देश टाळेबंदीत आणि अर्थचक्र जवळपास ठप्प आहे. पण अशा समयी देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणुकीचा व्यवहार बुधवारी घडून आला. समाज-माध्यम क्षेत्रातील महाकाय फेसबुकने भारतातील बाजारभांडवलाच्या मानाने सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉम्र्स लिमिटेड या उपकंपनीत ४३,४७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. विशेष म्हणजे फेसबुकने २०१४ सालात व्हॉट्सअॅप मेसेंजरचे अधिग्रहण केल्यानंतर, जागतिक स्तरावर केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जिओमधील १० टक्के भागभांडवलाची मालकी यातून फेसबुककडे येणार आहे. ‘जिओच्या प्रत्येक वापरकर्त्यांसाठी फेसबुकने तब्बल ११,२०० रुपयांची किमत मोजली,’ असेही म्हणता येईल. करोनाग्रस्त कोमेजलेल्या वातावरणात या व्यवहाराने निश्चितच उत्फुल्लता आणली आहे. करोना महासाथीविरुद्ध लढय़ात गुरफटलेल्या संपूर्ण जगाला महामंदीचा वेढा उत्तरोत्तर घट्ट होत चालला आहे. उद्याच्या भवितव्याविषयी दाट अनिश्चितता आणि साशंकतेचे वातावरण असताना ही इतकी मोठी गुंतवणूक भारताकडून आकर्षिली जाणे, हेच मुळात उत्साहदायी आहे. नवतंत्रज्ञान क्षेत्रात हे बंध जुळून येण्याच्या अनेकांगी परिणामातील हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्याविषयी दिलासादायी पलू आहे. उभय कंपन्यांच्या व्यावसायिक हिताबरोबरीनेच, एकंदर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आश्वासक आणि देशातील डिजिटल मोहिमेवरील भिस्त स्पष्ट करणारे संकेत यातून मिळतात. ‘भारताला जगातील आघाडीचा डिजिटल समाज बनविण्याच्या दिशेने ही एकजूट उत्प्रेरकासारखे काम करील,’ अशी खुद्द फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी या व्यवहारासंबंधी केलेली टिप्पणी बरेच काही स्पष्ट करून जाते. लगोलग मुकेश अंबानी यांनीही, दोन्ही कंपन्यांची एकत्रित ताकद ही देशातील तीन कोटींहून अधिक किराणा-वाणसामान विक्रेत्यांच्या डिजिटल बलशालीकरणाचे दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. काही महत्त्वाचे प्रकल्प या कंपन्या एकत्रितपणे हाती घेत असल्याचे उभयतांनी स्पष्ट केले. अर्थात भारत ही जगातील चीननंतरची सर्वात मोठी इंटरनेट बाजारपेठ आहे आणि तिचेच भांडवल करून अधिकाधिक लाभ पदरी पाडून घेण्यासाठी उभय कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यांचे हे मनसुबे त्यांनी उघडपणे व्यक्तही केले आहेत आणि त्याला आक्षेप असण्याचेही कारण नाही. खरे तर भारतात इंटरनेट वापराच्या वाढीस अंबानी यांचे जिओचे योगदान हे वादातीत खूप मोठे आहे. झकरबर्ग यांच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या समाज-माध्यमांचा जगातील सर्वात मोठा वापरकर्ता वर्गही भारतातच आहे. दोहोंनी आपापल्या सामर्थ्यांचा वापर करून या डिजिटल साधनेला गती देत, त्याचा चलनी लाभही घेतला तर त्याबद्दल नाके मुरडण्याचे कारण नाही. आकडय़ांकडे पाहिले तर ध्यानात येईल की, जिओ सेवेचे भारतात ३.८८ कोटी मोबाइलधारक आहेत, तर फेसबुकचे ३.२८ कोटी मासिक सक्रिय वापरकत्रे, तर त्यांचेच अंग असलेल्या व्हॉट्सअॅपचे भारतात चार कोटींच्या आसपास वापरकत्रे आहेत. या इतक्या प्रचंड मोठय़ा वापरकर्त्यांच्या ‘विविध प्रकारच्या सेवा-वस्तूंचे ग्राहक’ म्हणून रूपांतरणाचे माध्यम म्हणून जिओ प्लॅटफॉर्म हा डिजिटल मंच कार्य करेल. व्हॉट्सअॅपच्या वाणिज्य-वापराच्या दिशेनेही हे संक्रमण असेल. तसे झाले तर ती भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी ई-पेठ असेल. करोना टाळेबंदीच्या काळात नित्याच्या व्यवहारांसाठी डिजिटल साधनांचा वापर अलीकडे लोकांच्या अंगवळणी पडला आहे. अशा समयी भविष्यातील डिजिटल संक्रमणाची नांदी ठरलेला हा व्यवहार घडून येणे समयोचितच म्हणावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा