इटालियन दिग्दर्शक बर्नाडरे बेर्तोलुच्ची हे ‘ओत्येअर’ परंपरेतले महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शक होते. हा शब्द चित्रपट अभ्यासकांच्या परिचयाचा असला, तरी इतरांसाठी त्याविषयी विवेचन आवश्यक ठरते. एखाद्या दिग्दर्शकाचा चित्रपटाच्या संपूर्ण अंगावर इतका विलक्षण प्रभाव असतो, ज्यामुळे तो दिग्दर्शक त्या चित्रपटाचा किंवा चित्रकृतीचा लेखकच (फ्रेंच परिशब्द ओत्येअर) म्हणजे चित्रकर्ता ठरतो. बेर्तोलुच्ची चित्रपट समीक्षकाच्या घरात जन्माला आले. त्यांचे वडील कवीदेखील होते. वडिलांप्रमाणे कवी बनण्याची स्वप्ने घेऊन साहित्य शिकायला निघालेला त्यांचा हा मुलगा पुढे घरातील चित्रपटविषयक पुस्तके वाचून, झपाटून त्या दुनियेच्या दिशेने ‘भरकटला’. साहित्यातली पदवी मिळवण्याच्या किंवा कविता करण्याच्या फंदातच पडला नाही. १९५० आणि ६०च्या दशकांचा तो काळ वेगळ्या वाटेवर निघालेल्या दिग्दर्शकांसाठी भारलेला काळ होता. इटालियन, फ्रेंच सिनेमांमध्ये नवनवीन प्रयोग होत होते. बेर्तोलुच्ची त्या लाटेवर स्वार झाले. त्यांचे अनेक चित्रपट गाजले, पण दोन विशेषत्वाने लक्षात राहिले : ‘द लास्ट एम्परर’ आणि ‘लास्ट टँगो इन पॅरिस’! ‘द लास्ट एम्परर’ हा बेर्तोलुच्चींचा सर्वात यशस्वी चित्रपट. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नऊ ऑस्कर पुरस्कार जिंकले. यात बेर्तोलुच्चींच्या सवरेत्कृष्ट दिग्दर्शन आणि सवरेत्कृष्ट रूपांतरित पटकथेबद्दल मिळालेल्या पुरस्कारांचाही समावेश आहे. निरीश्वरवाद आणि मार्क्‍सवाद ही गेल्या शतकातील चित्रपट दिग्दर्शकांची ठळक वैशिष्टय़े बेर्तोलुच्ची यांच्या ठायी मुरलेली होती. त्यांना विशेषत: महायुद्धपूर्व ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक विषय हाताळणारे चित्रपट बनवण्यात विलक्षण रस होता. ‘द कन्फॉर्मिस्ट’, ‘१९००’, ‘लिटल बुद्धा’, ‘द लास्ट एम्परर’ हे चित्रपट सादर करताना बेर्तोलुच्ची यांनी प्रचलित घडामोडींवर भाष्य केलेले दिसून येते; पण या सगळ्यांपेक्षा बेर्तोलुच्ची यांचा सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त चित्रपट म्हणजे ‘लास्ट टँगो इन पॅरिस’. कथा साधीशीच. पत्नीच्या आत्महत्येमुळे विमनस्क झालेला एक अमेरिकी मध्यमवयीन माणूस (पॉल) पॅरिसमध्ये येतो आणि एका फ्रेंच तरुणीशी (ज्याँ) संबंध जुळवतो. शारीरिक ओढ आणि भावनिक गुंतवणूक यांच्यातील द्वंद्वाला शोषणाची जोड मिळाली आणि एक अत्यंत धाडसी, लैंगिकताभिमुख चित्रपटाचा जन्म झाला. मुख्य प्रवाहातील सिनेमांत दाखवल्या जाणाऱ्या लैंगिकतेच्या सीमा पूर्णपणे पुसल्या गेल्या. अमेरिकेतील काही राज्ये, युरोपातील काही देशांमध्ये या चित्रपटावर अश्लील म्हणून बंदी आणली गेली. हा चित्रपट कथानक आणि कलाकृती म्हणून उत्तम होता; पण त्यातील बलात्काराच्या एका प्रसंगावरून समीक्षक आणि आस्वादकांमध्ये दोन तट पडले. विख्यात अभिनेते मार्लन ब्रँडो यांनी मध्यमवयीन पुरुषाचे आणि फ्रेंच अभिनेत्री मारिया श्नायडर यांनी फ्रेंच तरुणीचे पात्र उभे केले होते. एका प्रसंगात पॉल ज्याँवर बलात्कार करतो. हा प्रसंग आपल्या मनाविरुद्ध आणि पूर्वकल्पना न देता चित्रित केला गेला, असे मारिया श्नायडर यांनी खूप वर्षांनी म्हणजे २००७ मध्ये एका मुलाखतीत सांगितले. श्नायडर या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर बेर्तोलुच्ची यांच्याशी कधीही बोलल्या नाहीत; पण बेर्तोलुच्ची अखेपर्यंत प्रसंगाचे समर्थन करत राहिले. मारियाला बलात्काराच्या प्रसंगाची कल्पना दिली होती, केवळ त्याचे स्वरूप तिला माहीत नव्हते. कारण तिच्या नजरेतून, प्रतिक्रियेतून मला धक्का आणि अविश्वास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता, असे बेर्तोलुच्ची यांनी म्हटले आहे. ‘ओत्येअर’ परंपरेचे हे दुसरे टोक होते. चित्रपटाच्या माध्यमावर प्रेम, श्रद्धा असलेल्या बेर्तोलुच्चीसारख्या दिग्दर्शकाची ती कृती कदाचित समर्थनीय ठरणार नाही; पण अभिजात चित्रपट याच प्रकारच्या मनस्वितेतून जन्माला आल्याची उदाहरणे असंख्य असल्यामुळे बेर्तोलुच्चींना सर्वस्वी खलनायकही ठरवता येत नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा