च्या रोषाची तमा न बाळगणारे आव्हाड यांनी असहमतीचे महत्त्व स्वत:च्या कार्यकर्त्यांनाही शिकवले नाही, तर राजकारणाची इयत्ता सुधारणार कधी? स्वत:स ‘सामान्य माणूस’ म्हणवून घेत तिरस्कार पसरवणारे लोक- विशेषत: तरुण- हे ‘सोशल मीडिया सेल’च्या काळातील नवे हत्यार आहे. त्याची धार शब्दांनीच बोथट होऊ शकते, मारहाणीने नव्हे.

Story img Loader