‘सत्तेचा माज आलेल्यांना जमिनीकडे पाहता येत नाही. त्यामुळे जमिनीवर काय चालले आहे ते त्यांना दिसत नाही’, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधी पक्षाचे गुलाम नबी आझाद यांना उद्देशून मारला, तेव्हा भाजपच्या तमाम सदस्यांनी सभागृहात बाके वाजवून त्याचे स्वागत केले होते. विरोधकांना पंतप्रधानांचा हा टोला चांगलाच झोंबला. मात्र भाजपने त्यावरून काहीच बोध घेतला नाही का? याही पक्षाची नीतिमूल्ये खुंटीवर टांगली गेली आहेत का? पक्षाला सत्तेचा माज आल्यामुळे जमिनीवर काय चालले आहे ते पक्षातील कुणालाच दिसत नाही का?.. असे प्रश्न माध्यमांनी विचारले असते, तर भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची सहिष्णुता कदाचित चांगलीच उफाळून आली असती. पण पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्तेच जर असे प्रश्न विचारू लागले, तर त्याची उत्तरे कुणी द्यायची, यावरून भाजपमध्ये सध्या लपाछपीचा खेळ सुरू झाला आहे आणि तळागाळातले निष्ठावंत कार्यकर्ते विषण्णपणे या खेळाकडे पाहत बसले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये सध्या जे काही चालले आहे, त्याची उत्तरे कार्यकर्त्यांकडे नाहीत आणि उत्तरे देण्यासाठी नेते सापडत नाहीत. अशा विचित्र अवस्थेमुळेच, विधान परिषदेसाठी पक्षाने प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या आयारामांची उमेदवारी जाहीर केल्यावर या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यकर्त्यांचे आदर्श असल्याने, भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न कुरवाळणारे हे संघसंस्कृत कार्यकर्ते तोंडाचा आ वासून निवडणुकीच्या राजकारणाकडे पाहू लागले. दरेकर यांच्या सहकारातील स्वाहाकाराच्या कहाण्यांनी काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्राचे रकाने भरले होते. मुंबै बँकेतील सव्वाशे कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला, तेव्हा हेच दरेकर मनसेला रामराम करून सत्ताधारी भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते आणि ‘सहकाराचे पावित्र्य’ या विषयावर भाजपच्या मंचावरून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून ‘संस्कार परिषदा’ही घेऊ  लागले होते. त्याआधी भाजपच्या एका राष्ट्रीय नेत्याने दरेकरांच्या निधीतील सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन केले, तेव्हाच दरेकर यांच्या ‘शुद्धीकरणा’चा संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांना मिळावयास हवा होता. पण स्वयंसेवकी बाण्याने सतरंज्या अंथरण्यातच मश्गूल असलेल्या त्या कार्यकर्त्यांची छाती तेव्हा पक्षाची ताकद वाढल्याच्या आभासाने ५६ इंचांनी फुलली होती. दरेकर यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे एक ‘लाड’के बाळही भाजपच्या तंबूत दाखल झाले, तेव्हाही या कार्यकर्त्यांनी सतरंज्या अंथरताना जल्लोष केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीची ‘रसद’ उभारण्याची तयारी सुरू झाली, हे त्यांच्या लक्षातच आले नसावे. दरेकर आणि लाड यांची उमेदवारी जाहीर होताच, माध्यमांनी विचारावेत असे प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारले जाऊ  लागले. भाजपचे काँग्रेसीकरण होऊ  लागले असताना, काँग्रेसमुक्त भारत हे काही आश्चर्य नाही, कारण काँग्रेसयुक्त भाजप हे पक्षाचे नवे रूप आता उघड झाले आहे, अशी थेट टीका पक्ष कार्यालयातच पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी केली. काँग्रेसमुक्त भारत हा पंतप्रधानांचा नारा अशा पद्धतीने प्रत्यक्षात आणण्याचा चंग ज्येष्ठांनी बांधला असेल, तर निष्ठावंतांच्या नशिबी असलेले सतरंज्या उचलण्याचे स्वयंसेवकत्व आपोआपच जपले जाईल. कारण गयाराम म्हणून त्यांना स्थानही नाही. बाहेरच्या राजकारणाचे त्यांचे रस्ते मात्र कधीचेच बंद झालेले आहेत, आणि खांद्याला झोळी लावून फिरणारे नेते रसद उभी करू शकत नाहीत, हे पक्षालाही माहीत आहे..