कोविड-१९च्या महासाथीमध्येही दक्षिण कोरियाने यशस्वीरीत्या सार्वत्रिक निवडणूक घेऊन दाखवली. या निवडणुकीत सत्तारूढ डेमोक्रॅटिक पक्ष आणि अध्यक्ष मून जे-इन यांनी अभूतपूर्व यश संपादित केले. उर्वरित बहुतेक जगात करोना विषाणूचा धसका घेऊन आणि साथसोवळ्याचे निकष पाळण्यासाठी गर्दी टाळण्याकडे कल असताना, दक्षिण कोरियाने निवडणूक घेण्याची जोखीम पत्करताना दाखवलेली इच्छाशक्ती आणि तयारी कौतुकास्पद मानावी लागेल. लोकशाही वाचवायची असेल, तर निवडणुका झाल्याच पाहिजेत. पण कोविड-१९मुळे लागू झालेल्या संचारबंदीत आणि टाळेबंदीत त्या घ्यायच्या कशा? काही देशांत प्रलंबित निवडणुकांमुळे अकार्यक्षम राज्यकर्त्यांचे फावले; काही देशांमध्ये सत्तेजवळ आलेल्या विरोधी पक्षीयांची निराशा निवडणुका लांबल्यामुळे झाली. कारण त्यांच्या प्रचाराच्या मुद्दय़ांवर काहीएक कृती करण्याची उसंत सत्ताधीशांना मिळाली. शिवाय काही देशांमध्ये राजकीय कारणांसाठी निवडणूक टाळण्याची सबबही सत्ताधीशांना मिळाली आहे. फ्रान्स, इथियोपिया, बोलिव्हिया, चिली व अमेरिकेत काही राज्यांच्या निवडणुका, ब्रिटनमध्ये स्थानिक निवडणुका खोळंबलेल्या आहेत. रशियात व्लादिमीर पुतिन यांना २०३६पर्यंत सत्तेवर राहण्यासाठी सार्वमत घ्यायचे होते! ती प्रक्रियाही रखडली आहे. पोलंडमध्ये विद्यमान अध्यक्ष आंद्रे दुदा हे येत्या मे महिन्यातील अध्यक्षीय निवडणुकीविषयी आग्रही आहेत. पण यासाठी त्यांनी मांडलेल्या टपालाद्वारे मतदानाचा प्रस्ताव विरोधकांना मान्य नाही. दक्षिण कोरियाने करोना विषाणूविरोधातील लढा अभिनव पद्धतीने सुरू केला. या देशात सुरुवातीला चीनपाठोपाठ सर्वाधिक बाधित आढळले होते. पण चाचण्यांवर मोठा भर दिल्यामुळे दक्षिण कोरियात बाधितांना हेरण्यात आरोग्य यंत्रणांना मोठे यश आले. गुरुवापर्यंत त्या देशात करोनाबाधितांची संख्या १०६१३ इतकी होती. मृतांचा आकडा बऱ्यापैकी नियंत्रणात म्हणजे २२९ इतका नोंदवला गेला होता. गुरुवापर्यंत सलग चार दिवस नवीन बाधितांचा आकडा प्रतिदिन ३०च्या खाली नोंदवला गेला. करोनाला गांभीर्याने घेणाऱ्या या देशाने निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीलाही तितकेच महत्त्व दिल्याचे दिसून आले. जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण गेल्या २८ वर्षांतील सर्वाधिक आहे. ३०० सदस्यीय संसदेत सत्तारूढ डेमोकॅट्रिक पक्षाला १८० जागा मिळाल्या. १९८७नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला इतके निर्भेळ यश मिळाले. बुधवारी संपूर्ण दक्षिण कोरियात मतदानाला सुरुवात झाली. प्रत्येक मतदार मास्क लावून होता. दोन मतदारांत एक मीटरचे अंतर कटाक्षाने पाळले जात होते. प्रत्येक मतदाराची उष्मा चाचणी घेतली गेली. हातांना सॅनिटायझर लावून, प्लास्टिकचे हातमोजे घालून मतदान केले गेले. ज्यांनी ही खबरदारी घेतली नाही किंवा जे उष्मा चाचणीत ज्वरग्रस्त आढळले, त्यांना स्वतंत्रपणे मतदान करू देऊन ती ठिकाणे नंतर स्वच्छ केली गेली. स्व-विलगीकरणात असलेल्या, परंतु लक्षणे न आढळलेल्या जवळपास १३००० मतदारांना मुख्य मतदान संपल्यानंतर मतदान करू दिले गेले. मतपत्रिकांवर झालेल्या या निवडणुकीची मतमोजणीही पुरेशी काळजी घेऊनच पार पडली. अशा प्रकारे करोनाग्रस्त जगातील पहिली निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्याचे श्रेय निसंशय दक्षिण कोरियाकडे जाते. जगभर अनेक प्रगत आणि लोकशाहीवादी देश करोनाविरोधात अडखळत असताना, आपली निरंकुश, केंद्रसत्ताक व्यवस्था या लढाईत कशी यशस्वी ठरत आहे, अशा प्रकारचा प्रचार चीनने सुरू केलाच आहे. या अपप्रचाराला दक्षिण कोरियाच्या निवडणुकीने खणखणीत उत्तर दिलेले आहे. करोनाशी लढताना लोकशाही व्यवस्थेला राजकीय लालसेच्या संसर्गापासून टिकवण्याची जबाबदारीही पाळायला हवी, ही जाणीव इतर देशांना करून देण्यातही या निवडणुकीचा मोठा वाटा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा