लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीतील दिग्गज नेत्यांमधील तारा निखळला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजीत गुप्त आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोमनाथ चटर्जी हे दोघेही वेगवेगळ्या पक्षातील असले तरी लोकसभेत या दोन नेत्यांचा वेगळाच दबदबा होता. करारी आवाज, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अभ्यास, संसदीय प्रणाली कोळून प्यायलेल्या चटर्जी यांच्या धारधार भाषणांनी भलेभले गारद व्हायचे. १९७१ ते २००९ या काळात दहा वेळा खासदारकी भूषविलेल्या चटर्जी यांच्याकडे २००४ ते २००९ या काळात लोकसभेचे अध्यक्षपद होते. डाव्या चळवळीतील नेते पाश्चात्त्य राष्ट्रांबाबत नेहमीच बोटे मोडत असतात. सोमनाथबाबूंनी इंग्लंडमधून बार- अॅट – लॉ केले होते. त्यांचे एकूणच राहणीमान लक्षात घेता एका अर्थी ते साम्यवादय़ांमधील उमरावच होते. त्यांचे वडील निर्मलचंद्र चटर्जी हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. फाळणी आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ते हिंदूमहासभेपासून दूर गेले. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे निकटवर्तीय असलेले सोमनाथदा यांना वडिलांच्या मृत्यूनंतर १९७१ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९८४ मध्ये ममता बॅनर्जी यांनी केलेला पराभव वगळता लोकसभेत ते कायम सक्रिय सदस्य होते. माकपची वेगळी अशी पोलादी चौकट होती. या पोलादी चौकटीच्या बाहेर जाणाऱ्या किंवा पक्षाला आव्हान देणाऱ्या भल्या भल्या नेत्यांना पक्षशिस्तीचा फटका बसला. मग त्यात माजी सरचिटणीस बी. टी. रणदिवे, चारू मुझुमदार, कानू सन्यालांपासून ते सोमनाथ चटर्जीपर्यंत अनेक नेते होते. महाराष्ट्रातील कॉ. शरद पाटील हे त्यापैकी एक होते. २००४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे ६० पेक्षा जास्त खासदार निवडून आले. एवढे यश डाव्यांना प्रथमच मिळाले होते. भाजपच्या विरोधात एकत्र आलेल्या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या पुढाकाराने यूपीएची स्थापना केली. यूपीए सरकारला डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा सोमनाथ चटर्जी यांच्याकडे लोकसभेचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यांच्या कठोर शिस्तीचा फटका काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांना बसला होता. लोकसभेतील शून्य प्रहराचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याची कल्पना त्यांचीच. तसेच लोकसभा टीव्ही त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. अध्यक्ष बोलताना स्वपक्षीयांना झुकते माप देतो, असा नेहमीच अनुभव येतो. पण सोमनाथदा त्याला अपवाद होते. आम्हाला बोलायला मिळत नाही अशी माकपच्याच खासदारांची तेव्हा तक्रार असायची. २००८ मध्ये अमेरिकेशी झालेल्या अणुकराराच्या मुद्दय़ावर डाव्या पक्षांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सोमनाथदांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी पक्षाची अपेक्षा होती. पण लोकसभा अध्यक्षपद हे पक्षातीत असते, अशी ठाम भूमिका घेत सोमनाथदांनी राजीनामा देण्यास नकार दिला. यामुळेच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तो दिवस आपल्या आयुष्यातील काळा दिवस होता, अशी भावना तेव्हा चटर्जी यांनी व्यक्त केली होती. हा धक्का सहन न झाल्यानेच बहुधा सोमनाथदांनी लोकसभा अध्यक्षपद वा राज्य विधानसभांचे अध्यक्ष हे कोणत्याही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नसावेत, अशी भूमिका मांडली होती. पक्षातून हकालपट्टी झाली तरी ते पक्षाच्या विचारसरणीशी बांधील राहिले. त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रस्ताव होता, पण आपली हकालपट्टीच चुकीची असल्याने पुन्हा पक्षात प्रवेश नाही, असा तात्त्विक पवित्रा त्यांनी घेतला होता. अशा या आक्रमक नेत्याला लाल सलाम!
संसदनिष्ठ कम्युनिस्ट
२००४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे ६० पेक्षा जास्त खासदार निवडून आले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-08-2018 at 02:12 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on former ls speaker somnath chatterjee