एकीकडे ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’सारख्या लोकोक्तींवर विश्वास ठेवणारे लोक, तर दुसरीकडे न्यायालयात कोणी, कशासाठी जावे याला काही धरबंध नसल्याची परिस्थिती, यांतून आपल्या समाजातील आर्थिक विषमतेसारखीच न्यायिक विषमताही दिसून येते. विशेषत: माध्यमांतून चर्चेत राहणाऱ्या त्याच त्या मुद्दय़ांवर आधारित याचिका वारंवार केल्या जातात, असा अनुभव नेहमीचा. न्यायालय त्या याचिका सुनावणीअंती फेटाळून लावते, पण याचिकादाराला खडे बोल सुनावते, हेही आता नेहमीचेच झालेले. तरीही दोन याचिकांची बुधवारीच झालेली फेटाळणी पुन्हा लक्षणीय ठरली. याचे कारण याचिकांतील मुद्दे न्यायालयाच्या मते बिनमहत्त्वाचे असले, तरी याचिकादारांचे त्या मुद्दय़ांबाबतचे पूर्वग्रहदेखील असल्या याचिकांमुळे उघड झाले. पहिली याचिका दुकानांवरील मराठी नामफलकांच्या सक्तीविरुद्ध कुणा ‘किरकोळ व्यापारी महासंघ’ या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयापुढे केली होती, तर दुसरी स्वत:स बाल हक्क कार्यकर्ती म्हणवणाऱ्या अनुभा श्रीवास्तव आणि ‘स्टुडंट्स युनियन ऑफ ओडिशा’ यांनी सीबीएसई परीक्षांविरुद्ध केली होती. या दोन्ही याचिकांवर त्या त्या याचिकादारांना दोन्ही पातळय़ांवरील न्यायालयांकडून मिळालेल्या दटावणीत कमालीचे साम्य आहे. असल्या याचिकांमुळे न्यायालयाचा वेळ वाया जातो, असाच न्यायालयांचा सूर आहे.
सीबीएसई परीक्षेसंदर्भात अभ्युदय चकमा आणि इतर याचिकादारांची याचिका गेल्या नोव्हेंबरातच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. सीबीएसईला परीक्षापद्धती ठरवण्याचा पुरेपूर अधिकार आहे आणि विद्यार्थ्यांच्या किंवा ‘परीक्षार्थी’च्या तथाकथित हक्कांस वगैरे या अधिकारामुळे कोणतीही बाधा येत नाही, हे त्या वेळी स्पष्ट झालेले होतेच. तरीही आता ही अनुभा श्रीवास्तव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीला आली. परीक्षेचे स्वरूप ठरेल, तेव्हा त्यावर मुद्देसूद आक्षेप तुम्ही घेऊ शकता, पण त्याआधीच आम्ही आदेश द्यावा ही मागणी रास्त नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने श्रीवास्तव यांची याचिका फेटाळली. तर मुंबई उच्च न्यायालयाने मराठी पाटय़ांची सक्ती ही जरी राज्य सरकारच्या आदेशामुळे झालेली असली तरी मराठी ही या प्रांताची, इथल्या लोकांची भाषा आहे आणि दुकानांचे नामफलक लोकांच्या भाषेत असणे हे कुणाच्याही नुकसानाचे कारण ठरू शकत नाही, असे म्हणत व्यापाऱ्यांची याचिका तर फेटाळलीच, वर याचिकाखर्च म्हणून २५ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावेत, असा आदेशही दिला. असा दंड अनेकदा बिनबुडाच्या याचिकांसाठी ठोठावला जातोच. ‘विप्रो’चे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्याविरोधात सातत्याने बिनबुडाच्या याचिका केल्याबद्दल दोघा याचिकादारांनाच दोन महिन्यांची कैद कर्नाटकातील एका न्यायालयाने सुनावल्याची घटना गेल्याच आठवडय़ातील आहे. पण केंद्रीय मंडळाची परीक्षा, मराठीचा वापर हे मुद्दे अधिक लोकाभिमुख आहेत, माध्यमांतून चर्चिले जाणारे आहेत आणि न्यायालयानेही, प्रसिद्धीसाठीच असल्या मुद्दय़ांवर याचिका गुदरता काय, असे वेळोवेळी फटकारलेही आहे. मुळात न्यायालयाचा वेळ फुकट घालवणाऱ्या अशा याचिका प्राधान्याने सुनावणीला येतात, हे मात्र अनेकांस अनाकलनीय वाटावे असे. न्यायवृक्षाला केवळ लोकोपयोगीच नव्हे तर समाजाला नैतिकतेच्या मार्गावर ठेवणाऱ्या आदेशांचा बहर यावा, ही अपेक्षा रास्त असेल, तर असल्या याचिका आणि त्यांची सुनावणी हा बिनफळांचा मोहोर ठरतो.. काहींसाठी न्यायालयीन सुनावण्या अधिक सुकर, या विमनस्क शंकेलाच बळकटी देणारा!