उत्तर प्रदेशातील तीन लोकसभा पोटनिवडणुकांचा निकाल आणि कर्नाटकात स्थापन झालेले सरकार यावरून भाजपविरोधी समविचारी पक्ष एकत्र आल्यास त्याचा राजकीय फायदा होतो आणि भाजपला धक्का बसतो हे स्पष्ट झाले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीकरिता भाजपविरोधी पक्षांची महाआघाडी स्थापण्याची चर्चा सुरू झाली. एव्हाना काँग्रेसलाही आपल्या ताकदीचा अंदाज आला होता. काँग्रेसनेही एक पाऊल मागे टाकण्याची तयारी दर्शविली. पण नमनालाच अपशकुन झाले. महाआघाडीचे नेतृत्व कोणाकडे असावे हा कळीचा मुद्दा ठरला. बसप आणि समाजवादी पार्टीला काँग्रेसची साथ नकोशी होती. ममता बॅनर्जी यांना कोणाचे नेतृत्व मान्य नव्हते. शेवटी भाजपविरोधी महाआघाडीचा प्रस्ताव कागदावरच राहिला. काँग्रेसने मग राज्य पातळीवर प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्यावर भर दिला. भाजपचा पराभव करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. यासाठी काँग्रेसने सावध पवित्रा घेणे आवश्यक होते. पण काँग्रेस नेतृत्व गेल्या पाच वर्षांत फार काही शिकलेले दिसत नाही. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात आव्हान असल्यानेच बहुधा राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या दुसऱ्या मतदारसंघाची निवड केली. ‘हा मतदारसंघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्याने निवडला,’ असे समर्थन काँग्रेसजन आता करू लागले आहेत. परंतु केरळात डावे पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्येच लढत होते. भाजपची ताकद या राज्यात नगण्य आहे. अशा वेळी डाव्या पक्षांशीच लढण्याऐवजी राहुल गांधी यांनी भाजपच्या विरोधात अन्यत्र लढायला पाहिजे होते. दक्षिणेकडील अन्य मतदारसंघातून लढायचे होते तर शेजारील कर्नाटकचा पर्याय होता. डाव्यांशी लढून राहुल गांधी काय साधणार आहेत, हा केरळचे मुख्यमंत्री ओ. व्ही. विजयन यांनी उपस्थित केलेला सवाल योग्यच ठरतो. राहुल गांधी यांच्या केरळ वारीमुळे डाव्या पक्षांबरोबरील संबंधांमुळे कटुता येणार आहे. पश्चिम बंगाल हा डाव्यांचा गडही आता नेस्तनाबूत झाला आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस या दोघांसाठी आता बंगालमध्ये अस्तित्वाचा प्रश्न आहे. या राज्यातही काँग्रेसने काहीसा समंजसपणा दाखवून डाव्या पक्षांशी जुळवून घ्यायला पाहिजे होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातही काँग्रेसशी समझोता करण्यावरून दोन गट आहेतच. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या चौरंगी लढतीत काँग्रेस आणि डाव्या आघाडीचेच नुकसान होऊन त्याचा अधिक फायदा अर्थातच भाजपला होऊ शकतो. दिल्लीत भाजपला रोखण्याकरिता काँग्रेसशी समझोता करण्याची तयारी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी दर्शविली होती. पण राहुल गांधी यांनी ‘आप’शी आघाडी करण्याबाबत असाच घोळ घातला. काँग्रेसच्या नकाराने दिल्लीतील तिरंगी लढतीचा भाजपलाच फायदा होऊ शकतो. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसला बरोबर घेण्यास नकार दिल्याने काँग्रेसचाही नाइलाज झाला. तेथे काँग्रेसने प्रियंका गांधी यांना प्रचारात उतरवून रंग आणला. उत्तर प्रदेशात काँग्रेस वाढावी, अशीच भाजपची अपेक्षा असणार कारण तिरंगी लढतीत भाजप फायदा उठवू शकतो. काँग्रेसमुळे भाजपच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या उच्चवर्णीय मतांचे विभाजन होते की अल्पसंख्याकांच्या, यावरही बरीच गणिते अवलंबून असतील. महाराष्ट्रातही राष्ट्रवादीसह आघाडी झाली असली तरी उभय पक्षांमध्ये अद्यापही योग्य असा समन्वय साधला गेलेला नाही. सारे मित्र किंवा समविचारी पक्षांना बरोबर घेऊन प्रसंगी जागांबाबत तडजोडीची भूमिका घेणे राहुल गांधी यांना अभिप्रेत होते. पण त्यांनीच समविचारी पक्षांच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेऊन चुकीचा संदेश दिला आहे. हटवादीपणे स्वत:च्याच पायांवर धोंडा मारून घेणाऱ्यांसारखी काँग्रेसची गत झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2019 रोजी प्रकाशित
काँग्रेसचा हटवादी धोंडा..
जपचा पराभव करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. यासाठी काँग्रेसने सावध पवित्रा घेणे आवश्यक होते.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-04-2019 at 00:17 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on congress grand alliance