करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या आजारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे हिवतापनिर्मूलन औषध (अँटीमलेरिया ड्रग) अक्सीर इलाज ठरते अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खात्री पटल्यामुळे, आणि हे औषध त्यांचे परममित्र नरेंद्र मोदी यांच्या भारतात उदंड उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्यामुळे ते त्वरेने पाठवावे अशी प्रेमळ विनंती ट्रम्प गेले काही दिवस करत होते. ‘ही विनंती मान्य न होण्याचे काही कारण नाही. पण समजा तसे झालेच, तर ‘उचित प्रतिसाद’ देण्यावाचून गत्यंतर नाही,’ या शब्दांत त्यांच्या देशाची अपरिहार्यताही ट्रम्प सोमवारी व्यक्त करते झाले होते. या ‘प्रेमळ विनंती’स मान देऊन या औषधावरील निर्यातबंदी अंशत: मागे घेण्याचा निर्णय भारत सरकारने मंगळवारी घेतला. लवकरच हे औषध अमेरिकेला देण्यास भाग पाडून आपण काही लाख अमेरिकनांचे जीव वाचवले, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली तर आश्चर्य वाटायला नको. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोविड-१९ विरोधात पूर्णपणे यशस्वी ठरते असे सध्या तरी सांगता येत नाही, असे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) काही दिवसांपूर्वीच बजावले होते. ‘१५ वर्षांखालील मुले आणि ६० वर्षांवरील व्यक्तींनी हे औषध वापरू नये. कोविड-१९ची कोणतीही लक्षणे नसलेले, परंतु अत्यावश्यक आरोग्यसेवेत कार्यरत असलेले सर्वजण, तसेच करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले नातेवाईक यांच्यासाठीच हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची शिफारस आम्ही करतो’, असे आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी २३ मार्च रोजी स्पष्ट केले होते. मूत्रपिंड विकार व हृदयविकार असलेल्यांसाठी या औषधद्रव्याचे सेवन प्राणघातक ठरू शकते, असाही इशारा आयसीएमआर, तसेच जगभरच्या तज्ज्ञांनी दिला होता. भारत ही जगाची मूत्रपिंड विकारग्रस्तांची राजधानी मानली जाते, आणि अमेरिका ही हृदयविकारग्रस्तांची! तरीही एका देशात परिणामकारकता अजूनही पुरेशी सिद्ध न झालेले एक औषध दुसऱ्या देशाकडून संभाव्य जोडधोके नजरेआड करून मागितले जाते, आणि पहिल्या देशाकडून प्रसंगी स्वत:च घालून दिलेले निर्बंध बाजूला सारून ते मंजूरही केले जाते! या संपूर्ण व्यवहारात शहाणपणा आणि सारासार विवेक कोठे दिसतो हे जिज्ञासूंनी अवश्य तपासून पाहावे. आयसीएमआरने इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी आसाममध्ये एका डॉक्टरचा हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या सेवनाने मृत्यू झाला होता. या डॉक्टरला हृदयविकार होता. ट्रम्प यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधून या औषधाविषयी विचारणा केली होती. आदल्याच दिवशी भारताच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने निर्यात निर्बंधयादीत त्याचा समावेश केला होता. आता ट्रम्प यांनी प्रतिनिर्बंधांचा इशारा देताक्षणी दिल्लीत ज्या वेगाने चक्रे फिरली ती आपल्या निर्णयप्रक्रियेची सार्वभौमता व हेतू यांविषयी शंका उपस्थित करतात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शशी थरूर अशा नेत्यांनी या मुद्दय़ावर सरकारवर केलेली टीका रास्त ठरते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा तुटवडा भारतात होणार नाही हे सुनिश्चित केल्यावरच ‘गरजू देशांना’ ते पाठवले जाईल, असा न पटण्याजोगा खुलासा परराष्ट्र खात्याने केला आहे. ‘तुटवडा भासणार नाही,’ हे या टप्प्यावर कसे काय ठरवता येणार? हे औषध आपल्या असंख्य डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना आपण वाऱ्यावर सोडून देणार आहोत काय? ट्रम्प यांचे साथरोगविषयक सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या परिणामकारकतेविषयी जाहीर शंका उपस्थित केली होती. त्यांच्याकडे जाहीर दुर्लक्ष करून ट्रम्प यांनी आपली मागणी रेटली आहे. यात किती कंपन्यांचे हितसंबंध गुंतले आहेत, या कंपन्या ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांशी कशा संलग्न आहेत याची चर्चा अमेरिकेत सुरू झाली आहे. ट्रम्प यांना त्याची फिकीर नाही. त्यांच्या विनंतीस तत्परतेने मान देणारे भारतासारखे देश आहेत, तोवर त्यांना फिकीर करण्याची गरजही नाही!
‘विनंती’स मान देऊन..
विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शशी थरूर अशा नेत्यांनी या मुद्दय़ावर सरकारवर केलेली टीका रास्त ठरते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2020 at 00:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on india lifts restrictions on 24 drug exports abn