‘निवृत्ती केव्हा?’ यापेक्षा ‘आत्ता निवृत्ती कशासाठी?’ असा प्रश्न चाहते विचारतात, तोच खरा निवृत्तीचा क्षण असे विख्यात माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले होते. क्रीडा किंवा कोणत्याही क्षेत्रात शिखरावर असताना निवृत्ती जाहीर करण्यात एक प्रकारचे मोठेपण असते आणि ते संबंधित व्यक्तीच्या झळाळत्या कारकीर्दीला शोभून दिसते. ती झळाळी निस्तेज झाल्यानंतर, आपल्यापेक्षा इतरांनाच आपल्या निवृत्तीची प्रतीक्षा असताना कारकीर्दीचा पूर्णविराम घेणे अयोग्य असा गावस्करांच्या म्हणण्याचा मथितार्थ. तरीही ऑस्ट्रेलियाची आघाडीची टेनिसपटू अॅश्ले बार्टीने कारकीर्दीच्या शिखरावर असताना, बुधवारी वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी जाहीर केलेली निवृत्ती जगभरच्या टेनिसरसिकांसाठी धक्कादायक आणि हुरहुर लावणारी ठरली. अॅश्ले जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. फ्रेंच (२०१९), विम्बल्डन (२०२१) आणि ऑस्ट्रेलियन (२०२२) अशा तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा तीन वेगवेगळय़ा प्रकारच्या टेनिस कोर्टवर तिने जिंकून दाखवल्या आहेत. तिने एकूण १५ एकेरी आणि १२ दुहेरीतील अजिंक्यपदे पटकावली. या काळात तिच्याइतके सातत्य इतर कोणत्याच टेनिसपटूने दाखवलेले नाही. जागतिक क्रमवारीत सलग ११४ आठवडे ती अव्वल स्थानावर आहे. आधुनिक काळात स्टेफी ग्राफ आणि सेरेना विल्यम्स (१८६ आठवडे) आणि मार्टिना नवरातिलोवा (१५६) यांनीच तिच्यापेक्षा अधिक काळ अव्वल स्थान राखले होते. आपण समाधानी आहोत, आनंदी आहोत आणि नवी क्षितिजे धुंडाळण्यासाठी सज्ज आहोत. शारीरिकदृष्टय़ा यापेक्षा अधिक योगदान देण्याची क्षमता राहिलेली नाही, असे तिने समाजमाध्यमांवर प्रसृत केलेल्या संदेशात म्हटले आहे. अॅश्ले बार्टीपेक्षा अधिक काळ सलग अव्वल स्थानावर राहिलेल्या स्टेफी, सेरेना आणि मार्टिना त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी किंबहुना विक्रमी कारकीर्दीसाठी ओळखल्या जातात. सेरेना तर अजूनही सक्रिय आहे, काही तरी जिंकण्याची उमेद बाळगून आहे. पुरुषांच्या टेनिसमध्ये रॉजर फेडरर आणि राफाएल नडाल यांनीही प्रदीर्घ काळ दबदबा निर्माण केला होता. नडालही सेरेनाप्रमाणेच आजही एखादी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याची क्षमता आणि जिद्द बाळगून आहे. आपल्याकडे लिअँडर पेस आणि सानिया मिर्झा ही उदाहरणे आहेत. अशांसारख्यांचा आदर्श अॅश्लेसारखे युवा क्रीडापटू का ठेवू शकत नाहीत? की सतत जिंकत राहण्याचे दडपण कधी तरी त्या खेळातील उत्कटता, त्या खेळाविषयीचे प्रेमच संपवून टाकते? तिच्यासारखीच आणखी एक युवा टेनिसपटू नओमी ओसाका हिला सातत्याने होत असलेल्या हुल्लडबाज प्रेक्षकांच्या वर्णद्वेषी शेरेबाजीचा वीट आला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात तीदेखील असा काही निर्णय घेऊ शकते. एखाद्या क्षेत्रात अग्रस्थानावर पोहोचणे हे आव्हान खडतर खरेच. पण त्याहूनही मोठे आव्हान असते, तेथे दीर्घ काळ टिकून राहण्याचे. काहींना ते मानसिकदृष्टय़ा आणि शारीरिकदृष्टय़ा शक्य होत नाही. काहींसाठी नवीन काही मिळवण्याची ऊर्मीच संपून जाते. १९८१मधील विम्बल्डन अंतिम सामना हरल्यानंतर आपण दु:खीच झालो नाही हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता, असे विख्यात टेनिसपटू बियाँ बोर्ग यांनी वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निवृत्ती घेताना सांगितले होते. अॅश्ले बार्टीच्या बाबतीतही कदाचित असे काहीसे होत असावे. आपल्या निर्णयाविषयी अॅश्ले समाधानी असली, तरी टेनिसमधील ही सुरस कहाणी अधुरी संपल्याची हुरहुर टेनिसरसिकांना मात्र लागून राहील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा