संकटे सांगून येत नाहीत आणि संधी आपणहून येत नाही. संकटे आल्यानंतर संधीचा शोध घेण्याने झटपट काहीच हाती लागत नाही आणि वेळीच संकटाचे संधीत रूपांतर न केल्याचा ठपका मात्र बसतो. मराठी प्रकाशन व्यवसायाबाबत नेमके हेच घडले आहे. मुद्रणाचा शोध लागून साडेपाचशे वर्षांहून अधिक काळ लोटला. संगणक क्रांतीपाठोपाठ आलेल्या इंटरनेट क्रांतीने सारे जग ढवळून निघाले. जगातील पुस्तक प्रकाशन व्यवसायानेही काळाबरोबर राहून आपापली आयुधे आणि धोरणेही बदलली. इंटरनेट तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुस्तकेही इकडून तिकडे सहजगत्या केवळ आंतरजालाच्या मदतीने पोहोचवण्याचा विचार सुरू झाला, त्याला प्रतिसाद म्हणून किंडलसारखे उपकरणही निर्माण झाले. परिणामी छापील पुस्तकाची वाहतूक प्रत्यक्ष रस्त्याने होण्याची गरज राहिली नाही. एवढे सारे बदल होत असताना जगातील प्रकाशकांनी वाचकांची सोय हीच आपली संधी हे लक्षात घेऊन आपल्या व्यवसायाचे रूप पालटले. हे सारे घडत असताना छापील पुस्तके निर्माण होणे मात्र थांबले नाही. जगात सर्वत्र छापील पुस्तकांना असलेली मागणीही नगण्य म्हणावी अशी अजिबातच नाही. चांगले साहित्य दिले, तर वाचकांना ते हवे असते, याची जाणीव ठेवून पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही साधनांनिशी ही गरज पुरवण्याचे काम अन्य भाषांमधील प्रकाशकांनी केले. मराठी प्रकाशकांनी मात्र या नव्या तंत्राला फारसे आवडीने कवटाळले नाही. करू, बघू, असे म्हणत हळूहळू नवतंत्र आत्मसात करण्याच्या या वृत्तीने, आज करोनामुळे उद्भवलेल्या संकटात प्रकाशकांची मोठीच पंचाईत झाली आहे. वाचनासाठी वेळ आहे, परंतु पुस्तके उपलब्ध नाहीत, अशी सध्याची स्थिती. वेळीच पावले उचलून काळाबरोबर राहण्यासाठी प्रयत्न झाले असते, तर नव्या तंत्राला झटपट सामोरे जाण्यासाठी मराठी प्रकाशकांची जी धावाधाव सुरू आहे, ती झाली नसती. मराठीतील अनेक प्रकाशकांनी साहित्यात आणि परिणामी सांस्कृतिक जगतात काही मोलाची भर घातली आहे, हे खरेच. मात्र नवे बदल दिसत असूनही मराठी प्रकाशकांनी आपल्या जुन्याच पुस्तकांची पाने ‘पीडीएफ’ करून आंतरजालावर विक्रीसाठी उपलब्ध केली. त्याने केवळ संगणकावर पुस्तक वाचता येऊ लागले. परंतु नव्या तंत्राचा अवलंब मात्र झालाच नाही. कोणी तर कोणाच्याही पुस्तकांचे वाचन ध्वनिमुद्रित करून श्राव्य पुस्तकांचा परस्पर प्रयत्नही केला. यामुळे मराठी पुस्तकांना नवा वाचक फार मोठय़ा प्रमाणावर मिळाल्याचेही दिसत नाही. काळाबरोबर राहून नवे विषय अतिशय ताकदीने अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व मार्गाचा उपयोग करण्यात हे सारे प्रकाशक मागे पडले, हे करोना काळातील सत्य ठरले आहे. उत्तमोत्तम ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या अशा मोजक्या प्रकाशकांविरुद्ध आवाज उठवत अनेक नवे प्रकाशक या बाजारपेठेत उतरू लागले. ते नव्या मार्गाचा अवलंबही करू लागले. परंतु तेथेही व्यावसायिकता आणि सर्जनशीलता यांचा समन्वय योग्य रीतीने होतोच असे दिसत नाही. अजूनही व्यक्तिकेंद्रित असलेला मराठी प्रकाशनाचा व्यवहार ‘उद्योग’ या संज्ञेला पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे बदलत्या काळाची चाहूल घेत आक्रमक व्यावसायिकता दाखवणारे प्रकाशक मराठीत कमी दिसतात. करोनाच्या संकटकाळात तर हे संधी गमावणे अधिकच उठून दिसते आहे.
गमावलेली संधी
वाचनासाठी वेळ आहे, परंतु पुस्तके उपलब्ध नाहीत, अशी सध्याची स्थिती.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-04-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on publishers were in great panic in the crisis caused by corona abn