करोना विषाणू धर्म, जात, वर्ण, भाषा असा भेद करत नाही. तो सगळ्यांना बाधित करू शकतो. त्यामुळे कोणताही भेदभाव न बाळगता आपण सर्वानी त्याचा एकत्रित मुकाबला करायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्याचे स्वागत. करोनाविरोधी लढय़ात धर्म, जात, प्रदेश, पंथ असे भेदभाव करून काही जण सरकार, राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निग्रह पातळ करण्याचा प्रयत्न करीतच आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. या लढाईत सर्वाधिक कळीची भूमिका ठरते रुग्णालयांची. कारण करोनाबाधित आणि संशयित, तसेच इतर विकारग्रस्तही रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. करोनाच्या भीतीने सारेच ग्रस्त असल्यामुळे हे स्वाभाविक आहे. बहुतेक रुग्णालये, तेथील डॉक्टर आणि आरोग्यसेवक रात्रीचा दिवस करून रुग्णसेवेत गुंतलेले आहेत. पण इतर काही क्षेत्रांप्रमाणे अपवाद येथेही आढळतात. यात रुग्ण नाकारण्याचे वेगवेगळे मार्गही शोधले जात आहेत. मेरठमधील एका कर्करोग रुग्णालयाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, केवळ करोनाबाधित नसलेलेच रुग्ण त्यांच्याकडे स्वीकारले जातील असे म्हटले. इतकेच नव्हे, तर अशा रुग्णाबरोबर एक मदतनीस असावा आणि तोही करोना नकारात्मक असावा अशी अजब अट घातली. या मुद्दय़ावर वादंग झाल्यावर रुग्णालयाने नंतर माफी मागितली. गंमत म्हणजे त्याच जाहिरातीत ‘कंजूष हिंदूं’नाही कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. त्याबद्दलही माफी मागितली गेली! त्याच्या काही दिवस आधी अहमदाबादमध्ये एका रुग्णालयात धर्मावर आधारित वॉर्ड विभागले गेले होते. याबद्दल चौकशी झाल्यावर असा आदेश ‘सरकारकडूनच आला’ असे उत्तर दिले गेले. ते उत्तर खात्रीशीर ठरणार नाही असे लक्षात येताच, आजाराच्या गांभीर्यानुसार विभागणी झाली, अशी सारवासारव केली गेली. ही दोन्ही रुग्णालये भाजपशासित राज्यांमध्ये येतात हा योगायोग नसावा. करोनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समुदायांकडून झाला. इंदूरसारख्या शहरात काही वस्त्यांमध्ये वैद्यकीय पथकांवर झालेले हल्ले गैरसमजुतीतून झाले होते. सरकारला एनपीआर किंवा राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणीसाठी माहिती गोळा करायची आहे आणि वैद्यकीय चौकशी ही केवळ सबब आहे, असे संदेश समाजमाध्यमांतून फिरल्यामुळे हे हल्ले झाले अशी कबुली मुस्लीम नेत्यांनी दिली. दिल्ली, मुझफ्फरपूर येथील दंगली समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे घडल्या हा इतिहास ताजा असतानाही असे प्रकार घडत आहेत, याबद्दल मुस्लीम नेत्यांना उत्तरदायित्व घ्यावे लागेल. वेगळ्या स्वरूपाचे उत्तरदायित्व हिंदुत्वाची झूल पांघरलेल्या माध्यमांना आणि नेत्यांनाही स्वीकारावे लागेल. तबलिगींकडून झालेल्या दुर्लक्षामुळे करोना प्रादुर्भावाचे सारे खापर मुस्लीम समुदायावर फोडण्याची अहमहमिका माध्यमांमध्ये आणि विश्लेषकांमध्येही लागली आहे. यासाठी मुस्लीमबहुल भागांमध्ये साथसोवळ्याची कशी ऐशीतैशी सुरू असल्याचे संदेशही फिरू लागले होते. पण ही प्रवृत्ती धर्मातीत आहे. शिवाय अशा प्रकारे एकमेकांकडे बोटे दाखवून साध्य काहीच होणार नाही. पालघर जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल भागात झालेल्या झुंडबळी कांडालाही धार्मिक रंग देण्याचे प्रकार काहींनी आरंभले. करोनाशी सुरू झालेली लढाई सामुदायिक स्वरूपाची आहे. या लढाईत आपसांतच कप्पे पाडल्यास करोना प्रादुर्भावावर कोणताच फरक पडणार नाही. पंतप्रधानांनी जे विधान केले, तशीच विधाने जेथे हे भेदभावाचे प्रकार घडत आहेत, त्या साऱ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही करण्याची गरज आहे. परंतु हे घडलेले नाही. धार्मिक चिकित्सेची इतकीच खोड असल्यास, मुळात हा विषाणू देशात आणला कोणी, त्यांचा धर्म काय होता, हेही पाहिले जाईल. या सगळ्यातून खरोखरच काही साधले जाणार नसेल, तर हा खेळ बंद करणे केव्हाही हितकारकच.

Story img Loader