श्रीलंकेत रविवारी झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या दहशतवादी हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेट अर्थात आयसिस असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, आतापर्यंत या हल्ल्यांशी संबंधित संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले सर्वच्या सर्व श्रीलंकेचेच नागरिक आहेत. आतापर्यंत ‘नॅशनल तौहीद जमात’ या श्रीलंकेतील गटाने हे कृत्य केले असावे, या निष्कर्षांप्रत श्रीलंकेच्या तपास यंत्रणा आलेल्या आहेत. या गटाचे हस्तक भारतात तमिळनाडूतही आहेत. याशिवाय बांगलादेश आणि म्यानमारमध्ये या गटाचे अस्तित्व दिसून आले आहे. अर्थात श्रीलंकेत या गटाची निर्मिती बौद्ध बहुसंख्याकवादाच्या विरोधात झाल्यामुळे तेथील काही शहरांमध्ये हा गट सक्रिय आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात श्रीलंकेतील एका शहरात बुद्ध-पुतळ्यांचे भंजन करण्यात आले. या कृत्याची पाळेमुळे खणून काढताना पोलिसांना जवळच्याच एका गावातील घरामध्ये मोठय़ा संख्येने विध्वंसक स्फोटके, जुळणी सामग्री, छोटी शस्त्रे आणि धार्मिक पुस्तके आढळली. या ठिकाणी अटक झालेले तरुण ‘एका जिहादी गटाशी’ संबंधित होते असे पोलिसांनी सांगितले होते. विश्लेषकांच्या मते नॅशनल तौहीद जमातच्या सशस्त्रीकरणाचा तो पहिला टप्पा होता. श्रीलंकेत मुस्लिमांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १० टक्के आहे. सन २००९ पासून लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम अर्थात एलटीटीईच्या पतनानंतर श्रीलंकेत बौद्ध बहुसंख्याकवादाचे वारे वाहू लागले होते. महिंदा राजपक्षे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत या बहुसंख्याकवादाला राजकीय अधिष्ठान लाभले. ‘एलटीटीई’ने मुस्लिमांशी काही काळ जुळवून घेतले हे खरे, परंतु नंतर मात्र ‘एलटीटीई’ने उत्तर आणि ईशान्य भागातून त्यांना हाकलून दिले होते. श्रीलंकेच्या काही भागांत हे मुस्लीम आजही निर्वासितांचे जिणे जगत आहेत. तमिळींच्या पतनानंतर विजयोन्मादी बौद्ध गटांना श्रीलंकेअंतर्गत नवा शत्रू हवा होता आणि त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केले. २०१३ पासून जवळपास प्रत्येक वर्षी श्रीलंकेत एक तरी मोठी आणि गंभीर बौद्ध-मुस्लीम दंगल घडलेली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या अशाच एका दंगलीनंतर श्रीलंकेच्या काही भागांमध्ये आणीबाणी लागू झाली होती. अंतर्गत यादवीच्या काळानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेमध्ये अशा प्रकारे आणीबाणी लागू केली गेली. नॅशनल तौहीद जमातच्या हस्तकांची, दंगली घडवण्यापासून पार बॉम्बस्फोट मालिका घडवण्यापर्यंत मजल जाणे आंतरराष्ट्रीय मदतीशिवाय शक्य नाहीच. न्यूझीलंडमधील मशिदींवर झालेल्या हल्ल्यांचा वचपा काढण्यासाठी हे कृत्य केले गेले, असे आता सांगितले जाते. तेवढे एकच कारण असते, तर मग ख्रिस्ती प्रार्थनास्थळांबरोबरच पर्यटकांनी भरलेल्या हॉटेलांना लक्ष्य करण्याचे कारण काय? स्थानिक हस्तकांना बाह्य़शक्तींची मदत हा प्रकार मुंबई हल्ल्यांच्या वेळी प्रामुख्याने दिसून आला होता. यासाठी या स्थानिकांचे जहालीकरण होणे हा पहिला टप्पा असतो. असे जहालीकरण बहुसंख्याकवाद सोसावा लागणे किंवा आर्थिक आणि राजकीय संधी डावलली जाणे या स्थितीला अतिरेकी प्रतिक्रिया देण्याच्या इच्छेला खतपाणी मिळाल्यामुळे होऊ शकते. श्रीलंकेतील हल्ल्यांमध्ये सहभागी झालेले बहुतेक जण सधन घरांतील होते. दोन पंचतारांकित हॉटेलांमध्ये आत्मघाती स्फोट घडवणारे दोघे जण तेथील एका धनाढय़ मसाला व्यापाऱ्याचे मुलगे होते. श्रीलंकेला दहा वर्षांपूर्वीपर्यंत भाषिक बहुसंख्याकवादामुळे झळा सोसाव्या लागत होत्या. त्या भाषिक बहुसंख्याकवादाची जागा धार्मिक बहुसंख्याकवादाने घेतली का, याविषयी त्या देशात चर्चा होणे गरजेचे आहे. तसे असेल, तर आयसिससारख्या निव्वळ पश्चिम आशियापुरतीच मृतवत झालेल्या, पण इतरत्र विविध रूपांमध्ये सजीव आणि सक्रिय असलेल्या संघटनांना संधी मिळत राहण्याचा धोका कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा