तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या ५० वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना कधीच वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. द्रमुक किंवा अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांनीच अधिराज्य गाजविले. १९६७ नंतर काँग्रेसला या राज्यात स्वबळावर कधीच सत्तेच्या जवळ जाता आले नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसचे २५ खासदार निवडून आल्याचा अपवाद वगळता काँग्रेसला द्रमुक किंवा अण्णा द्रमुकच्या शिडीची गरज भासली. काँग्रेसची जागा भाजपने घेतली असताना ३९ खासदार निवडून येणाऱ्या तमिळनाडूत भाजपलाही बाळसे धरता आले नव्हते. पण नुकत्याच झालेल्या तमिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकंदर १२,८३८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर एकूण जिंकलेल्या जागा (३०८) आणि मतांच्या टक्केवारीत भाजप हा येथील राजकीय स्पर्धेतला पक्ष ठरला. द्रमुक (७,८९८ जागा) व अण्णा द्रमुक (२,००८ जागा) यांनंतर अपक्षांना (१,४३५) आणि त्यानंतर काँग्रेसला (५९२ जागा) यश मिळाले असले तरी काँग्रेस हा द्रमुकच्या आघाडीतील सहकारी पक्ष होता. भाजपने मात्र स्वबळावर यश संपादन केले, याचे महत्त्व अधिक. शहरी भागात सात टक्क्यांपेक्षा अधिक मते भाजपला मिळाली. महानगरांमध्ये द्रमुक व अण्णा द्रमुकनंतर भाजपला तिसरा क्रमांक मिळाल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला. या निकालातून भाजपने तमिळनाडूत आपले अस्तित्व दाखवून दिले. कन्याकुमारी या प्रभावक्षेत्राबरोबरच तमिळनाडूच्या सर्व भागांमध्ये पक्षाला कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. गेल्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकबरोबर आघाडीत भाजपचे चार आमदार निवडून आले होते. या तुलनेत नऊच महिन्यांनी झालेल्या शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपने मिळविलेले यश नक्कीच पक्षासाठी आशादायी आहे. प्रादेशिक पक्षांच्या मदतीने राज्यात हातपाय पसरायचे आणि कालांतराने प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करून राजकीय जागा व्यापायची ही भाजपची जुनी खेळी. आसाममध्ये आसाम गण परिषद, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करूनच भाजपने या राज्यांमध्ये ताकद वाढविली. नंतर ‘शत प्रतिशत भाजपा’ची घोषणा देत प्रत्यक्षात ती स्वतंत्रपणे जोखली. आजही या प्रादेशिक पक्षांपेक्षा त्या त्या राज्यांत भाजपची ताकद अधिक आहे. तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि भाजपची युती गेले दोन दशकांची. जयललिता यांच्याकडे पक्षाची सूत्रे असताना त्या भाजप नेत्यांना त्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत. जयललिता यांच्या पश्चात पक्ष वाढविण्यासाठी हीच संधी असल्याचे लक्षात आल्याने भाजप नेत्यांची पावले पडली. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये बेदिली निर्माण झाली असता मोदी-शहा यांनीच मध्यस्थी करून तोडगा काढला होता. गेल्या वर्षी पराभवानंतर अण्णा द्रमुकमध्ये पुन्हा धुसफुस सुरू झाली. अण्णा द्रमुक जेवढा कमकुवत होईल तेवढे भाजपच्या पथ्यावर पडणारे. भाजपला हेच अपेक्षित असावे. हात धरून चंचुप्रवेश करायचा व पुढे त्याच पक्षाला नामोहरम करायचे हा भाजपचा पारंपरिक प्रयोग अण्णा द्रमुकबाबत यशस्वी होतो का हे कालांतराने स्पष्ट होईल. पण भाजपने तमिळनाडूत हातपाय पसरायला सुरुवात तर केली आहे.
अन्वयार्थ : राज्य निराळे, खेळी तीच..
महानगरांमध्ये द्रमुक व अण्णा द्रमुकनंतर भाजपला तिसरा क्रमांक मिळाल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-02-2022 at 01:15 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp performance in tamil nadu local body polls zws