एका मराठी कुटुंबाच्या गेल्या ५० वर्षांच्या औद्योगिक धडपडीची त्या उद्योगाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतच अखेर व्हावी हे क्लेशकारक असले, तरी तेवढय़ापुरते दु:ख व्यक्त करून हा मुद्दा हातावेगळा करता येण्यासारखा नाही. कारण ‘निर्लेप’ या नावाने घराघरात, थेट स्वयंपाकघरात आपले स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. ज्या घरात दररोज गॅसची चूल पेटते, त्या प्रत्येक घरात एक तरी निर्लेप भांडे असलेच पाहिजे, अशी सवय या उत्पादनाने लावली. पॉलिमरचा लेप दिलेल्या भांडय़ांना ‘निर्लेप’ असे नाव देऊन ती भांडी म्हणजे स्वयंपाकघराची गरज बनविण्याचे सारे श्रेय खरे तर ‘निर्लेप’ या उत्पादनाकडेच जाते. लेप दिलेल्या भांडय़ाला निर्लेप असे नाव देणे ही या उत्पादनाची खरी कल्पकताच म्हणावी लागेल. असे कोणतेही भांडे कोणत्याही कंपनीने बाजारात आणले, तरी एकदा ते स्वयंपाकघरात दाखल झाले की त्याचे ‘निर्लेप’ असेच नामकरण व्हावे, एवढी लोकप्रियता लाभलेल्या या उत्पादनाला त्याच क्षेत्रात त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दाखल झालेल्या आणि झपाटय़ाने बाजारपेठ पादाक्रांत करीत निर्लेपलाच आव्हान देणाऱ्या अन्य उत्पादनांशी स्पर्धा करणे कठीण झाले असावे, एवढाच निर्लेप गुंडाळण्याच्या निर्णयामागचा अर्थ काढावा लागतो.  निर्लेप भांडय़ाशी प्रत्येक कुटुंबाचे घट्ट नाते जुळले, तरीही बाजारपेठेतील स्पर्धेचे तंत्र निर्लेपला पेलवले नसावे, हेच खरे. निर्लेप या उत्पादनाच्या ५० वर्षांच्या वाटचालीतील पहिली ४० वर्षे या उत्पादनाने पॉलिमर लेप असलेल्या गृहोपयोगी भांडय़ांच्या उत्पादनक्षेत्राचे शिखर गाठले. एखाद्या विशिष्ट उत्पादनाच्या क्षेत्रात एखादे नाव आपले पाय एवढे घट्ट रोवून ठेवते की, अन्य कोणत्याही कंपनीने तसेच उत्पादन बाजारात आणले तरी त्याची ओळख मात्र या नावाशीच जोडली गेलेली असते. बाजारात लोखंडी कपाटांचे उत्पादन करणाऱ्या शेकडो कंपन्या असल्या तरी एखादे लोखंडी कपाट घरात आल्यावर ‘गोदरेजचे कपाट’ असेच त्याचे नामकरण होते, तसेच! अशाच पद्धतीने निर्लेपने आपली स्वत:ची ओळख निर्माण केलेली असतानाही, गेल्या दहा वर्षांत या उत्पादनाने बाजारपेठेच्या स्पर्धेत बरेच काही ‘भोगले’ असावे, असे या उत्पादनाच्या प्रवर्तकांनी व्यक्त केलेली खंत पाहता स्पष्ट होते. मुळात, मराठी माणूस उद्योगक्षेत्रात शिरण्यास धजावत नाही, हे अजूनही नाकारता येणार नाही असे वास्तव आहे. म्हणूनच, उद्योगक्षेत्रातील मराठी माणसाच्या गरुडभराऱ्यांची उदाहरणे देताना, काही दशकांपासून चालत आलेल्या मोजक्या माणसांचीच नावे पुढे करावी लागतात. मराठी माणसाचे पंख उद्योगक्षेत्रात भरारी मारण्याएवढे शक्तिशाली नाहीत ही खंतदेखील वारंवार व्यक्त केली जात असतानाच, भोगले यांच्या निर्लेपने दहा वर्षे हलाखी भोगून शेवटी सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या मुहूर्तावर अखेरचा श्वास घ्यावा, ही बाब एकूणच मराठी उद्योगविश्वाच्या नवोन्मेषी उमेदीस फारशी उत्साहवर्धक नाही. नोटाबंदी किंवा वस्तू सेवा कराचा नवा भार असह्य़ झाल्याने कंपनीच्या मालकीवर पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे या कंपनीच्या प्रवर्तकांचे म्हणणे क्लेशकारक असले, तरी या क्षेत्रात लोकप्रियतेच्या आणि विश्वासार्हतेच्या शिखरावर पोहोचूनही बाजारपेठेच्या स्पर्धेपुढे गुडघे टेकण्याची शरणागतता कंपनीस का यावी हे एक कोडेच आहे. निर्लेपच्या भोगले यांनी या उत्पादनातून काढता पाय घेतला असला, तरी निर्लेप हे नाव यापुढेही घराघरात राहणारच आहे. ती पुण्याई या नावास भोगले नावाच्या एका मराठी कुटुंबाने प्राप्त करून दिली, एवढीच आता मराठी माणसासाठी एक अभिमानापुरती बाब उरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा