महाराष्ट्रातील मुलांना अगदी लहान वयापासूनच इंग्रजी भाषेची ओळख करून देऊन, त्यांच्यामधील भाषेचा न्यूनगंड दूर करण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू झाला. त्या वेळचे शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या या निर्णयाचे त्या वेळी कौतुक झाले होते. आताच्या शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी पहिलीची पाठय़पुस्तके द्विभाषिक करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामागे नव्याने इंग्रजी शिकवण्याचा हेतू असण्याची शक्यता नाही, कारण ते गेली दोन दशके सुरूच आहे. या निर्णयामागे शाळेच्या दप्तराचे वजन कमी करण्याचा मुख्य हेतू असला पाहिजे आणि तो योग्यही आहे. पहिलीतल्या चिमुकल्यांच्या दप्तरात आतापर्यंत चार पाठय़पुस्तकांचा भार असे. तो आता एकाच पुस्तकावर येणार आहे. याचा अर्थ पहिलीच्या अभ्यासक्रमाचे चार भाग करण्यात आले असून प्रत्येक सत्रासाठी एक अशी चार वेगवेगळी पाठय़पुस्तके आता बालभारतीतर्फे तयार करण्यात आली आहेत. या एका पाठय़पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित आणि खेळू, शिकू, करू या चारही विषयांच्या त्या त्या सत्रातील अभ्यासक्रमाचा समावेश असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शाळेत एकच पाठय़पुस्तक न्यावे लागणार आहे. या पुस्तकात चार विषयांचे चार भाग असतील. या एकात्मिक पाठय़पुस्तकातच इंग्रजीची ओळख करून देण्यात येणार आहे. मराठीतील एखाद्या शब्दाला इंग्रजीत कोणता पर्याय आहे, हे चित्ररूप पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात येणार आहे. द्विभाषिक पाठय़पुस्तके तयार करण्यामागे मुख्यत: दप्तराचे वजन कमी करण्याचा हेतू असला, तरीही गेल्या दोन दशकांत शाळांमध्ये सुरू राहिलेल्या ‘पहिलीपासून इंग्रजी’ या उपक्रमाचा आढावाही घ्यायला हवा. जे विद्यार्थी पहिलीपासून इंग्रजी शिकत व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत पोहोचले, त्यांचा अनुभव नेमका काय, अध्यापकांचे अनुभव काय आहेत, याचाही अभ्यास व्हायला हवा. भारतीय शिक्षणपद्धती बदल घडवून आणण्यास खूप विलंब लावते, असा आजवरचा अनुभव आहे. जगातील बदलत्या परिस्थितीबरोबर शिक्षण व्यवस्थेने राहणे ही अतिशय महत्त्वाची बाब असते. त्यासाठी व्यवस्थेत लवचीकता असावी लागते. भारतात ती फारशी नाही. त्याचे कारणही निर्णयाच्या अंमलबजावणीस लागणारा वेळ आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचताना येणाऱ्या अडचणी हे आहे. तरीही भारतीय विद्यार्थ्यांना जगाबरोबर राहायचे असेल, तर बदलाचा वेग वाढवणे भागच. पहिलीपासून इंग्रजी हा त्या दृष्टीने घेतलेला निर्णय होता. भाषा चित्रमय पद्धतीने अधिक सहजपणे शिकवता येते. पहिलीच्या नव्या पाठय़पुस्तकांमध्ये वस्तू, फळ, प्राणी यांची चित्रे, त्यांचे मराठी नाव आणि त्यापुढे इंग्रजी नाव देण्यात येणार आहे. हा बदल करण्यापूर्वी राज्यातील ४८८ आदर्श शाळांमध्ये एकात्मिक पाठय़पुस्तकाचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला होता. आता तो राज्यभर राबवण्यात येईल. या नव्या रचनेत चारही शैक्षणिक सत्रांच्या वेगवेगळय़ा पाठय़पुस्तकांमुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित वार्षिक परीक्षा घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा विचार या संदर्भात झाला असेल, असे गृहीत धरायला हवे.  इयत्तेगणिक अभ्यासक्रमाची काठिण्यपातळीही वाढत जायला हवी. त्यानुसार विद्यार्थ्यांला नेमके किती समजले आहे, याची चाचणी घेण्याची नवनवी तंत्रेही निर्माण करायला हवीत. तसे झाले, तर हा बदल किती पचनी पडतो आहे, हे लक्षात येऊ शकेल आणि त्यानंतरचे बदलही अधिक सजगपणे करता येतील.

lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
schizotypal personality disorder in marathi
स्वभाव-विभाव: संदर्भाचा भ्रम
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
Make harbhrayacha thecha in just five minutes
फक्त पाच मिनिटांत बनवा ओल्या हरभाऱ्याचा झणझणीत ठेचा; लिहून घ्या साहित्य आणि कृती
ITR Refund Scam
ITR refund scam: करदात्यांनो रिफंडबाबत मेसेज, ईमेल येत आहेत? नव्या स्कॅमपासून सावधान!
Dudhache Pedha at home during the festival
सणासुदीला घरीच बनवा ‘दुधाचे पेढे’; नोट करा साहित्य अन् कृती